औशात "आशा" दिनानिमित्त उत्कृष्ट आरोग्य सेवा देणाऱ्या आशा व गटप्रवर्तकांचा आरोग्य विभागाकडून गौरव
- January 08, 2021
औसा:कोरोना काळात उत्कृष्ट आरोग्य सेवा बजावणाऱ्या २१ आशा स्वयंसेविका व चार गट प्रवर्तक यांचा आशा दिनाचे औचित्य साधून तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय व पंचायत समिती औसा यांच्या वतीने शुक्रवार दि. १ जानेवारी रोजी गौरव करण्यात आला. यावेळी मुख कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जी. जी. परगे, गटविकास अधिकारी सूर्यकांत भुजबळ, औसा तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आर. आर. शेख, डॉ. एस. एस. हिंडोळे, डॉ. अंगद जाधव उपस्थित होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी गोयल म्हणाले की, आशा स्वयंसेविकानी आरोग्याच्या कामाबरोबर स्वतः सशक्त बनून आपल्या मुलांना उच्चशिक्षित करावे, आशांची प्रतिमा ही उल्लेखनीय असून येणाऱ्या काळात शासनाच्या नियमित सेवेत आणण्यासाठी प्रस्ताव शासनाकडे पाठवून पाठपुरावा करू असे आश्वासन यावेळी दिले. त्याच बरोबर आशा स्वयंसेविका प्रसूतीसाठी दवाखान्यात गेले असता त्यांच्या निवासासाठी आशा कक्षाची निर्मिती करण्यात येईल व संरक्षणाची जबाबदारी घेण्यात येईल असे सांगितले. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.परगे म्हणाले की, कोरोना काळात आशांनी कमांडरची भूमिका बजावली असून त्यांचे कार्य हे उल्लेखनीय असून शासनाच्या आरोग्य विषयक योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी मी सदैव त्यांच्या पाठीशी उभा आहे असे प्रतिपादन केले. कार्यक्रमात रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या त्यात बेटी बचाव, कोरोना महामारी, माझे कुटुंब माझी जबाबदारी अशा स्वयंसेविकांची कामे अशा प्रकारचे संदेश देणाऱ्या रांगोळ्या काढण्यात आल्या व वक्तृत्व स्पर्धा ही घेण्यात आल्या यावेळी २१ आशा व चार गटप्रवर्तक यांना मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ आर आर शेख यांनी केले तर सूत्रसंचालन भादा प्रा आ केंद्राच्या आरोग्य सेविका कल्पना दुरूगकर यांनी केले.कार्यक्रमासाठी मोरे, टाकेकर, देशमुख, पटेल यांनी परिश्रम घेतले.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.