‘तेल्हारा येथील मुस्लीम समाजातील खरमुरे विकणाऱ्याची मुलगी झाली अन्नपुरवठा निरिक्षक’-मराठा दाम्पत्यांची घडविले जिवन.
विशेष रिपोर्ट......
‘बेटा तुम्हारे दो रुपए जादा आ गए, पाच रुपए के खरमुरे और तीन रुपए की तीळपट्टी हो गई, आपके दो रुपये वापस लो!’ ‘शुक्रीया अंकल, आप जैसे इमानदार लोक है, इसिलिए इन्सानियत जिंदा है!’ ‘बेटा, मेहनत की कमाई इंसान को भूख और नींद देती है..!’ त्यानंतर खरेमुरे विकणारे अंकल मशीदमध्ये गेले.
‘अल्ला हो अकबर अल्ला...’ नमाज पठाण झाले. ‘हे खुदा इस धरती के हर लाल को खूश रखना, उसकी कामना पुरी करना,’ निसार अली तवंगर अली (तेल्हारा) यांचे नमाज पठणानंतरचे हे बोल. शिक्षणाचा गंध न नसलेले; पण अत्यंत सुस्वभावी, सकारात्मक व्यक्तीमत्त्व. पोटापाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी खरेमुरे विक्रीचा व्यवसाय. स्वतःसह घरातील सात जणांचा उदरनिर्वाह व मुलामुलींचे शिक्षण हे केवळ खरमुरे, गुळपट्टी, तीळपट्टीच्या व्यवसायावर अवलंबून. घरापासून अडीच-तीन किलोमीटर अंतरावर असणाऱ्या पिक्चर टॉकीजसमोर हातगाड्याचे दुकान लावायचे. यासाठी घरातून सकाळी नऊ वाजता बाहेर पडायचे, ते थेट रात्री १२ वाजताच घरी यायचे. मजुरी पडायची केवळ सव्वाशे-दिडशे आणि पिक्चर खूप चालणारा असेल तेव्हाच पावने दोनशे रुपयांपर्यंत. या मजुरीवर सात पोट, तिघांचे शिक्षण आणि इतर सांसारिक खर्च... हे सातजण म्हणजे पत्नी अमिना निसार अली, मुलगी समीना निसार अली, मुलगा समीर निसार अली, मुलगी रुहीना निसार अली, यांच्यासह सोबत सासरा व एक मेव्हणा. एवढे हे कुटूंब. विचार करण्यासारखी गोष्ट म्हणजे शे-दिडशे रुपयांत सात जणांचा उदरनिर्वाह कसा होत असेल...? निसार अली तवंगर अली यांचे तीनही लेकरं खूपच अभ्यासू, अत्यंत काटकसरीने त्यांनी शिक्षण घेतले. खुल्या प्रवर्गातील (ओपन कॅटेगरी) असल्यामुळे शिष्यवृत्तीही त्यांना मिळाली नाही. समाजात शिक्षणाबाबत हवी तशी जागृती नाही, अज्ञानामुळे मुलींच्या उच्चशिक्षणाला अजूनही बऱ्याच ठिकाणी विरोधच. तेल्हारा (जि. अकोला) म्हणजे ग्रामीण भागच...मग या भागातील समाजबांधव व नातेवाईकांनी निसार अली तवंगर अली व त्यांच्या पत्नी अमिना निसार अली यांना मुलींना न शिकविण्याचे सल्ले देणारे, उपदेश करणारे अनेक भेटले. ‘मुली हुशार आहेत, जेवढं शिक्षण घेतील तेवढं घेऊ द्यायचं.’ असे ठामपणे अमिनाआई निसार अली म्हणायच्या. अशी आई मुलींच्या शिक्षणासाठी ठाम असल्यावर शैक्षणिक क्रांती करणे, कोणाला बरे जमणार नाही!! वडील जरी अशिक्षित अन् सोबत अठराविश्वे दारिद्र्य असले तरी कपडेलत्ते, खाण्यापिण्यात जरी थाट पुरविता आला नसेल पण शिक्षणात शक्यतो काही कमी पडू न देण्याचा त्यांचा निर्धार... वडील सकाळी नऊ वाजता बाहेर पडतात अन् रात्री १२ वाजताच घरी येतात, हे कष्ट पाहून त्यांची लहानी मुलगी रुहीनाताईने अत्यंत संघर्ष केला.
अन् एकदिवस सर्वच प्रसारमाध्यमांवर बातमी गाजली. ‘तेल्हारा येथील मुस्लीम समाजातील खरमुरे विकणाऱ्याची मुलगी झाली अन्नपुरवठा निरिक्षक’ ही बातमी आयबीएन लोकमत, टीव्ही-९, एबीपी माझा, सह्याद्री, जनादेश या वृत्तवाहिन्यांसह सकाळ, लोकमत, देशोन्नती, पुण्यनगरी यांसारख्या सर्वच वर्तमानपत्रातून झळकली. रुहीनाताईचे वडील, आई, भाऊ, बहीण यांचे नाव जगासमोर आले; पण ताईंच्या पडद्यामागचे खरे नायक समोर आले नाहीत. ते जेव्हा शोधले, तेव्हा समोर आले, (लोकांच्या भाषेत सांगायचे झाल्यास) मुस्लीम समाजातल्या मुलीला मराठा समाजातील दाम्पत्याने केलेले सर्वोतपरी (तन-मन-धन)सहकार्य. अन् तेच खरे रुहीनाताईंच्या यशामागील पडद्यामागचे नायक ठरले, ते आहेत प्रा. योगेश कोरपे व त्यांच्या पत्नी शिक्षिका अनुराधा योगेश कोरपे. हे दोघेही तेल्हारा येथे राहतात व ज्ञानदानाचे कार्य करतात.
या दाम्पत्याचे विचार-‘‘माणूस कोण्याही जाती-धर्मातला असो, तो केवळ माणूसच असतो. तो मराठा, मुस्लिम, मारवाडी, मातंग, बौद्ध, ब्राम्हण नसतोच मुळी. कळपाकळपांमध्ये राहावे लागते, म्हणून समाजाचे लेबल लावावं लागतं, ही सर्वांचीच अवस्था. माणूस जन्मतो अन् लगेच त्याला जातीधर्मात अडकविले जाते, अन तो जगतोही जातीधर्माच्या चौकटीतच, पण या चौकटीच्याही पलीकडे पाहण्याची नजर म्हणजेच समदृष्टी असणाऱ्यांना फक्त माणूसच दिसतो, तर भेद्यांना सख्या भावांमध्येही विषमता दिसत असते. मनुष्य सोबत काय नेतो? याचे उत्तर शोधून माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे एवढेच.’’
रुहीनाने तेल्हारा येथील इंदिरानगरच्या जिल्हा परिषद शाळेत पहिली ते सातवीपर्यंत शिक्षण घेतले. त्यानंतर तेल्हारा येथीलच नवयुग विद्यालयात आठव्या वर्गात प्रवेश घेतला. तेथे शिक्षिका होत्या, आहेत अनुराधा योगेश कोरपे. त्यांनी रुहीनाची बुद्धीमत्ता अन् परिस्थिती दोन्हीही समजून घेतल्या. रुहीना उन्हाळ्यापासूनच एक-दोन लेटरबुकसाठी पैसे जमवून ते विकत घेत असे. एकाचवेळेस सर्वच लेटरबुक तीला कधीच विकता घेता आले नाही, मग अशा परिस्थितीत पुस्तकही दुरूच असतं. हे पुस्तकं पुरविण्याचे, फी भरण्याचे काम शिक्षिका अनुराधाताईंनी केले. हे करीत असताना त्यांना तेवढीच खंबीर साथ लाभली ती त्यांचे पतीराज योगेश कोरपे सरांची. प्रा. नंदागवळी सर व रौंदाळकर सर यांचेही सहकार्य रुहीनाला लाभले. अनुराधाताईंनी आईच्या ममतेने वेळोवेळी मार्गदर्शन केले. रुहीनाला दहावीमध्ये ८५ टक्के गुण मिळाले. जिच्या घरात अठराविश्वे दारिद्र्य तीने ८५ टक्के गुणांची संपत्ती मिळविली. तेव्हाच अनुराधाताईंनी या मुलीला घडविण्याचा निर्धार केला. केवळ पोकळपणा नव्हे तर परतफेडीची अपेक्षा नसणारी आर्थिक मदत केली. रुहीनाने जेव्हा तेल्हारा येथीलच शिवाजी शिक्षण संस्थेच्या गोपालराव खेडकर विद्यालयात अकरावीसाठी प्रवेश घेतला, तेव्हा तेथे खंबीर साथ मिळाली ती प्रा. योगेश कोरपे सरांची. योगेश कोरपे सरांनी तिला वेळोवेळी मार्गदर्शनासह पैसेही पुरविले. तिला बारावीमध्ये ८४ टक्के गुण मिळाले. त्यानंतर कोरपे दाम्पत्यांनी रुहीनाची घरची परिस्थिती पाहून बारावीनंतर डी.एड. करायला लावले. डी.एड.ची कॉलेजची फी सुद्धा कोरपे सरांनी भरली. दुसऱ्या वर्षाची फी त्यांना भरण्याची गरज पडली नाही, कारण रुहीनाची परिस्थिती पाहून संस्थाचालकांनी तीच्याकडून फी घेतली नाही. त्या परिस्थितीची जाणीव कोरपे सरांनी त्यांना करुन दिली होती.
डी.एडनंतर रुहीनाने बीएचेही शिक्षण घेणे सुरू केले. सोबतच तेल्हाऱ्यातच शिकवणी वर्ग घेणे सुरू केले व त्यासाठी प्रा. योगेश कोरपे सरांनी त्यांची स्वतःच्या घरातील एक रुम विनाःशुल्क उपलब्ध करुन दिली. हे सुरू असताना रुहीना ताईंनी एका कॉन्व्हेंटमध्ये नोकरी करणेही सुरू केले अन् यासोबत सुरू होता स्पर्धा परीक्षेचा अभ्यास. खरे पाहिले तर अभ्यासासाठी वेळच मिळत नव्हता. कॉन्व्हेंटमध्ये कीती काम करवून घेतात, हे सर्वांनाच माहिती आहे. त्यानंतर शिकवणी वर्ग अन् त्यांनतर अभ्यास...अभ्यासासाठी वेळ मिळत नव्हता म्हणून दोन वर्षानंतरच रुहीनाताईने कॉन्व्हेंट सोडले. अन् त्यानंतर असा प्रवास सुरू केला- सकाळी पावणे पाचला उठणे, सहा वाजेपर्यंत अंघोळ करुन फ्रेश होणे, सकाळी ७ ते ९ ट्यूशन, ९ ते ३ लायब्ररी, दु.३- सायं ७ पर्यंत ट्यूशन, ७ ते १० स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत स्वतःच्या घरी प्रश्नोत्तरांबाबत चर्चा...त्यानंतर रात्री १०ते १, तर कधी कधी झोप न लागेपर्यंतही अभ्यास, अशातच कधी कधी रात्रीचे दोन-तीनही वाजायचे...असा केवळ एक वर्षच अभ्यास केला अन् रुहीनाताई एमपीएससीची परीक्षा देऊन पहिल्याच प्रयत्नात अन्नपुरवठा निरिक्षक झाली. प्रत्येक बी मध्ये उगवण क्षमता असतेच हो...पण त्या बियाला हवे ते मिळवून देणारा शेतकरीच लाभला नाहीतर...?.रुहीनाला सर्व गोष्टी पुरविणारे कोरपे दाम्पत्यच तिला यश मिळवून देण्यात कारणीभूत ठरले. ((रुहीनाताईची दहावी २००९, बारावी २०११, डीएड २०१४ बीए २०१७ तर नोकरी ८ सप्टेंबर २०१७ मध्ये मिळाली.))
रुहीनाताईची मोठी बहिण समीनाताई हिने गुणवंत असूनही अकरावी-बारावीमध्ये ॲडमिशन घेतली नाही. ही बाब शिक्षिका अनुराधाताई कोरपे यांनी त्यांचे पती प्रा. योगेश कोरपे यांच्या निदर्शनास आणून दिली. सरांनी समीनाताईला केवळ बारावीच नव्हे तर बी.ए.सुद्धान करायला लावले. समीनाताईला राज्यशास्त्र विषयात गोल्ड मेडल मिळाले. राज्यपालांच्या हस्ते त्यांना पदक मिळाले. आज समीनाताई, त्यांचे मोठे बंधू समीरभाऊ हे सुद्धाा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करीत आहेत. समीरभाऊंनी तीन वर्ष वर्तमानपत्र वाटण्याचे काम केले. त्यातून त्यांना एक हजार रुपये मिळत. आज रोजी भावंडांमध्ये लहान असलेली रुहीनाताईने कुटूंबियांचा सर्व खर्च उचलला आहे. रुहीनाताईंची आई अमीनाआई अली म्हणतात, ‘‘रुहीनाचा जन्म झाल्यानंतर आमची चहाचीही सोय नव्हती. एवढी बिकट परिस्थि्ती होती. तिने आर्थिक दारिद्र्य दूर तर केलेच, शिवाय समाजात मान-सन्मानही मिळवून दिला. कोरपे दाम्पत्यांसारखे पाठीराखे सर्व गुणी मुलींना लाभावेत.’’
प्रा. योगेश कोरपे सरांचे एवढेच कार्य नाही, तर त्यांनी वेगवेगळ्या समाजातील तीन बेरोजगार युवकांना स्वतःच्या मालकीचा रोजगार मिळवून दिला. नवशाद शहा, सचिन थाटे, अमोल जवंजाळ हे अनुक्रमे मुस्लीम, शिंपी व मराठा समाजातील आहेत. त्यांना नेट कॅफेसाठी पूर्ण आर्थिक मदत केली. त्याचे नाव ‘फ्रेंडस नेट कॅफे’ ठेवले. पहिल्याच महिन्यात या तिघांनाही सात हजार रुपये प्रत्येकी निव्वळ नफा मिळाला. आज या एका नेट कॅफेचे दोन नेट कॅफे झाले आहे. कोरपे दाम्पत्य हे विद्यार्थ्यांना पासेस काढून देणे, स्कूल बॅग देणे, परीक्षा फी भरणे ही कामे सर्रास करतात. यामध्ये एका वर्षात त्यांचे ४० ते ५० हजार रुपये खर्च होतात. शाडूचे गणपती विकून पर्यावरण संरक्षणाचे कामदेखील प्रा. कोरपे सर करतात. या कामी नवशाद शहा नावाचे मुस्लीम युवकही त्यांना मदत करतात. गणपतीच्या मूर्ती अाणण्यापासून तर विकण्यापर्यंतचे काम शहा करतात.
तर अशीच या निमित्ताने सांगायची सत्यकथा म्हणजे रुहीना ताई जेव्हा वाशीममध्ये रूजू व्हायच्या होत्या, तेव्हा काहींनी त्यांना रुम देणे टाळले, स्पष्टच सांगायचे म्हणजे मुस्लीम युवतीला हिंदूंच्या घरामध्ये रूम दिली जात नव्हती; परंतू शिक्षिका अनुराधा कोरपे यांची वाशीम येथील मैत्रीण संगीता काळे या मराठा समाजातील महिलेने रुहीना अली व त्यांच्या आई अमिना निसार अली, भाऊ समीर अली यांना या तिघांना रुम मिळेपर्यंत स्वतःच्या घरी आठ दिवस ठेवले. राहण्याची, खाण्याची व्यवस्था केली, ती वेगळी नव्हे, तर घरी आलेल्या पाहुण्या बहिणीची एखादी महिला जशी सोय करते, अगदी तशीच सोय संगीताताई काळे यांनी केली. धन्य हे कोरपे दाम्पत्य अन् धन्य संगीताताई काळे... रक्ताच्या नात्यांनाही तासभरही जवळ न करण्याची आजकालची वृत्ती अन् दुसरीकडे अशी उदाहरणं... या उदाहरणांसारखी सकारात्मता भारतीय समाजामध्ये ठायी ठायी असेल; पण ती समोर येणेही गरजेचे आहे. काही ठिकाणी मुस्लीम समाजाकडूनही इतर समाजबांधवांना निश्चितच मदत होत असेल, अन् त्यामुळे कोणाचे आयुष्य घडले असेल, अशी उदाहरणं असतील, आहेत. ह्या सर्व बाबी आजच्या जात-धर्माच्या नावावरुन समाजमन तंग झालेल्या अवस्थेत समोर येणे गरजेचे आहे. (कृपया संपर्क साधावा)
असो...कोरपे दाम्पत्यांनी एकप्रकारे जोतीबा फुले-सावित्रीआई फुले यांच्या पाऊलवाटेवर पाऊल ठेवले आहे. रुहीनाताईसारखी एक मुलगी त्यांनी घडविली. यातच त्यांचे समाधान सामावले आहे. रुहीनाताईंच्या हाती जेव्हा पहिला पगार आला, त्यावेळी ताईने शिक्षिका अनुराधा ताई यांच्यासाठी साडी, त्यांच्या दोन लेकरांसाठी ड्रेस, व प्रा. कोरपे सरांसाठी गजानन महाराजांची एक प्रतिमा विकत घेतली, त्यांना दिली. आजही आताही रुहीनाताई यांच्या व्हॉटसॲप अकाऊंटवर कोरपे दाम्पत्याचा फोटो आहे. केवळ व्हॉटसॲप अकाऊंटवर नव्हे तर रुहीनाताई व अली कुटूंबियांच्या काळजामध्ये कोरपे दाम्पत्य आहे. रुहीनाताई व त्यांच्या भावंडांना केवळ दोनच ड्रेस असत. रुहीनाताईचा जेव्हा सत्कार ठेवण्यात आला, त्यावेळी अनुराधा कोरपे ताईंनी या कार्यक्रमासाठी एक नवीन ड्रेस घेऊन दिला. कोरपेंच्या घरामध्ये-कीचन रुममध्ये स्वतःच्या आईवडीलांच्या घरात वावरावे, अशाप्रकारे रुहीनाताई वावरते. त्याला कारण म्हणजेच कोरपे दाम्पत्याची माया. कोरपे कुटूंबियांच्या घरातील हाताने बनविलेले दिवाळीचे फराळं अली कुटूंबियासाठी राखीव असतेच, तर अली कुटूंबियांची ईद कोरपे कुटूंबियांनी शिरखुरमा पिल्याशिवाय साजरी होतच नाही. कोरपे दाम्पत्याचे कार्य निश्चितच दखल घेण्याजोगे, प्रेरणादायी व समाजाला नवी दिशा देणारे आहे.
‘‘हे ईश्वरा, असे कार्य करणाऱ्या माणसांची खूप गरज आहे रे...या जातीवादाला, धर्मवादाला सामान्य माणूस कंटाळला आहे. मतांवर नजर ठेवून दुही निर्माण करणाऱ्यांना तू बुद्धी दे...येथे कोणी दलित नाही, कोणी सवर्ण नाही, फक्त आहेत माणसं....माणसासारखेच!! एकाच लाल रक्ताचे, नातेही एकाच प्राणवायुशी, अन् सर्वांची आगही पोट भरण्याचीच..‘मला माणसांत मिसळायचं आहे...जाती किंवा धर्मात नाही’ हे जर प्रत्येकाने ठरवलं अन् तसं वागलं तर पृथ्वीसारखे राहण्याचे अन् सुखा-समाधानाने जगण्याचे दुसरे ठिकाण असणार नाही...
रुहीनाताईच्या संघर्षाला सलाम व ज्यांच्यामध्ये खरा राम वसलेला आहे अशा कोरपे दाम्पत्याला सस्नेह प्रणाम.’’
विनोद बोरे सर
मेहकर बुलढाणा
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.