धनगर आरक्षणासाठी औशात तरुणांचा रस्ता रोको.

 धनगर आरक्षणासाठी औशात तरुणांचा रस्ता रोको..... 





एस ए काझी 


औसा प्रतिनिधी /- धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या यादीत अ क्र 36 नुसार देण्यात आलेल्या आरक्षणाची अंमलबजावणी  स्वातंत्र्याच्या 70 वर्षात झाली नसल्याने धनगर समाज सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि राजकीय क्षेत्रात मागास राहिला आहे. भारतीय घटनेनुसार धनगर जमातीचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश असूनही धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मिळत नसल्याने प्रमाणपत्राची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी औसा तालुक्यातील तरुण दि. 12 ऑक्टोंबर रोजी रस्त्यावर उतरले. धनगर आरक्षणाची तातडीने अंमलबजावणी करावी या मागणीसाठी तरुणांनी औसा येथील टी - पॉइंटवर रास्ता रोको करीत सरकारचे धनगर आरक्षणा कडे लक्ष वेधले. धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र देण्याची तात्काळ अंमलबजावणी करण्यासाठी स्वातंत्र्याच्या 70 वर्षांत विविध राजकीय पक्षाने हुलकावणी दिली. सर्वच राजकीय पक्षांनी धनगर  समाजावर आता पर्यंत घोर अन्याय केल्याने समाज अनुसूचित जमातीच्या सवलतीपासून वंचित राहिला. परिणामी समाजाचा विकास खुंटला. धनगर समाजाच्या विविध मोर्चे आणि आंदोलनात विविध राजकीय पक्षातील नेत्यांनी धनगर समाजाचा भ्रमनिरास केल्याने संतप्त  तरुणांनी सोमवारी दि. 12 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता औसा टी - पॉइंट येथे रास्तारोको केला. या आंदोलनामुळे तासभर वाहतूक खोळंबली. रास्ता रोको आंदोलनात सकल धनगर समाजाचे तरुण कार्यकर्ते सहभागी झाले होते. धनगर आरक्षणाची अंमलबजावणी करावी या मागणीचे निवेदन शिष्टमंडळाने औसा तहसीलदार यांना सादर केले. या निवेदनावर विशाल काळे, अरुण देवकाते, महादेव कांबळे, तानाजी कांबळे आदींच्या सह्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या