*माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेअंतर्गत...
राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्याकडून सुमठाणा येथे नागरिकांची आरोग्य तपासणी*
लातूर/उदगीर,दि.26 (जिमाका):- महाराष्ट्र राज्य कोविड मुक्त करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून राज्यात दिनांक 15 सप्टेंबर 2020 पासून माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम राबविण्यात येत आहे. याअंतर्गत राज्यातील शहरी व ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची आरोग्य तपासणी आरोग्य पथकाकडून केली जात आहे.
उदगीर तालुक्यातील सुमठाणा येथे पर्यावरण, भूकंप पुनर्वसन, संसदीय कार्य, पाणीपुरवठा व स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी आरोग्य पथकातील कर्मचाऱ्यांकडून "माझे कुटुंब माझी जबाबदारी" मोहिमेअंतर्गत कशा पद्धतीने गावातील प्रत्येक कुटुंबाची आरोग्य तपासणी करून त्याच्या नोंदी कशा ठेवल्या जात आहेत याची माहिती जाणून घेतली व या वेळी श्री बनसोडे यांच्या हस्ते सुमठाणा ग्रामस्थांची प्रातिनिधिक स्वरूपात स्वतः आरोग्य तपासणी करण्यात आली.
यावेळी राज्यमंत्री बनसोडे यांनी या मोहिमेअंतर्गत कुटुंबातील प्रत्येक सदस्यांची आरोग्य तपासणी करावी. शहरी व ग्रामीण भागातील एक ही नागरिक आरोग्य तपासणी पासून वंचित राहणार नाही याची दक्षता आरोग्य यंत्रणेने घ्यावी व लातूर जिल्हा कोरोना मुक्त करण्यासाठी शासन व प्रशासनाला नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले.
लातूर जिल्ह्यात 1हजार 535 आरोग्य पथकांची स्थापना प्रशासनाने केली असून या पथकामध्ये 199 पथके शहरी भागासाठी असून 1336 पथकामार्फत ग्रामीण भागातील नागरिकांची तपासणी केली जात आहे. जिल्ह्यातील जवळपास 4 लाख 29 हजार कुटुंबाची आरोग्य तपासणी या मोहिमेअंतर्गत आरोग्य पथकाकडून दिनांक 15 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर 2020 व दिनांक 14 ऑक्टोबर ते 24 ऑक्टोबर 2020 या दोन टप्प्यात केली जाणार आहे. या मोहिमेचा जिल्हास्तरीय शुभारंभ पालकमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते अहमदपूर येथून दिनांक 15 सप्टेंबर 2020 रोजी करण्यात आलेला आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.