मनपाच्या ॲंटीजेन चाचणी मोहिमेस उस्फुर्त प्रतिसाद जास्तीत जास्त लातूरकरांनी चाचणी करून घ्यावी -महापौर, उपमहापौरांचे आवाहन

 

मनपाच्या ॲंटीजेन चाचणी मोहिमेस उस्फुर्त प्रतिसाद 

जास्तीत जास्त लातूरकरांनी चाचणी करून घ्यावी -महापौर, उपमहापौरांचे आवाहन





दिनांक ११ ते १३ ऑगस्ट दरम्यान विविध अत्यावश्यक सेवेत कार्यरत व्यक्तींच्या चाचण्याना प्राधान्य - आयुक्त 

लातूर /प्रतिनिधी: लातूर शहराला कोरोनामुक्त करण्यासाठी पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांच्या सूचनेवरून  महापालिकेच्यावतीने विशेष अभियान सुरू करण्यात आले असून या अंतर्गत सुरु करण्यात आलेल्या चाचणी मोहिमेस पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अनेकांनी स्वतः ची चाचणी करवून घेतली यामध्ये प्रामुख्याने पत्रकार, पोलिस, शासकीय अधिकारी कर्मचारी व व्यापारी यांचा समावेश होता.
 या मोहिमेअंतर्गत जास्तीत जास्त लातूरकरांनी चाचण्या करून घेण्याचे आवाहन महापौर विक्रांत गोजमगुंडे व उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांनी केले आहे. 
दिनांक ११ ते १३ ऑगस्ट या कालावधीत शहरातील केवळ अत्यावश्यक सेवा  पुरविणाऱ्या घटकांच्या चाचण्या प्राधान्याने केल्या जाणार असून दुसऱ्या टप्प्यात इतर सर्व व्यावसायिकांच्या चाचण्या करण्यात येणार असल्याची माहिती पालिकेचे आयुक्त देविदास टेकाळे यांनी दिली.
   लातूर शहराला कोरोनामुक्त करण्यासाठी महापालिकेने विशेष चाचणी मोहीम सुरू केली आहे.याअंतर्गत सोमवारी मोठ्या प्रमाणात चाचण्या करण्यात आल्या. महापालिकेने ५० हजार चाचण्यांचे महत्त्वाकांक्षी लक्ष निर्धारित केले असून लॉकडाऊन शिथील होण्यापूर्वी  कोरोनायोद्धे, हॉटस्पॉट मधील सर्व नागरिक, अत्यावश्यक  सेवा आस्थापना आदी ठिकाणी काम करणाऱ्यांची चाचणी  करण्याचे नियोजन पालिकेने केले आहे.
  सोमवारी पालिकेच्या चाचणी मोहिमेअंतर्गत शहरातील पत्रकार, व्यापारी आणि पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या तपासण्या करण्यात आल्या. टाऊन हॉल शिव छत्रपती वाचनालयात शहरातील पत्रकारांनी आपली चाचणी करून घेतली. गांधी चौक पोलीस ठाणे, विवेकानंद पोलीस ठाणे, एमआयडीसी व शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्याही तपासण्या यावेळी करून घेण्यात आल्या. महापौर विक्रांत गोजमगुंडे, उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांनी विविध ठिकाणी भेटी देऊन या मोहिमेची पाहणी केली.
    तपासणी मोहीम यशस्वी करण्यासाठी महापालिकेच्यावतीने १५ टीम गठीत करण्यात आल्या आहेत. प्रत्येक टीममध्ये एक प्रयोगशाळा तंत्रज्ञ, एक आरोग्य सेविका व एका संगणक परिचालकाचा समावेश आहे.या टीम निर्धारित  ठिकाणी तपासण्या करणार आहेत.शहरातील विविध घटकांनी,नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने तपासण्या करून घेण्याचे आवाहन महापौरमहापौर विक्रांत गोजमगुंडे व उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांनी केले आहे.

चौकट १
 ७ केंद्रावर होणार चाचण्या ..
महापालिकेच्या वतीने विशेष  मोहिमेअंतर्गत ॲंटीजेन चाचण्या करण्यासाठी सात केंद्र निर्धारित करण्यात आली आहेत. कव्हा रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर न्याय भवन येथील विलगीकरण केंद्र, औसा रोडवरील पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील  विलगीकरण केंद्र, डॉ.बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे शिवछत्रपती ग्रंथालय, बसवेश्वर महाविद्यालय, साळे गल्लीतील यशवंत विद्यालय ,राजस्थान विद्यालय आणि दयानंद महाविद्यालयात या चाचण्या केल्या जाणार आहेत.

चौकट २
आगामी तीन दिवसात कोणाची होणार तपासणी ?
लॉकडाऊन शिथील होण्यापूर्वी दिनांक ११, १२ व १३ ऑगस्ट या तीन दिवसात विविध घटकांच्या चाचण्या केल्या जाणार आहेत. पालिकेने निश्चित केलेल्या सात केंद्रावर सकाळी ९ ते २ या कालावधीत या चाचण्या होणार आहेत. या तीन दिवसात किराणा होलसेल व किरकोळ विक्रेते, त्यांच्याकडे काम करणारे कर्मचारी, भाजीपाला विक्रेते, दुध व फळ विक्रेते, वर्तमानपत्र वितरक, औषध विक्रेते व कर्मचारी, आरोग्य सेवक पेट्रोल पंपावरील कर्मचारी व गॅस विक्रेते, पाणी व बर्फ विक्रेते, मांस विक्रेते, तसेच त्यांचे कर्मचारी आणि स्वस्त धान्य दुकानदारांच्या तपासण्या केल्या जाणार असल्याची माहिती आयुक्त देविदास टेकाळे यांनी दिली.

चौकट ३
 इतरांसाठी तपासणी कार्यक्रम लवकरच..
लातूर शहरात जास्तीत जास्त नागरिकांच्या ॲंटीजेन तपासण्या करण्याची मोहीम महापालिकेने आखली आहे. या कालावधीत अत्यावश्यक सेवेतील घटकांच्या पहिले तीन दिवस चाचण्या झाल्यानंतर उर्वरित घटकांसाठी तपासणीचा कार्यक्रम लवकरच जाहीर केला जाणार आहे. या टप्प्यात बँकेतील अधिकारी व कर्मचारी,ऑटो रिक्षा चालक , आडत व्यापारी, हमाल- मापाडी, वकील व इतर सर्व व्यावसायिक आस्थापना व्यापारी यांच्या तपासण्या केल्या जाणार आहेत. प्रत्येक घटकाने तपासण्यांसाठी सहकार्य करावे, असे आवाहनही पालिका आयुक्त देविदास टेकाळे यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या