महाराष्ट्र अंनिसतर्फे ३१ व्या वर्धापन दिनानिमित्त ॲान लाईन अधिवेशनांसह 'शहीद डाॅ नरेंद्र दाभोलकर अभिवादन', 'चमत्कार सादरीकरण स्पर्धा', 'अंधश्रद्धा निर्मूलन कार्याबद्दल प्रतिक्रिया आवाहन' अशा विविध कार्यक्रमांचे राज्य व राष्ट्रीय स्तरावरील ऑनलाइन आयोजन ...
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती तर्फेे सुरू झालेल्या संघटीत कामाला ९ ॲाागस्ट २०२० रोजी ३१ वर्षे पूर्ण होत आहेत. महाराष्ट्र राज्य निर्मितीला ६० वर्षे पूर्ण झाली असून राज्याचा पुरोगामी विचारधारेच्या संत- समाज सुधारकांचा व भारतीय संविधानाला अभिप्रेत मूल्य आशयाचा वारसा संवर्धित आणि संक्रमित करण्याचा प्रयत्न महा. अंनिसच्या ३० वर्षांच्या संघटीत व सातत्यपूर्ण कामातून केला गेला आहे. त्याबाबतच्या योगदानाचा लेखाजोखा महाराष्ट्राच्या हिरक महोत्सवी वर्षाच्या पार्श्वभूमीवर संघटनेच्या वर्धापन दिनी, ९ ॲाागस्ट २०२० रोजी सकाळी ११ ते २ दरम्यान आयोजित आॅनलाईन अधिवेशनात मांडला जाणार आहे. त्यामधे "महाराष्ट्र राज्याच्या हिरक महोत्सवी वर्षानिमित्त महाराष्ट्र राज्याच्या जडणघडणीत महा अंनिस- तीन दशकाच्या कामाचे योगदान" असा आशय असणार आहे. या ऑनलाईन अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ संपादक साहित्यिक उत्तम कांबळे (राज्य उपाध्यक्ष, महा अंनिस) असतील तर प्रमुख वक्ते म्हणून माध्यम क्षेत्रातील अध्यापक तज्ञ व सामाजिक- राजकीय विश्लेषक प्रा. जयदेव डोळे (औरंगाबाद), ज्येष्ठ शास्त्रज्ञ ,संशोधक व विश्लेषक डॉ. सत्यजित रथ (नवी दिल्ली, पुणे) आणि महाराष्ट्रातील जेष्ठ मानसोपचार तज्ञ व भाष्यकार डॉ प्रदीप पाटकर (राज्य उपाध्यक्ष महा अंनिस) यांचा सहभाग राहणार आहे. याप्रसंगी संघटनेच्या तीन दशकातील योगदानाबाबतची भूमिका मांडणी अविनाश पाटील (राज्य कार्याध्यक्ष, महा अंनिस) करणार आहेत.
गत तीन दशकांत संघटनेने सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, शैक्षणिक, राजकीय अशा विविध मानवी जीवनाशी निगडीत क्षेत्रातील अंधश्रद्धांच्या निर्मूलनाचे वैशिष्टपूर्ण असे मोठे काम संघटितपणे उभे केलेले आहे. महाराष्ट्र राज्याच्या हिरक महोत्सवी वर्षात महाराष्ट्र अंनिसच्या व्यापक सामाजिक योगदानाबद्दल कार्यकर्त्यांनी आढावा घ्यावा, स्मरण व उजळणी करावी आणि त्यातून प्रोत्साहन, प्रेरणा आणि कार्यपूर्तीचा आनंद मिळवावा असा आमचा प्रयत्न आहे. त्याचबरोबर समाजाला अंधश्रद्धा निर्मूलनाच्या वैशिष्ट्यपूर्ण कामाची माहिती द्यावी व त्याद्वारे त्यांनी स्वतःचे जीवन अंधश्रद्धा मुक्त, विवेकी घडवावे असे अपेक्षित आहे. त्यासाठी महा अंनिसतर्फे ९, २० ॲागस्ट व २१ सप्टेंबर २०२० दरम्यान राज्य व राष्ट्रीय अभियान आखणी तीन टप्प्यात करण्यात आली असून त्यामधे विविध वैशिष्ठपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. अर्थातच सध्याच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लाॅकडाऊनच्या परिस्थितीमध्ये हे सर्व कार्यक्रम ऑनलाइन पद्धतीनेच होणार आहेत. याशिवाय कार्यकर्ते, त्यांचे कुटुंबीय आणि समविचारी व सर्वसामान्य नागरीीक यांच्या कृतीशील सहभागासाठी काही कार्यक्रमांचे आयोजन केलेले आहे.
पहिल्या टप्प्यात, संघटनेच्या ३१व्या वर्धापन दिनानिमित्त १ ऑगस्ट ते ९ ऑगस्ट २०२० दरम्यान महा अंनिसने मागील तीन दशकात केलेल्या कामांचा व योगदानाची ठळक, वैशिष्ठपूर्ण बाबींचा आढावा सर्व प्रकारच्या समाज माध्यमातून विविध विषयांच्या पोस्टमधून मांडला जात आहे. तसेच अंधश्रद्धा निर्मूलनाच्या संघटीत कामाबद्दल कार्यकर्ते, कुटुंबिय, समविचारी आणि सर्वसामान्य नागरिकांंना त्यांच्या प्रतिक्रिया लिखीत, ध्वनीत वा दृृकश्राव्य माध्यमातून पाठविण्याचे विनम्र आवाहन आम्ही करीत आहोत. मागील वर्षी महा अंनिस त्रिदशक पूर्ति निमित्तने आयोजित कार्यक्रम एक दिवसीय युट्युब चॅनल वरुन दाखविण्यात आले. शिवाय समितीच्या कामाच्या विविध विभागांचे समाजोपयोगी ठळक कामांचे संक्षिप्त सारांशाचे पोस्टर्स, इमेजेस तयार करून, तेही विविध माध्यमातून समाजापर्यंत पोहोचवण्याचे काम सुरू आहे.
दुसरा टप्पा, १० ऑगस्ट ते २० ऑगस्ट २०२० 'शहीद नरेंद्र दाभोलकर अभिवादन' करायचा आहे. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या संघटीत कार्याचे अध्वर्यु व समितीचे संस्थापक कार्याध्यक्ष शहीद नरेंद्र दाभोलकर यांचा २० ऑगस्ट २०१३ रोजी पुण्यात निर्घृण खून झाला. खुनानंतरही संघटनेने कच न खाता हे काम प्रचंड वाढवले आणि ते महाराष्ट्रातच नव्हे तर देशभर आणि जगातही विस्तारले आणि मान्यता पावले. शहीद डॉ नरेंद्र दाभोलकर यांच्या निर्घृण खुनामागे कुणा कुणाचे हात आहेत, कोण सूत्रधार आहेत याचाही लवकर शोध घ्यावा. त्यासाठी आपल्या देशाचे पंतप्रधान व मुख्यमंत्री यांच्याकडे ईमेलद्वारे मागणीचे निवेदन पाठवून सनदशीर मार्गाने आग्रह धरण्यात येणार आहे. अाॅनलाईन याचिका करुन राज्य, राष्ट्र व आंतरराष्ट्रीय स्तरावरुन त्याला पाठींबा मिळविला जाणार आहे
. त्याचसह शहीद नरेंद्र दाभोलकरांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी सोबत संघटनेच्या विविध कामात सहभागी झालेले कार्यकर्ते अशा सर्वांना व्यक्त होण्यासाठी लेखी, ध्वनी, द्रृकश्राव्य माध्यमातून अनुभव कथनाची संधी तसेच २० ऑगस्ट २०२० रोजी शहीद डॉ नरेंद्र दाभोलकर यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी 'शहीद नरेंद्र दाभोलकर अभिवादन व राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिन' यावर देश पातळीवरील विविध मान्यवरांसह चर्चासत्र आहे.
तिसरा टप्पा, २० ऑगस्ट २०२०, शहीद डॉ नरेंद्र दाभोलकर स्मृृती दिन, राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिवस ते २१ सप्टेंबर २०२०, चमत्कार सत्यशोधन दिन या कालावधीत असणाार अााहे. २१ सप्टेंबर, १९९५ रोजी 'गणपती दुग्धप्राशनाचा' तथाकथित चमत्कार घडल्याची अफवा अवघ्या काही तासांतच जगभर पसरली होती. त्यावेळी महाराष्ट्र अंनिसच्या कार्यकर्त्यांनी या घटनेमागील वैज्ञानिक कारणांचा तातडीने शोध घेऊन , या घटनेमागील शास्त्रीय सत्य, प्रयोगाने ठिकठिकाणी उघड करून दाखवले होते. या घटनेला २१ सप्टेंबर २०२० रोजी पंचवीस वर्षे पूर्ण होत आहेत. २१ सप्टेंबर हा दिवस 'राष्ट्रीय चमत्कार सत्यशोधन दिन' म्हणून समितीतर्फे दरवर्षी साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर 'चमत्कारांमागील विज्ञान' याबाबत महा अंनिस मार्फत राष्ट्रीय स्तरावरील ऑनलाइन प्रबोधन अभियान आहे. त्या निमित्ताने 'चमत्कार सादरीकरण स्पर्धा' स्पर्धा तीन गटात घेण्याचे ठरले आहे. त्यामध्ये महाराष्ट्र अंनिसचे कार्यकर्ते, कार्यकर्त्यांच्या कुटुंबातील आणि सर्वांसाठी खुला असे गट आहेत. स्पर्धेमध्ये भाग घेताना पुढील नियम समितीच्या http/www.mans.org.in या वेबसाइटवर उपलब््ध आहेत. या स्पर्धेमध्ये व्हिडिओ पाठवण्याची अंतिम तारीख ३१ ऑगस्ट २०२० ही आहे. तसेच समितीचे कार्यकर्ते व अन्य व्यक्ती यांच्यामार्फत चमत्कार सादरीकरणाचे आँनलाईन आयोजन करणाार आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.