वांजरखेडा उच्च पातळी बंधार्‍याचे गळती थांबेना

 

  वांजरखेडा उच्च पातळी बंधार्‍याचे गळती थांबेना







लातूर दि.27/08/2020
लातूर तालुक्यातील वांजरखेडा येथील वांजरखेडा उच्च पातळी बंधारा हा लोकनेते विलासराव देशमुख यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आलेला होता. या बंधार्‍यामुळे परिसरातील अनेक गावांचा पाणी प्रश्‍न सुटलेला आहे. परंतु, वांजरखेडा उच्च पातळी बंधार्‍याला गेल्या अनेक वर्षापासून गळती लागलेली आहे. याकडे सबंधीत विभागाने दुर्लक्ष केल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होऊन पाणी वाया जात आहे. त्यामुळे या बंधार्‍याच्या माध्यमातून होणारी गळती तात्काळ थांबविण्यात यावी, अशी मागणी जननायक संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे.
लातूर तालुक्यातील वांजरखेडा येथील वांजरखेडा परिसरातील शेतकर्‍यांचा पाणी प्रश्‍न मिटावा, या भागातील सिंचन क्षेत्र वाढावे यासाठी लोकनेते विलासराव देशमुख यांच्या संकल्पनेतून वांजरखेडा उच्च पातळी बंधारा गेल्या अनेक वर्षापूर्वी उभारण्यात आला. परंतु या बंधार्‍याकडे जलसिंचन विभाग मांजरा प्रकल्पाच्या कार्यकारी  अभियंत्या ठोंबरे यांचे  दुर्लक्ष होत असल्याने बंधार्‍याची गळती मोठ्या प्रमाणात होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे आतातरी जलसिंचन विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी लक्ष देवून वांजरखेडा उच्च पातळी बंधार्‍यातून होणारी गळती थांबवावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा जननायक संघटनेचे लातूर तालुका उपाध्यक्ष बब्रूवान पवार,  श्रीकिसन भिसे, महादेव कदम यांनी दिलेला आहे.
गळतीचा प्रश्‍न मिटेल अशी शेतकर्‍यांची अपेक्षा...!
दरम्यान वांजरखेडा उच्च पातळी बंधार्‍याच्या माध्यमातून होणार्‍या गळतीची माहिती मिळताच माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांचे स्विय सहायक कमलाकर कदम यांनी सदरील गळतीची पाहणी करून याबाबत जननायक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकरांना याबाबतची सविस्तर माहिती दिली. त्यामुळे या गळतीवर नक्‍कीच तोडगा मिळेल, अशी आशा या भागातील शेतकर्‍यांतून व्यक्‍त केली जात आहे.
-----------------------------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या