विवेक वैराग्य जयासी पुसती आले ते विश्रांती ब्रह्मादिका ही योग्यता 'ज्ञानी' सत्पुरुषांची !
- सदगुरू श्री.गुरूबाबा महाराज औसेकर
अमानित्व अदंभिकत्व,अहिंसा,शांती, आर्जव, आचार्य उपासना,शौच, स्थैर्य, आत्मनिगृह ही ज्ञानी माणसाची गुणलक्षणे माउलींनी वर्णन केल्याचे सांगून 'विवेक वैराग्य जयासी पुसती, आले ते विश्रांती ब्रह्मादिक' ही योग्यता 'ज्ञानी' माणसांच्या ठायी असते हे असे विचार श्री गुरुबाबा महाराज औसेकर यांनी व्यक्त केले आहेत.
नाथ मंदिरात गुरुवार दिनांक 6 ऑगस्ट रोजी नित्य चक्रीभजन सेवेनंतर ज्ञानेश्वरी वरील प्रवचनात ते बोलत होते. तेराव्या अध्यायातील
"ते वाट कृपेची करीतू ! ते दिशाचि स्नेह भरितू !
जीवातळी आंथरीतू ! आपुला जीव !!"
या 250 व्या ओवीनुरूप निरूपणात माउलींनी ज्ञानीचे जी लक्षणे, सद्गुण विषद केली त्याचे विस्तृत विवेचन करताना नऊ लक्षणांनी विभूषित अशा ज्ञानीचे ठाई,आगर्वता, विनम्रता, विवेक वैराग्य, आत्मनिग्रह, अंतकरणाची शुद्धता, सरलता, शांती,अहिंसा हे नांदत असतात. त्यांची वाचा-वर्तन आचरणातून जीवाला अनुभूती येते असे महाराज म्हणतात.
मुळात हे ज्ञानी मुनीजन अधर्माला रोखण्यात अत्यंत सतर्क असतात.असन्मार्गावर वळत असणाऱ्याला, वाममार्गाकडे जाणाऱ्याला अडवून त्याला सन्मार्गावर आणण्यासाठी जिवाचा आटापिटा व काळजी हित करतात.
'अवृष्टीचेनी उपद्रवे, गांजले विश्व अवघे म्हणुन पर्जन्य यष्टि करावे' या अवर्षणाकरिता पर्जन्ययाग-यज्ञ म्हटले आहे, या यज्ञात कर्मकांड अनुसार पशुहत्या करावी लागते मग अशा कर्मातून 'अहिंसा' तत्व जपले असे कसे म्हणता येईल ? पाणी गाळुन पिताना, वृक्षांची तोड करताना, वनस्पती वेलींची नासधूस होताना, आयुर्वेदिक वनौषधी यांची निर्मिती करताना, काही प्रमाणात हिंसा घडते की नाही ? असा सवाल करीत. अधिक काय लोकांच्या पैशावर अथवा त्यांना नाडून ,लुबाडून दुसरीकडे दिमाखात उघडलेली अन्नसत्रे हीदेखील एक प्रकारची अहिंसा ठरते असे महाराजांनी उकल करून सांगितले.
थोडक्यात हिंसेलाच अहिंसा समजल्याने सिद्धांत तत्वांचे पालन होणार नाही हे स्पष्ट केले. ज्ञानी माणसांचे अंतकरण, मन, ज्ञान, त्यांच्या आचरणावरून त्यांची अहिंसात्मक गुणसिद्धता प्रदर्शित होते,कारण आपल्या जीवापेक्षाही हे ज्ञानी दुसऱ्यांच्या जीवाला, हिताला जपतात असे महाराजांनी स्पष्ट केले.
-------------------------------------------------------------------
शब्दांकन- अॅड.शाम कुलकर्णी
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.