सामाजिक न्याय भवनच्या धर्तीवर लातूर येथे
महिला व बाल विकास भवनची उभारणी
जिल्हा परिषदेने तातडीने जागा उपलब्ध करून द्यावी
पालकमंत्री अमित देशमुख यांची सूचना
लातूर प्रतिनिधी: १५ऑगस्ट २०
महिला व बाल विकास विभागामार्फत राबविण्यात येणार्या योजनांची विविध शासकीय कार्यालये एकाच छताखाली आणून त्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सामाजिक न्यायभवनच्या धर्तीवर लातुरात महिला व बालविकास भवन उभारण्यात येणार असून त्यासाठी जिल्हा परिषदेने त्वरीत जागा उपलब्ध करून द्यावी, अशी सूचना वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्य मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी केली आहे.
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून लातूर येथे महिला व बाल विकास भवन या कार्यालयाची प्राथमिक सुरुवात पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आली. या कार्यक्रमात जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा भारतबाई सोळुंके, महिला व बालविकास सभापती ज्योतीताई राठोड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, उपमुख्य अधिकारी प्रभू जाधव, उपमुख्य अधिकारी देवदत्त गिरी, मुख्य लेखाधिकारी रत्नाकर जवळेकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. परगे तसेच सर्वश्री मसलगे, पौळकर, बिरादार, रौफ शेख, सलगर, सोनवणे आदी पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना पालकमंत्री अमित देशमुख म्हणाले की मुख्यमंत्री मा. उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री मा. अजित पवार, महसूल मंत्री मा. बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात राज्य सरकार राज्यातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न करीत आहे. शासनाच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न होत आहेत. राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री श्रीमती यशोमती ठाकूर यांनी त्यांच्या खात्यामधून राबवण्यात येणाऱ्या योजनांची अंमलबजावणी योग्य पद्धतीने होण्यासाठी आणि लाभार्थ्यांपर्यंत या योजना सुलभ पद्धतीने पोहोचण्यासाठी सामाजिक न्यायभवनच्या धर्तीवर महिला व बाल विकास भवन उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या नव्या संकल्पनेनुसार जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी, महिला आर्थिक विकास मंडळाचे कार्यालय, एकात्मिक बालविकास सेवा योजना अधिकारी ही सर्व कार्यालये एकाच छताखाली आणण्याचा निर्धार त्यानी केला असून त्यादृष्टीने लातूर येथे लवकरच महिला व बाल विकास भवन उभारण्यात येणार आहे. लातूर जिल्हा परिषदेने या भवनसाठी तातडीने जागा उपलब्ध करून दिल्यास लातूरच्या लौकिकाला साजेल असे भवन येथे तात्काळ उभारण्यात येणार आहे असेही पालकमंत्री देशमुख यांनी यावेळी सांगितले. जिल्हा परिषदे अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांची अंमलबजावणी योग्य पद्धतीने व्हावी, असे नमूद करून जिल्ह्यातील कोविड१९ चा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत त्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य राज्य शासनामार्फत करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. प्रारंभी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी प्रास्ताविक केले.
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी या प्रसंगी बोलताना पालकमंत्री देशमुख यांच्या सूचनेला सकारात्मक प्रतिसाद देत महिला व बाल विकास भवनसाठी लगेच जागा उपलब्ध करून दिली जाईल, असे सांगितले तसेच पालकमंत्री यांनी या कार्यक्रमासाठी वेळ दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले.
------------------------------
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.