लातूर जिल्ह्यात तुती लागवडीतून रेशीम उत्पादनाला प्रोत्साहन द्या
पालकमंत्री अमित देशमुख यांचे निर्देश
मुंबई प्रतिनिधी : २७ ऑगस्ट २० :
लातूर जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात तुती लागवड करण्यास उत्सुक आहेत या शेतकऱ्यांना एकत्र करून जिल्ह्यात तुती लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हा यंत्रणेमार्फत विशेष प्रयत्न करण्यात यावेत, असे निर्देश वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.
अलीकडेच नागपूर येथील रेशीम संचालनालयाकडून महारेशिम अभियान राबविण्यात आले होते. या अभियानात तुती लागवड करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांच्या नोंदणीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला होता. या अभियानात लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी तुती लागवडीसाठी मोठ्या प्रमाणात उत्सुकता दाखवली होती. नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना त्याचप्रमाणे मनरेगा या दोन योजनांच्या माध्यमातून तुती लागवडीला प्रोत्साहन दिले जाते. मनरेगाच्या माध्यमातून तुती लागवडीसाठी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून दिले जाते. लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत तुती लागवडीसाठी बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिले जाते. या सर्व अनुकूल गोष्टींचा फायदा घेऊन अधिकाधिक शेतकऱ्यांना तुती लागवडीसाठी प्रोत्साहन द्यावे आणि रेशीम उत्पादनात लातूर जिल्ह्याला आघाडीचे स्थान मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत असे निर्देशही पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.
------------------------------
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.