मुग व सोयाबीनचे पंचनामे करून भरपाई द्यावी
हिप्परसोगा येथील शेतकऱ्यांचे जिल्हाधिकार्यांना निवेदन
औसा/प्रतिनिधी: तालुक्यातील हिप्परसोगा शिवारात शेतकऱ्यांनी पेरलेला मूग व सोयाबीनवर बुरशीजन्य रोग पसरले असून यामुळे ही दोन्ही पिके हातची गेली आहेत. या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, या मागणीचे निवेदन हिप्परसोगा येथील शेतकऱ्यांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.
अनेक दिवसांपासून ढगाळ वातावरण व रिमझिम पावसाने मूग व सोयाबीन या पिकावर आर्द्रता वाढून करपा, खोडमाशी, स्पोडो पटेरा,आदी रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे.शेंगा पोखरणाऱ्या अळ्यांचाही प्रादुर्भाव झाला आहे. हे आजार दूर करण्यासाठी शेतकऱ्यांनी कृषी अधिकाऱ्यांचा सल्ला घेऊन विविध प्रकारच्या कीटकनाशकांची फवारणी केली. त्याचाही परिणाम झाला नाही. या दोन्ही पिकांची उंची मोठ्या प्रमाणात वाढली असून पिके आडवी पडली आहेत. शेंगांची लागण कमी प्रमाणात झाली असून लागलेल्या शेंगाही गळून जात आहेत.अनेक ठिकाणी सोयाबीनला फक्त पिवळा पाला शिल्लक आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे.
या नुकसानीची पाहणी करून तात्काळ पंचनामे करावेत. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. औसा तहसीलदार,तालुका कृषी अधिकारी आणि सरपंचांनाही या निवेदनाच्या प्रती देण्यात आल्या आहेत.
या निवेदनावर हेमंत पाटील, मारुती चेवले,अमोल सोमवंशी, सचिन पाटील, विठ्ठल सोमवंशी, सुहास पाटील, विनायक चेवले, तुकाराम आळंदकर,संभाजी यादव,महादेव कांबळे,शंकर सोमवंशी आदींसह असंख्य शेतकऱ्यांच्या स्वाक्षर्या आहेत.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.