गुणवंत विद्यार्थिनींच्या शिक्षणासाठी ग्रामविकास प्रतिष्ठान पाठीशी.
- व्यंकटराव पनाळे अध्यक्ष ग्रामविकास प्रतिष्ठान.
हरंगुळ :- स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने नियोजित "समर्थ माऊली मंदार ग्रामपंचायत" ग्रामविकास प्रतिष्ठान च्या वतीने मंदार येथे सार्वजनिक ध्वजारोहण तसेच गुणवंत विद्यार्थिनींचा सत्कार, कोरोना आजारावर मात करून आलेले वयोवृद्ध रुग्ण आणि सेवानिवृत्त कर्मचारी यांचा सत्कार समारंभ संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष व्यंकटराव पनाळे हे होते.
स्वातंत्र्यदिनाच्या ७३ व्या वर्धापनदिनाचे निमित्ताने १५ ऑगस्ट वार शनिवार रोजी सकाळी ८:३५ वाजता मंदार येथील हनुमान मंदिरासमोरील प्रांगणात सार्वजनिक ध्वजारोहण समारंभ संपन्न झाला. याप्रसंगी छत्रपती श्री शिवाजी महाराज, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रपिता महात्मा गांधी या महापुरुषांच्या प्रतिमांचे आणि भारताचे संविधान या ग्रंथाचे पूजन माजी सरपंच डॉ. राम गजधने, ग्रामपंचायत माजी सदस्य गहिनीनाथराव कोतवाड, हाजी बाबा ऊर्फ इमाम शेख, रामचंद्र तिगीले, हरिश्चंद्र बरुरे यांच्या हस्ते करण्यात आले. संस्कार वर्धिनी विद्यालय लातुर येथे शिक्षक असलेले मंदार येथील हरिश्चंद्र यलबा तिगीले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
ध्वजारोहन समारंभानंतर हनुमान मंदिराच्या सभागृहात ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष व्यंकटराव पनाळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमामध्ये कोरोना महामारीच्या कालावधीमध्ये कोरोना रुग्णांची सेवा करत असताना जे डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी, महसूल कर्मचारी, पोलीस,पत्रकार, सफाई कामगार, मयत कोरोना रुग्णावर अंत्यविधी करणारे कर्मचारी आणि कोरोना योद्धे यांचा मृत्यू झाला त्या सर्वांनाच श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
कोरोना आजारावर मात करून आलेले व्यंकट संगाप्पा चामे मामा या ८५ वर्ष वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिकाचा सत्कार शाल श्रीफळ पुष्पहार देऊन विष्णुदास पाटे यांच्या हस्ते करण्यात आला. पोलीस खात्यामध्ये सेवा करून नुकतेच सेवानिवृत्त झालेले ग्रामस्थ मनोहर बरुरे यांचा सत्कार ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष व्यंकटराव पनाळे यांच्या हस्ते शाल श्रीफळ पुष्पहार देऊन करण्यात आला. समर्थनगर, माऊलीनगर, आणि मंदार या भागातून इयत्ता दहावी परीक्षेत सर्वाधिक गुण घेऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थिनी प्रतिक्षा कांबळे, गायत्री गोरे, नंदिनी खरोसे, मुक्ताई गुरमे यांचा प्रतिष्ठानचे अध्यक्ष व्यंकटराव पनाळे, हरिश्चंद्र तिगीले, जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेतील शिक्षक शिवाजीराव शिवणगे व निवृत्तीराव तिगीले यांच्या हस्ते शाल श्रीफळ पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी बोलताना व्यंकटराव पनाळे म्हणाले की आपल्या परिसरातील मागासवर्गीय, इतर मागासवर्गीय, तसेच गोरगरीब आणि सामान्य कुटुंबातील गुणवंत विद्यार्थिनी तिच्या परिवारातील आर्थिक अडचणीमुळे शिक्षणापासून वंचित राहू नये. याकरिता अशा गुणवंत गरजु विद्यार्थ्यीनींच्या पाठीशी ग्रामविकास प्रतिष्ठान राहील असा विश्वास दिला. तसेच कोरोनाच्या संसर्गापासून दूर राहण्यासाठी प्रशासन काय करेल यापेक्षा आपण स्वतः आपली आणि आपल्या परिवाराची खबरदारी घ्यावी असेही आवाहन केले. यावेळी हरिश्चंद्र तिगीले, विष्णुदास पाटे, मनोहर बरुरे यांनीही मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संभाजी गोरे यांनी केले व सर्वांचे आभार ही व्यक्त केले. कार्यक्रमास रमाकांत करकिले सर, विनोद सूर्यवंशी, ज्ञानोबा रणदिवे, महादेव गुरमे, तुकाराम सोनवणे, सुशील तिगीले, निसराईल शेख, राजकुमार आयलाने, शुभम तिगीले, संभाजी पडिले, गहिनीनाथ बरुरे, पांडुरंग बंडगर, हरिपाल मुळे, सुधाकर चामे, विनोद तिगीले, परमेश्वर काळेवार इत्यादी उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.