राज्यात प्रत्येक जिल्हयाच्या ठिकाणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासह रुग्णालयाचे जाळे निर्माण होणार -वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख

 राज्यात प्रत्येक जिल्हयाच्या ठिकाणी शासकीय वैद्यकीय 

महाविद्यालयासह रुग्णालयाचे जाळे निर्माण होणार

                             -वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख

*मास्क हेच आपले व्हॅक्सीन. मास्कचा वापर करण्याचे आवाहन

*शेतकऱ्यांच्या विश्वासाला तडा जाऊ दिला जाणार नाही

*जिल्हयातील शेतकऱ्यांनी शेंद्रीय शेती करण्याचे आवाहन

*राज्यात भजनी मंडळासाठी योजना राबविणार






लातूर, दि.22(जिमाका):- राज्यातील सर्व सामान्य नागरिकास आरोग्याच्या सोई सुविधा उपलब्ध्‍ होण्यासाठी राज्यशासन प्रत्येक जिल्हयाच्या ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालयासह अद्यावत रुग्णालयाचे जाळे निर्माण करणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे वैद्यकीय शिक्षण,सांस्कृतिक कार्य तथा पालकमंत्री अमित देशमुख यांनी केले.

निवळी तालूका लातूर येथील विलास सहकारी साखर कारखाना आयोजीत अधिमंडळाची 18 वी वार्षीक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. या वार्षीक सर्वसाधारण सभेस अध्यक्ष म्हणून विलास सहकारी  साखर कारखान्याच्या अध्यक्षा श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख होत्या. या कार्यक्रमास जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन श्रीपतराव काकडे, माजी आमदार वैजनाथ शिंदे, विलास सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष रविंद्र काळे सह शैलेश उटगे,सर्जेराव मोरे,गणपतराव बाजूळगे, पृथ्वीराज सिरसाट उपस्थित होते.

या सर्व साधारण सभेस मार्गदर्शन करताना पालकमंत्री अमित देशमुख म्हणाले की, राज्यात संसर्गजन्य तसेच इतर आजाराचे अधूनमधून प्रमाण वाढत आहे.त्यास प्रतिबंध करण्यासाठी राज्यशासन प्रत्येक जिल्हयाच्या ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालयासह रुग्णालयाचे जाळे निर्माण करणार आहे.जिल्हयात कोरोना संसर्गाचे रुग्ण्‍ वाढतच आहेत यास घाबरुन जाण्याचे कारण नाही. परंतु प्रत्येक व्यक्तीने खबरदारी घेण्याची गरज असल्याचे सांगून मास्क हेच आपले व्हॅक्सीन असे समजून मास्कचा वापर प्रत्येकाने करावा असे आवाहन त्यांनी केले.

श्री.देशमुख म्हणाले की, जिल्हयात मांजरा परिवारातील सर्व सहाकारी तत्वावर चालणारे साखर कारखाने शेतकऱ्यास शासनाने ठरवून दिलेल्या धोरणानुसारच ऊसाला दर देत आहेत.यापूढेही शेतकऱ्याच्या ऊसास जास्तीत जास्त भाव देण्याचा प्रयत्न केला जाईल.शेतकऱ्याच्या विश्वासाला तडा जाऊ दिला जाणार नाही याची यावेळी त्यांनी स्पष्ट ग्वाही दिली. सहकारी  साखर कारखाने चालवित असताना संचालक मंडळाने कारखान्याचे रुपांतर बायोरिफायनरी मध्ये केले पाहीजे. यातून  अनेक पदार्थाची निर्मीती होवून मिळकत व्हावी याचा फायदा शेतकऱ्यास व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच जिल्हयातील शेतकऱ्यांनी शेंद्रीय शेतीकडे वळून शेंद्रीय ऊस,शेंद्रीय साखर तयार करण्यास मदत करावी असे आवाहन यावेळी त्यांनी केले.

पालकमंत्री अमित देशमुख यांनी जिल्हयात विज वितरणाबाबत तक्रारी येत आहेत.या तक्रारीचे निरसन करण्यासाठी मी प्रत्येक्ष उर्जा मंत्र्यांशी चर्चा करुन सकारात्मक निर्णय घेऊ असे त्यांनी स्पष्ट केले. राज्यात  ग्रामीण भागात गावा-गावात भजनी मंडळे आहेत त्यांच्यासाठी राज्य सरकार योजना आखणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

 कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करुन माजी मुख्यमंत्री कै.  विलासराव देशमुख यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करण्यात आले. यावेळी विलास सहकारी  साखर कारखाण्याचे कार्यकारी संचालक ए.आर.पवार यांनी वार्षीक सर्वसाधारण सभेचे वाचन केले. कारखान्याचे उपाध्यक्ष रविंद्र काळे यांनी वार्षीक अहवाल सादर केला तर त्यास संचालक गाविंद डुरे  यांनी अनुमोदन दिले. या अहवालास सर्वानोमते टाळयांच्या गजरात अनुमती दिली.

यावेळी  विकास रत्न विलासराव देशमुख मांजरा सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष शैलेश उटगे,जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष श्रीपतराव काकडे,मुंबई कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा माजी आमदार वैजनाथ शिंदे यांची समयोचीत भाषणे झाली. या वार्षीक सर्वसाधारण सभेस ॲड.व्यंकट बेंद्रे, व्ही.पी.पाटील,अनंत देशमुख, मनोज पाटील,हरीराम कुलकर्णी सह विलास सहकारी साखर कारखान्याचे संचालक, सभासद, शेतकरी सामाजीक अंतर बाळगून उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन राहूल इंगळे तर आभार संचालक युवराज जाधव यांनी व्यक्त केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या