अर्थसंकल्प नव्हे आगामी निवडणुकीचा जाहिरनामा
वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांची प्रतिक्रीया
मुंबई प्रतिनिधी : १ फेब्रुवारी २१ :
आज संसदेत अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प नसून आगामी काळात ५ राज्यात येऊ घातलेल्या निवडणूकींचा जाहिरनामा आहे, अशी प्रतिक्रिया वैद्यकीय शिक्षण तथा सांस्कृतिक कार्य मंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांनी व्यक्त केली आहे.
आपल्या प्रतिक्रीयेत ना. अमित देशमुख यांनी पुढे म्हटले आहे की, खरे तर अर्थसंकल्पातून देशाच्या आगामी काळातील विकासाची दिशा निश्चित व्हावयास हवी. अर्थसंकल्पात देशातील शेतकऱ्यांना काय दिले, गरीबांना काय दिले, विविध घटकातील विकासाच्या बाबतीत नेमके कोणते निर्णय घेतले, गेल्या वर्षभरातील लॉकडाऊनमुळे देशातील अर्थव्यवस्था पार कोलमडली आहे. या अर्थव्यवस्थेला सावरुन घेण्यासाठी काय उपाय केले याबाबत या अर्थसंकल्पात काहीही दिसत नाही. अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी काहीही ठोस नसल्याने राज्याच्या निराशा आली आहे.
आजच्या अर्थसंकल्पात आयकर संरचनेत कोणताही बदल करण्यात आला नसल्याने पगारदार वर्गाची निराशा झालेली आहे. कामगार वर्गासाठी, रोजगाराला उत्तेजन देण्यासाठी कोणतेही ठोस निर्णय नाहीत यामुळे हा अर्थसंकल्प अतिशय निराशाजनक आहे. अर्थसंकल्प हा विकासाचे गतिचक्र राखणारा असावयास हवा मात्र, केवळ काही राज्यांसाठी तेथील निवडणूक डोळयासमोर ठेऊन शासकीयस्तरावरुन खिरापत वाटणे कितपत योग्य आहे, असा सवालही अमित देशमुख यांनी केला आहे.
इंधनाचे दर कमालीचे भडकले असताना डिझेल आणि पेट्रोलवर अधिक अधिभार लावलेला आहे यामुळे इंधनाचे दर आणखी भडकणार आहेत. कोरोना संकटानंतर सादर करण्यात आलेल्या या पहिल्या बजेटमध्ये खूप काही करण्यासारखे होते, अर्थव्यवस्थेला पूर्वपदावर आणण्यासाठी कल्पकतेने निर्णय घेणे अपेक्षित होते आणि हेच दुदैवाने राहून गेले आहे असेही अमित देशमुख यांनी म्हटले आहे.
...
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.