दोन बँकांचे एटीएम व व्यापाऱ्याच्या गोडाऊनला सील पालिकेची कारवाई

 

मालमत्ता कर थकल्याने पालिकेची कारवाई









लातूर/प्रतिनिधी:वारंवार सूचना करून आणि नोटिसा देऊनही मालमत्ता कर भरला जात नसल्यामुळे महापालिकेच्या वतीने दोन बँकांचे एटीएम आणि एका व्यापाऱ्याचे गोडाऊन सील करण्यात आले.
  लातूर महानगरपालिकेने वसुली मोहीम तीव्र केली आहे.शहरातील नागरिक आणि व्यापाऱ्यांकडे कोट्यवधी रुपयांचा मालमत्ता कर व पाणीपट्टी थकीत आहे.त्याची वसुली करण्यासाठी पालिका प्रयत्नशील आहे.ज्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात कर थकलेला आहे त्यांना पालिकेकडून वारंवार नोटिसा दिल्या जात आहेत.असे असतानाही संबंधितांकडून करांचा भरणा केला जात नाही.त्यामुळे पालिकेने मालमत्तांची जप्ती आणि सील करण्याची कारवाई सुरू केली आहे.
  सोमवारी (दि.२२ फेब्रुवारी)अशाच एका कारवाईत दोन बँकांचे एटीएम व एक गोडाऊन सील करण्यात आले.
  आयसीआयसीआय बँक व पंढरपूर अर्बन बँकेचा मालमत्ता कर अनेक दिवसांपासून थकलेला होता. त्यामुळे या दोन्ही बँकांचे एटीएम सील करण्यात आले.नांदेड रस्त्यावरील गजानन ट्रेडर्सच्या मालकाकडेही मोठ्या प्रमाणात कर थकलेला असल्यामुळे त्यांचेही गोडाऊन सील करण्यात आले.पालिका आयुक्त अमन मित्तल यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली. झोन सी चे क्षेत्रीय अधिकारी समाधान सूर्यवंशी,वसुली लिपीक दिलीप कांबळे, कर्मचारी ज्ञानेश्वर शिवपर्वते, सुमित शिंदे,अकबर शेख, राधाकिशन बायस,अली चाऊस,गोविंद वाकडे यांनी ही कारवाई केली.
   शहरातील नागरिक व व्यावसायिकांकडे मोठ्या प्रमाणात मालमत्ता कर आणि पाणीपट्टीची थकबाकी आहे.नागरिक व व्यापाऱ्यांनी आपल्याकडील करांचा भरणा पालिकेकडे लवकरात लवकर करावा.जे
नागरिक,व्यापारी आपला कर भरणार नाहीत त्यांच्यावर मालमत्ता जप्तीची कारवाई केली जाणार आहे.मालमत्ता कर व पाणीपट्टी भरून पालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
     

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या