दिवंगत शेतकरी नेते शरद जोशी यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन!
औसा प्र. :भारतीय शेतकऱ्यांच्या आर्थिक स्वातंत्र्याचे जनक तथा कोटी कोटी शेतकऱ्यांचे पंचप्राण युगात्मा शरद जोशी (3 सप्टेंबर 1935 ते 12 डिसेंबर 2015) यांचा आज स्मृतिदिन! त्यानिमित्ताने भंगेवाडी ता.औसा येथे शरद जोशी यांच्या प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले.
या देशातील शेतकऱ्यांच्या दारिद्र्याचे मूळ हे शेतमालाच्या भावात असून, शेतकरी कायम दारिद्र्यात राहावे यासाठी या देशातील सरकार तशी धोरणं राबवित आहेत, हे स्वातंत्र्यानंतर सप्रमाण पटवून व सिद्ध करणारी शरद जोशी ही पहिली व्यक्ती होय. शेतकऱ्यांना इतर नागरिकांप्रमाणे सुखाने व सन्मानाने जगता यावे, यासाठी त्यांनी शेतकऱ्यांची संघटना स्थापन केली. संघटनेच्या माध्यमातून मोठमोठी आंदोलने केली. शेतीअर्थशास्त्र त्यांनी शेतकऱ्यांना साध्या व सोप्या शब्दात समजावून सांगितले. ते जगमान्य झाले आहे. शेतकऱ्यांसोबतच त्यांच्या घरातील महिलांना न्याय मिळावा म्हणून त्यांनी शेतकरी महिला आघाडी स्थापन केली. ती या देशातील महिलांची सर्वात मोठी संघटना ठरली.महिलांना लक्ष्मीमुक्ती अभियानाच्या माध्यमातुन संपत्तीमध्ये समान वाटा देऊन लाखो महिलांच्या नावे जमिनी करण्यास प्रेरित केले. एकाच देशात भारत व इंडिया हे आर्थिक विषमतेच्या आधारे दोन भाग असल्याची त्यांनी ऐतिहासिक मांडणी केली.तसेच "सीता शेती, माजघर शेती, व्यापार शेती व निर्यात शेती" या चतुरंग शेतीचा मूलमंत्रही दिला. त्यांचा हा मूलमंत्र खऱ्या अर्थाने महात्मा गांधीजीची "स्वयंपूर्ण खेडी" ही संकल्पना प्रतिबिंबित करते. त्यांनी व्ही. पी. सिंह सरकारला "राष्ट्रीय कृषी नीती" आणि अटलबिहारी वाजपेयी सरकारला "Agriculture task force"चा अहवाल सादर केला. मात्र, या दोन्ही व त्यानंतरच्या सरकारने शरद जोशी यांच्या अहवालातील एक कलमही अद्याप लागू केले नाही. आज शेतकऱ्यांना आर्थिक स्वातंत्र्यासोबतच तंत्रज्ञान स्वातंत्र्यासाठी लढावे लागत आहे.शरद जोशींच्या विचारातूननच शेतकऱ्यांच्या उन्नतीचा मार्ग असुन त्यासाठी शेतकरी संघटना अखंड लढा देणार आहे.हीच शरद जोशींना खरी श्रद्धांजली ठरेल.असे मत शेतकरी संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष रूपेश शंके यांनी त्यावेळी व्यक्त केले.शरद जोशींना अभिवादन करण्यासाठी उपाध्यक्ष वसंत कंदगुळे, कार्याध्यक्ष बालाजी जाधव,करण भोसले, सरपंच अमोल पाटील, रणधीर धुमाळ, सदाशिव मुस्के, संजय धुमाळ, बाळासाहेब जाधव,मन्मंथ मुमाने, क्षत्रूघ्न कंदगुळे, शिवशंकर जानापुरे, राहुल शंके, जनार्दन कंदगुळे आदिंसह गावातील शेतकरी उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.