अण्णा हजारे हे अविश्वासू आणि ‘मॅनेज’ होणारे व्यक्तिमत्व!, डॉ. भालचंद्र मुणगेकरांचा आरोप

 *अण्णा हजारे हे अविश्वासू आणि ‘मॅनेज’ होणारे व्यक्तिमत्व!, डॉ. भालचंद्र मुणगेकरांचा आरोप*




Bhalchandra Mungekar : अण्णा हजारे म्हणजे महात्मा गांधी नव्हेत अशी कडवट टीका नियोजन आयोगाचे माजी सदस्य डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी केली आहे.


*पुणे* : अण्णा हजारे हे अत्यंत अविश्वासू आणि ‘मॅनेज’ होणारे समाजसेवक आहेत. ते राजकीयदृष्ट्या हास्यास्पद व्यक्तिमत्व ठरले आहेत. त्यांनी २०११ साली केलेल्या आंदोलनामागील बोलवते धनी कोण होते, हे उघड झाले आहे. हजारे म्हणजे महात्मा गांधी नव्हेत अशी कडवट टीका नियोजन आयोगाचे माजी सदस्य डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी केली आहे. पुण्यात ते पत्रकारांशी बोलत होते.

शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हजारे यांनी उपोषणाचा इशारा दिला होता. भाजपा नेत्यांच्या शिष्ठाई नंतर त्यांनी उपोषण मागे घेतले. त्यापार्श्वभूमीवर मुणगेकर यांनी हजारे यांच्यावर निशाणा साधला. मुणगेकर म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने कृषी कायद्यांच्या अभ्यासासाठी समिती नेमलेली असताना हजारे यांनी उच्चस्तरीय समिती गठित करण्याच्या अटीवर उपोषण मागे घेतले. ही बाब हास्यास्पद आहे. त्यांनी २०११ साली केलेले आंदोलन हे पूर्णपणे नियोजित होते. त्यांच्या आंदोलनामागे नेमके कोण होते, त्यांचा बोलविता धनी कोण होता, हे आता समोर आले आहे.

हजारेंनी सरकारच्या विरोधात उपोषण केले असते; तरी त्याचा फारसा प्रभाव पडला नसता. केंद्रीय कृषी राज्यमंत्री, माजी मुख्यमंत्री आदी भेटायला गेल्यावर त्यांनी उपोषण मागे घेतले. त्यांनी समितीची मागणी केली आहे. समिती गठीत करा सांगणारे हजारे कोण? असा सवालही मुणगेकर यांनी केला. हजारे यांच्यावर विश्वास ठेवता येणार नाही. ते ‘मॅनेज’ होऊ शकतात किंवा त्यांचे आंदोलन ‘मॅनेज’केले जाऊ शकते असा थेट आरोपही मुणगेकर यांनी केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या