कोरोनाच्या सावटाखाली शाळा सुरू ; विद्यार्थी/पालकांत संभ्रम कायम...
औसा प्रतिनिधी /- मार्च 2020 पासून कोरोना विषाणूंच्या संसर्गामुळे शैक्षणिक संकुल बंद होती. 8 महिन्यानंतर दि. 23 नोव्हेंबर 2020 रोजी कोरोनाच्या सावटाखाली अखेर शाळेची घंटा वाजली. इयत्ता 9 वी पासून पुढील वर्ग सुरू करण्याचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला. कोरोना विषाणूंच्या भीती सोबत शाळा सुरू झाल्या असल्या तरी विद्यार्थी आणि पालकांत संभ्रम कायम आहे. प्राथमिक शाळा अद्यापही बंदच आहेत. त्यातच कोरोना विषाणूंची दुसरी लाट येण्याची भीती व्यक्त केली जात असून विद्यार्थी पालकात संभ्रमावस्था आहे. प्राथमिक शिक्षण हा शिक्षणाचा मूळ पाया असून शैक्षणिक वर्ष वाया गेल्यात जमा आहे. दोन दिवसापूर्वी शाळा सुरू झाल्या असल्या तरी पालक व विद्यार्थ्यांची मनस्थिती स्थिर नाही. एकीकडे शैक्षणिक वर्ष वाया जावून शैक्षणिक नुकसान होत आहे, तर दुसरीकडे कोरोना विषाणू सारख्या महाभयंकर रोगाची भीती असल्याने पालक विद्यार्थी वर्गात कोरोनाचे दडपण आहे. दुसर्या लाटेची शक्यता वर्तवली जात असल्याने सर्व शिक्षक व मुख्याध्यापकांची कोरोना टेस्ट होणे आवश्यक आहे. तसेच हा रोग संसर्गजन्य असल्याने समूह संसर्गाची सर्वाधिक भीती आहे. सोशल डिस्टन्स, आरोग्य सेतू ॲप नियमांचे पालन कसे होणार ? मोठ्या शाळेत विद्यार्थी संख्या अधिक असल्याने गर्दी कशी टाळायची असे अनेक प्रश्न भेडसावत आहेत. पालक वर्गात आपल्या पाल्याच्या आरोग्याची काळजी वाढत आहे. शाळेत पाठवावे तर कोरोनाची भीती.... नाही पाठवले तर अभ्यासक्रम बुडाल्याने शैक्षणिक नुकसान अशा द्विधा मनस्थितीत पालक विद्यार्थी अडकले आहेत. सोमवारी शाळेची घंटी वाजली, परंतु कोरोनाच्या भीतीपोटी विद्यार्थी शाळेत यायला घाबरत असून प्रत्येक वर्गात 20 ते 25 विद्यार्थी येत असल्याची चर्चा आहे. आठ महिन्यापासून शिक्षकांचे शैक्षणिक कार्य बंद होते, आता शाळा सुरू झाल्या असल्या तरी अभ्यासक्रम कसा पूर्ण करायचा ? परीक्षा कधी होणार ? कशा होणार ? या सर्व प्रश्नांची उकल सध्यातरी होणे कठीणच आहे. ऑनलाइन अभ्यासक्रम घेतला जात असला तरी शैक्षणिक ऑनलाईन क्लासेसला म्हणावा तसा प्रतिसाद नाही. प्रभावीपणे शिक्षण मिळणेही कठीणच आहे. अनेक पालकाकडे स्मार्ट फोनचा आभाव आहे. स्मार्ट फोन असले तरी ग्रामीण भागात इंटरनेटची नेटवर्क सुविधा सुरळीत मिळत नसल्याने शैक्षणिक क्षेत्राचा खेळखंडोबा होत आहे. कोरोना विषाणूंच्या महामारी मुळे सर्व क्षेत्रात भीती निर्माण झाली आहे. सार्वजनिक प्रवासी वाहतूक, उद्योगधंदे व सर्व व्यापारी प्रतिष्ठाने सुरू झाली. तसेच मंदिरे खुली होत शाळाही सुरू झाल्या, परंतु कोरोनाची भीती मात्र काही केल्या मनातून जायला तयार नाही. थंडीचे दिवस आणि कोरोना विषाणूंची दुसरी लाट येण्याच्या भीतीने पालकांसह विद्यार्थीही भेदरलेल्या अवस्थेत आहेत.
विद्यार्थी शाळेत आल्यानंतर विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्यास आम्ही जबाबदार राहणार नाही, असे शाळा प्रशासन सांगून हात झटकत असल्याने भीतीचे सावट अधिक गडद होत आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.