लॉकडाऊनच्या काळात १७५ शस्त्रक्रिया विवेकानंद रुग्णालयाची अनोखी कामगिरी दररोज ८० रेडिएशन , ३० किमोथेरपी जपली सामाजिक बांधिलकी





लॉकडाऊनच्या काळात 
१७५ शस्त्रक्रिया 

विवेकानंद रुग्णालयाची 
अनोखी कामगिरी    

दररोज ८० रेडिएशन , 
३० किमोथेरपी

जपली सामाजिक बांधिलकी 

 लातूर /प्रतिनिधी:कोरोनामुळे सामान्य जनजीवन प्रभावित झाले.आरोग्य क्षेत्राला आणि पर्यायाने कोरोनाव्यतिरिक्त इतर आजारांवर उपचार घेणाऱ्या रुग्णांनाही याचा फटका बसला.लॉकडाऊनच्या या काळात कर्करोगाशी झुंजणाऱ्या रुग्णांवर उपचार करत आपला रुग्णसेवेचा वसा जोपासण्याचे काम विवेकानंद रुग्णालयाने केले.लॉकडाऊनच्या काळात विवेकानंद रुग्णालयात १७५ शस्त्रक्रिया करण्यात आल्या.कोरोनामुळे डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचारीही धास्तावलेले असताना विवेकानंद रुग्णालयाने ही किमया साध्य करत रुग्णांना दिलासा दिला. 
   मार्च महिन्यात लातूर जिल्ह्यासह देशभरात लॉकडाऊन झाले.कोरोना,लॉकडाऊन , संचारबंदी नेमके काय होत आहे हेच त्याकाळात समजत नव्हते. पण कर्करोगावर उपचार घेणाऱ्या रुग्णांना तर थांबून चालणार नव्हते.कर्करोगाशी झुंजत असताना शस्त्रक्रिया करण्यास उशीर झाला तर आजार वाढण्याचाही धोका असतो.
याकाळात अनेक रुग्णालयांनी उपचार करण्यास नकार दिला पण आपली बांधिलकी जपणाऱ्या विवेकानंद रुग्णालयाने उपचार थांबवले नाहीत.नियमित उपचार घेणाऱ्या रुग्णांसह इतर शहरात उपचार घेणाऱ्या पण लॉकडाऊनमुळे तेथे जाऊ न शकणाऱ्या रुग्णांवरही विवेकानंद रुग्णालयाने उपचार केले. 
  २२ मार्च पासून आजवर रुग्णालयात कर्करोगावरील १७५ शस्त्रक्रिया करण्यात आल्या. दररोज तीन ते चार शस्त्रक्रिया ,  जवळपास ८० रुग्णांवर रेडिएशन आणि २५ ते ३० रुग्णांवर किमोथेरपी करण्यात आली. रुग्णालयाच्या ओपीडीला दररोज साधारणपणे २५ ते ३० नवे रुग्ण येत असत. त्यांच्यावरही उपचार करण्यात आले. डॉ. ब्रिजमोहन झंवर, डॉ.प्रमोद टिके, डॉ. ललिता नेलोरे,डॉ. करिश्मा जॉर्ज, वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विनी कुलकर्णी यांनी रुग्णांसह स्वतःचीही काळजी घेत या शस्त्रक्रिया पार पाडल्या.भूलतज्ज्ञ डॉ.आरती झंवर ,डॉ.श्रीकृष्ण कुलकर्णी,डॉ.कल्याणी सास्तुरकर  यांनीही आपली जबाबदारी पार पाडत डॉक्टरांच्या या टीमला सहकार्य केले.आजही शस्त्रक्रियेसाठी विवेकानंद रुग्णालयात दोन आठवड्यांचे वेटींग आहे.२ शिफ्टमध्ये किमोथेरपी केली जाते. शहरातील रुग्णालयात २५ बेडचा एक वॉर्ड आणि एमआयडीसी मधील रुग्णालयात १५ असे एकूण ४० बेड असून ते सर्व दररोज किमोथेरपीसाठी येणाऱ्या रुग्णांसाठी राखीव आहेत. 
   कोरोनापासून बचाव करण्यासाठी शारीरिक अंतर ठेवणे,मास्क आणि सॅनिटायझरचा वापर यासह सुरक्षिततेचे सर्व निकष पाळून या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. विशेष म्हणजे जवळपास ९५ टक्के रुग्णांवर महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार करण्यात आले. ज्या रुग्णांना योजनेचा लाभ मिळाला नाही अशा रुग्णांच्या उपचाराचा संपूर्ण खर्च विवेकानंद रुग्णालयाने उचलल्याचे डॉ.ब्रिजमोहन झंवर यांनी सांगितले. 
  लातूर येथे अत्याधुनिक पद्धतीचे उपचार उपलब्ध आहेत परंतु याची माहिती नसल्याने काही रुग्ण इतर शहरात उपचारासाठी जातात. पुणे , मुंबई अशा शहरात उपचारासाठी जाणाऱ्या या रुग्णांना लॉकडाऊनमुळे प्रवास करणे शक्य नव्हते. त्यामुळे असे रुग्ण मोठ्या संख्येने उपचारासाठी विवेकानंद रुग्णालयात आले.त्यांच्यावरही उपचार करण्यात आल्याचे ते म्हणाले. 
  पद्मभूषण डॉ.अशोकराव कुकडे काका, डॉ. गोपीकिशन भराडिया,डॉ. सौ. अरुणा देवधर , प्रशासकीय अधिकारी अनिल अंधोरीकर,डॉ.राधेशाम कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात विवेकानंद  रुग्णालयाचे कामकाज चालते. डॉ. कुकडे काका आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सुरु केलेल्या या रुग्णालयात आज डॉक्टरांची तिसरी पिढी कार्यरत आहे.सामाजिक बांधिलकी जपत मागील ५० वर्षांपासून रुग्णालयाची वाटचाल सुरु असून विवेकानंद रुग्णालय हे रुग्णांसाठी आशेचा किरण ठरले असल्याचेही डॉ. झंवर यांनी  सांगितले. 
 कोरोनामुळे सर्वांच्याच मनात संभ्रम होता.डॉक्टरांसह सहकारी कर्मचाऱ्यांनाही भीती होती. त्यांच्या मनातील ही भीती काढून टाकण्याचे काम केले. त्यांना विश्वास दिला,धाडस दिले.  कोरोनाबाबत असणारा संभ्रम दूर केला. स्वतःची काळजी घेत , सुरक्षाविषयक सर्व निकष पाळत रुग्णांवर उपचार केले असे ते म्हणाले.

लाईव्ह उपचार ...
 पहिल्या टप्प्यात लॉकडाऊन अतिशय कडक होते. उपचारासाठीही रुग्णांना येणे अशक्य होते.त्याकाळात फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून रुग्णांना दिलासा देण्याचे काम केले. अनेकवेळा रुग्णाला उपचार करण्याची गरज असताना स्थानिक डॉक्टरांच्या मदतीने व्हिडीओ कॉल करून उपचारांबाबत मार्गदर्शन केले. रुग्णांना त्यांच्या समस्यांबाबत सोशल मीडियाच्या माध्यमातूनही मार्गदर्शन केल्याची माहिती त्यांनी दिली. 

 टर्शरी कॅन्सर केअर सेंटर .. 
भारत सरकारने मागील वर्षी विवेकानंद रुग्णालयाला टर्शरी कॅन्सर केअर सेंटरचा दर्जा दिला आहे. या माध्यमातून रुग्णांवर अत्याधुनिक पद्धतीने उपचार केले जात आहेत.याशिवाय विवेकानंद रुग्णालयात अद्ययावत सिटी स्कॅन मशीन असून रुग्णांना अत्यल्प दरात त्याचा लाभ दिला जात आहे. अद्ययावत ३ टेस्ला एमआरआय मशीनद्वारे महाराष्ट्रात सर्वात स्वस्त उपचार विवेकानंद रुग्णालयात केले जात असल्याचेही त्यांनी सांगितले .


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या