रोनाचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेवून योग्य नियोजन करा
- पालकमंत्री वर्षाताई गायकवाड
· कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी खासगी डॉक्टरांनी सहभाग देण्याचे आवाहन
हिंगोली,दि.14: जिल्ह्यात सद्य:स्थितीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता लक्षात घेवून जिल्हा प्रशासनाने नियोजन करण्याचे निर्देश पालकमंत्री वर्षाताई गायकवाड यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत वर्षाताई गायकवाड या बोलत होत्या. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी शंकर बरगे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पालकमंत्री गायकवाड म्हणाल्या की, इतर जिल्ह्यापेक्षा हिंगोलीतील कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात असली तरी, मागील काही दिवसांपासून रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने शासकीय डॉक्टर व खासगी डॉक्टर यांच्याशी चर्चा करुन नियोजन करावे. तसेच कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी जिल्ह्यातील खासगी डॉक्टरांनी देखील आपला सहभाग द्यावा,असेही आवाहन यावेळी पालकमंत्री यांनी केले. सद्या जिल्ह्यात लॉकडाऊन सुरु असुन या कालावधीत जिल्ह्यातील कंन्टेमेंट झोन भागातील नागरिकांची तपासणी करावी. कोरोना विरुध्द सर्वांनी एकत्र येवून लढा देण्याची आवश्यकता आहे. जिल्ह्यात वाढणारी रुग्ण संख्या कमी करण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्याची आवश्यकता असल्याचेही पालकमंत्री वर्षाताई गायकवाड यावेळी म्हणाल्या.
यावेळी पालकमंत्री वर्षाताई गायकवाड यांनी खरीप हंगाम पेरणी, पाऊस, अतिवृष्टी नुकसान अनुदान वाटप, पीक कर्ज वितरण, कर्ज मुक्तीसह कोरोना विषयक उपाययोजनांचा आढावा घेतला.
यावेळी विविध विभागाचे विभाग प्रमुख यांच्यासह जिल्ह्यातील तज्ज्ञ डॉक्टर यांची उपस्थिती होती.
****
बँकांनी उद्दीष्टानुसार तात्काळ पिक कर्जाचे वितरण करावे
- पालकमंत्री प्रा. वर्षाताई गायकवाड
हिंगोली,दि.14: खरीप हंगाम 2020-21 करीता जिल्ह्यातील बँकांना पिक कर्ज वितरीत करण्यासाठी 1 हजार 169 कोटी उद्दिष्ट ठरवून देण्यात आले होते. त्यापैकी 57 हजार 343 शेतकऱ्यांना उद्दिष्टाच्या केवळ 340 कोटी म्हणजे 29 टक्के पिक कर्ज वितरीत केले आहे. त्याकरीता सर्व शेतकऱ्यांना तात्काळ पिक कर्ज मिळावे यासाठी बँकांनी त्यांना देण्यात आलेल्या उद्दिष्टानुसार कोणत्याही परिस्थितीत तात्काळ पिक कर्ज वितरण करण्याचे निर्देश जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षाताई गायकवाड यांनी आज दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहात आयोजित आढावा बैठकीत पालकमंत्री प्रा. गायकवाड या बोलत होत्या. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी शंकर बरगे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांची उपस्थिती होती.
यावेळी पालकमंत्री प्रा. गायकवाड म्हणाल्या की, यावर्षी पाऊस चांगला झाला असल्याने शेतकरी बांधवांना पिक कर्जाची आवश्यकता आहे. परंतू अद्यापपर्यंत जिल्ह्यातील 71 टक्के शेतकऱ्यांना पिक कर्जाचे वितरण झालेले नाही. बँका शेतकऱ्यांना पिक कर्ज वितरणाकरीता टाळा-टाळ करुन दिरंगाई करत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. तरी जिल्ह्यातील सर्व बॅंकांनी पिक कर्ज वितरणांसाठी गाव व बॅंक निहाय आराखडा तयार करुन तात्काळ पिक कर्ज वितरण करण्याचे निर्देश पालकमंत्री वर्षाताई गायकवाड यांनी यावेळी दिले.
जिल्ह्यातील अनेक बँकाकडे मनुष्यबळाची कमतरता असल्याने बँक कर्मचारी हे दररोज जास्त वेळ थांबून सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी देखील कामकाज करत आहेत. तसेच बँकेचे सर्व कामकाज हे ऑनलाईन रित्या चालते परंतू याठिकाणी इंटरनेट कनेक्टीव्हीटी ची समस्या असल्याचे बँक व्यवस्थापकांनी आपल्या समस्या यावेळी पालकमंत्री श्रीमती गायकवाड यांच्या पूढे मांडल्या.
यावेळी अग्रणी बँक व्यवस्थापक यांच्यासह जिल्ह्यातील सर्व बँकांचे व्यवस्थापक उपस्थित होते.
****
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.