शांत, सयंमी, धीरगंभीर युवा नेतृत्व: ना. अमित विलासराव देशमुख
भूतकाळातील अनुभवाच्या कसोटीवर तपासून आणि भविष्यातील संभाव्य परिस्थितीचा विचार करून अत्यंत शांतपणे निर्णय घेणारे संयमी, धीरगंभीर आणि प्रगल्भ युवा नेतृत्व म्हणून ना. अमित विलासराव देशमुख यांची आता ओळख निर्माण झाली आहे. वैद्यकीय शिक्षण तथा सांस्कृतिक कार्य मंत्री म्हणून काम करीत असताना त्यांच्यातल्या या गुणवैशिष्ट्यांचा सर्वांनाच अनुभव येतो आहे. कोणत्याही टीकाटिपणीमुळे विचलित न होता आपल्या कृतीतून या सर्व गोष्टींना उत्तर देणाऱ्या नव्या पिढीतल्या या नेतृत्वाचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने त्यांना उदंड दीर्घायुरारोग्य लाभो, या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा…!
आपला भारत देश जागतिक महासत्ता बनवायचा असेल तर राजकारणाला वर्ज्य न मानता सुशिक्षित युवा पिढीने या क्षेत्रात सहभागी झाले पाहिजे, असे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम हे नेहमी सांगत असत. प्राप्त परिस्थितीत राजकीय क्षेत्रातील युवा नेतृत्वाचा वावर आणि त्यांच्या कार्यकर्तृत्वाचे अवलोकन केले तर एकूण परिस्थितीत झालेल्या सकारात्मक बदलाची जाणीव आपणाला झाल्याशिवाय राहात नाही. इतर राष्ट्रीय आणि प्रादेशिक राजकीय पक्षांप्रमाणेच मा. राहुल गांधी यांच्यासारख्या शालीन नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस पक्षात नवी पिढी सक्रिय झाल्याचे दिसून येते आहे. महाराष्ट्रातून या नव्या पिढीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या तरुण राजकारण्यांपैकीच ना. अमित विलासराव देशमुख हे एक युवानेतृत्व आहे.
दहा वर्षांच्या समाजकारणातून ओळख
आपले नाव उच्चारताना किंवा लिहिताना जाणीवपूर्वक पूर्ण नावाचा आग्रह धरणाऱ्या ना. अमित विलासराव देशमुख यांना समाजकारणाचे बाळकडू हे कौटुंबिक वातावरणातूनच मिळालेले आहे. त्यांना आदरणीय विलासराव देशमुख यांच्याकडून मोठा राजकीय वारसाही लाभलेला असला तरी त्यांनी या क्षेत्रात जाणीवपूर्वक स्वकर्तृत्वातून आपली ओळख निर्माण केली आहे. राजकारणात सहजगत्या प्रस्थापित होण्याची संधी असतानाही त्यानी तसे न करता तब्बल १० वर्षे समाजकार्यात व्यस्त राहून आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.
सन १९९८-९९ दरम्यान विधानसभा निवडणुकीची पूर्वतयारी करण्याच्या निमित्ताने त्यांचा सामाजिक आणि राजकीय जीवनाशी संपर्क आला. लातूर विधानसभा मतदारसंघात फिरत असताना त्यानी लोकांच्या समस्या जाणून घेतल्या, त्या सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, असे अभिवचन त्यांनी या वेळी दिले. यानिमित्ताने युवा वर्गाचे मोठे संघटन त्यांनी निर्माण केले. परिणामी लातूर मतदारसंघात काँग्रेस पक्षाचे मोठे अनुकूल वातावरण तयार होऊन आदरणीय विलासराव देशमुख एक लाखापेक्षा अधिक मताधिक्य घेऊन विजयी झाले. पुढे ते राज्याचे मुख्यमंत्रीही बनले. संपूर्ण राज्याचा कारभार सांभाळण्यात ते व्यस्त झाले तेव्हा लातूर मतदारसंघात दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्याची जबाबदारी ना. अमित विलासराव देशमुख यांच्यावर येऊन पडली आणि त्यांनी ती पूर्ण क्षमतेने पारही पाडली.
साखर कारखानदारीतून सुरूवात
पश्चिम महाराष्ट्रा प्रमाणे मराठवाड्यातही सहकारी साखर कारखाने यशस्वी करण्याचा प्रयोग विलासराव देशमुख यांनी मांजरा कारखान्याच्या उभारणीतून चालविला होता, त्यांचा तो प्रयोग यशस्वी तर झालाच शिवाय पुढे तो देशासाठी एक आदर्श ठरला आहे. मांजरा कारखान्याच्या यशस्वी उभारणीतून लातूर परिसरात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात ऊस लागवड केली. त्यातून १९८८-९९ च्या दरम्यान अतिरिक्त उसाची समस्या निर्माण झाली होती. नुकतेच केमिकल इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त केलेल्या अमित देशमुख यांनी शेतकऱ्यांशी हितगूज करीत असताना सदरील समस्या सोडविण्याचा निर्धार व्यक्त केला होता. केवळ निर्धार करून न थांबता सरासरी २५ वर्षे वयाच्या तरुण सहकार्यांना सोबत घेऊन त्यांनी अवघ्या ९ महिन्यांत विलास सहकारी साखर कारखान्याची उभारणी केली. या कारखान्याची आता नुकतीच १८ वी सर्वसाधारण सभा पार पडली. या कारखान्याने आजवर ५० पेक्षा अधिक राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार पटकावले आहेत. सर्वांत कमी वयाच्या संचालक मंडळाने विक्रमी कमी वेळेत कारखाना उभा करून तो देशात आदर्श ठरावा अशा पध्दतीने यशस्वी रीत्या चालविला आहे, या कारखान्याने स्वफंडातून दुसरा कारखाना विकत घेतला असून तो ही उत्कृष्ट रीत्या चालविण्यात येत आहे, त्यांच्या नेतृत्वात आता टवेन्टिवन शुगर्स लि. ही खाजगी कारखान्याची मालिकाही आकार घेत आहे.
या युवा नेतृत्वाने फक्त कारखाना उभारणीच्या आणि चालविण्याच्या मर्यादेत न थांबता १९९९ ते २००९ या १० वर्षांच्या काळात ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, कृषि उत्पन्न बाजार समितीसह बँकिंग, शैक्षणिक, कृषी, सामाजिक,आणि सांस्कृतिक या सर्व क्षेत्रात आपल्या आगळ्या वेगळ्या कार्यपद्धतीचा ठसा उमटविला आहे.
या कार्यकर्तृत्वाच्या जोरावर सन २००९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत लातूर शहर मतदारसंघातून त्यांनी एकतर्फी विजय मिळविला. येथून पुढे आजवर त्यांची यशस्वी राजकीय घोडदौड सुरूच आहे. सन २०१२ मध्ये केंद्रीय मंत्रिपदावर कार्यरत असताना आदरणीय विलासरावजी देशमुखसाहेब यांचे आकस्मिक निधन झाले. पितृछत्र हरपल्यानंतर मोठा आधार निखळलेला असताना या परिस्थितीला अत्यंत धीराने सामोरे जात माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या कुटुंबाचा सामाजिक आणि राजकीय वारसा ना. अमित विलासराव देशमुख यांनी पुढे सुरू ठेवला आहे.
विजयी हॅटट्रीक
सन २०१४ सली त्यांना अल्पकाळासाठी राज्यमंत्रिपद मिळाले, जेमतेम शंभर दिवसांच्या या कालावधीत मिळालेल्या संधीचं सोनं करणं म्हणजे काय असते हे त्यांनी दाखवून दिले आहे. त्यानंतर लगेच आलेली विधानसभा निवडणूक जिंकून ते दुसऱ्यांदा आमदार झाले. राज्यात सत्तांतर झाल्यामुळे त्या पाच वर्षात त्यांनी आमदार म्हणून मतदारसंघाबरोबरच राज्यातील जनतेच्या संपर्कात राहून त्यांचे प्रश्न, समस्या सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले.
सन २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणूक त्यांनी लातूर शहर विधानसभा मतदारसंघातून पुन्हा सहजगत्या निवडून येऊन विजयाची हॅट्ट्रीक साधली आहे. सोबतच लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून लहान बंधू धिरज विलासराव देशमुख यांनी विक्रमी मताधिक्यांने विजय नोंदवला आहे, हे दोन सख्खे बंधू एकाच वेळी विधानसभेत निवडून जाण्याचा हा दुर्मिळ योग घडवून आणल्याबद्दल राज्याच्या राजकीय क्षेत्रात आजही कुतुहलाने ना. अमित विलासराव देशमुख यांची चर्चा होताना दिसते आहे.
संधीच सोन...
या निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात अनपेक्षित घडामोडी घडून शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस यांचे एकत्रित महाविकास आघाडी सरकार सत्तारूढ झाले आहे. महाविकास आघाडीच्या या सरकारमध्ये वैद्यकीय शिक्षण तथा सांस्कृतिक कार्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी ना. अमित विलासराव देशमुख यांना मिळाली आहे. सोबतीला लातूर जिल्ह्याचा पालकमंत्री पदाची जबाबदारीही त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे. या संधीचेही त्यांनी अल्पावधीत सोनं करून दाखविले आहे.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तारूढ झाले, किमान समान कार्यक्रम निश्चित करून मंत्रिपदाचे वाटप करण्यात आले, सरकारने कामकाजाची धूमधडाक्यात सुरुवातही केली परंतु कोविड-१९ या जागतिक संकटाने संपूर्ण देशाबरोबर महाराष्ट्रालाही ग्रासले आहे. सरकारचे संपूर्ण वर्ष कोविड रुग्णांवरील उपचार आणि लॉकडाऊनचा बंदोबस्त करण्यात गेले आहे. जेथे जास्त प्रगती तेथे कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव हे सूत्र राहिल्याने या संकटाचा देशात सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला आहे. कोविड-१९ प्रादुर्भाव काळात वैद्यकीय शिक्षण मंत्रालयाने जे काम केले आहे ते सर्वात चांगले उठून दिसले आहे. प्रतिकूल परिस्थितीला संधी समजून ना. अमित विलासराव देशमुख यांनी या काळात जलदगतीने निर्णय घेत त्याची अंमलबजावणीही त्याच गतीने केली आहे. त्यामुळे कोविड रुग्णांची तपासणी आणि उपचार या कार्यात वैद्यकीय शिक्षण विभागाची चांगलीच मदत झाली आहे. वैद्यकीय शिक्षण विभागाचे शिक्षण, प्रशिक्षण आणि संशोधन हे मुख्य कार्य असले तरी राज्यातील जनतेच्या अडचणीच्या काळात वैद्यकीय शिक्षण विभागाने कोविड-१९ रुग्णांवरील उपचाराच्या कार्यात महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडली आहे. राज्यभरात कोविड रुग्णसंख्येत वाढ होऊन रुग्णालये कमी पडू लागली तेव्हा सर्व वैद्यकीय महाविद्यालयांची रुग्णालये कोविड डेडिकेटेड रुग्णालयात रूपांतरित करण्याचा निर्णय ना. अमित विलासराव देशमुख यांनी घेतला. या रुग्णालयात सर्व सोयी-सुविधा असल्यामुळे विशेष करून गंभीर रुग्णांवर तत्परतेने उपचार करणे शक्य झाले. ऑक्सिजन, व्हेंटिलेटर तसेच इतर तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध झाल्याने अनेक रुग्णांचे प्राण वाचवून मृत्युदर कमी करण्यास वैद्यकीय महाविद्यालयांची मदत झाली आहे. वैद्यकीय शिक्षण विभागाच्या रुग्णालयात कोविड रुग्णांवर यशस्वी उपचार तर झालेच शिवाय राज्यभरातील शासकीय रुग्णालयांना तज्ज्ञ डॉक्टर्स आणि पॅरामेडिकल मनुष्यबळ पुरविण्याचे महत्त्वाचे कार्यही या विभागाने केले आहे. महाविद्यालयातील शिकाऊ डॉक्टरांनी अहोरात्र परिश्रम घेऊन असंख्य रुग्णांचे प्राण वाचविले आहेत.
कोविड-१९ तपासणीसाठी राज्यात २०० पेक्षा अधिक प्रयोगशाळा
कोविड-१९ चा प्रादुर्भाव सुरू झाला तेव्हा संपूर्ण राज्यात यासंबंधीची तपासणी करणाऱ्या फक्त तीन ते चार प्रयोगशाळा होत्या. ना. अमित विलासराव देशमुख यांनी या संदर्भाने तातडीने निर्णय घेऊन अनेक प्रयोगशाळांना मान्यता दिली. त्यामुळे शासकीय आणि खाजगी मिळून आज राज्यात प्रयोगशाळांची संख्या ही तब्बल २०० पेक्षा अधिक झाली आहे. प्रयोगशाळांची संख्या वाढल्यामुळे रुग्णांचे वेळेत निदान होऊन त्यांना वेळेत उपचार मिळाले आहेत. वेळेत उपचार सुरू झाल्यानंतर रुग्ण दगावण्याची शक्यता फारच कमी राहते. त्यामुळे वाढलेल्या प्रयोगशाळामुळे कोविड रुग्णांचा मृत्युदर कमी राहण्यास मदतच झाली आहे.
राज्यपालांकडून कौतुक
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि त्यात सर्व वैद्यकीय महाविद्यालयांत या रुग्णावर उपचार करण्याचे काम सुरू असताना वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा कशा घ्यावयाच्या हा प्रश्न निर्माण झाला होता. परीक्षा देण्यासाठी विद्यार्थ्यांसमोर अनेक समस्या होत्या. त्यामुळे परीक्षाच घेऊ नयेत असा दबाव वाढत होता परंतु परीक्षा न घेता डॉक्टरांना डिग्री देणे तेवढेच जोखमीचे होते त्यामुळे अशा कठीण स्थितीत या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्याचा अवघड निर्णय ना. अमित विलासराव देशमुख यांच्या पुढाकारातून घेण्यात आला. प्रारंभी या निर्णयावर टीका झाली, विरोधही झाला परंतु आपल्या निर्णयावर ठाम राहात ना. अमित विलासराव देशमुख यांनी या परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेत यशस्वी रीत्या परीक्षा घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली. राज्याचे महामहीम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी या निर्णयाचे तोंडभरून जाहीर कौतुक केले आहे. विद्यार्थी आणि पालकांनीही नंतर या परीक्षा घेतल्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे. परीक्षा देऊन उत्तीर्ण झालेले हे सर्व डॉक्टर सध्याच्या कठीण स्थितीत रुग्णसेवेसाठी उपलब्ध झाले आहेत. वेळेचे बंधन न पाळता अहोरात्र रुग्णसेवेत व्यस्त असलेल्या या निवासी डॉक्टरांचे मानधन वाढविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णयही ना. अमित देशमुख यांनी याच काळात घेतला आहे.
७०/३० कोटा रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय
वैद्यकीय प्रवेशासाठी महाराष्ट्रात प्रचलित असलेली आणि प्रादेशिक असमतोल वाढविणारी ७०/३० ची कोटा पद्धत रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय ना. अमित विलासराव देशमुख यांनी याच काळात घेतला आहे. मराठवाडा आणि विदर्भातील विद्यार्थ्यावरील अन्याय या निर्णयामुळे दूर झाला आहे, हे जरी खरे असले तरी तसे उघडपणे जाणवू न देता गुणवत्तेला प्राधान्य देण्यासाठीच हा निर्णय झाल्याचे भासविण्यात ना. अमित विलासराव देशमुख यशस्वी झाले आहेत. विधानसभेत या विषयावर निवेदन करताना "वन मेरीट वन महाराष्ट्र" हा उद्देश समोर ठेवून सदरील निर्णय घेण्यात येत असल्याचे त्यांनी जाहीर केले. त्यामुळे त्या निर्णयास विरोध करण्यास कोणी धजावले नाही.
जिल्हा तिथे वैद्यकीय महाविद्यालय
कोविड-१९ प्रादुर्भावाच्या काळात वैद्यकीय महाविद्यालयातून मिळालेले उपचार लक्षात घेता वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या वाढविण्याच्या मागणीने आता जोर धरला आहे. या मागणीचा विचार करता ‘जिल्हा तेथे शासकीय महाविद्यालय’ सुरू करण्याचा निर्णय वैद्यकीय शिक्षणमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांनी घेतला असून या निर्णयानुसार पहिल्या टप्प्यात रायगड, उस्मानाबाद, परभणी, नासिक, अमरावती या जिल्ह्यांत आगामी वर्षापासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू होणार आहे. वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सोयीबरोबरच या निर्णयामुळे राज्यातील डॉक्टरांची संख्या वाढून सर्वसामान्य जनतेला जलद गतीने माफक दरात उपचार मिळणार आहेत.
कलाकारांकडून सांस्कृतिक कार्य विभागाचे कौतुक
कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे ना. अमित विलासराव देशमुख यांच्याकडे असलेल्या वैद्यकीय शिक्षण विभागाच्या कामकाजावर फोकस राहिला असला तरी सांस्कृतिक कार्य मंत्रालयाच्या कामाकडेही त्यांनी कधी दुर्लक्ष केलेले नाही. कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे चित्रपट तसेच मालिकांच्या चित्रीकरणावर तसेच चित्रपटगृहे आणि नाट्यगृहातील प्रयोगावर निर्बंध आले आहेत. या कठीण परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी सांस्कृतिक कार्य मंत्रालयाकडून अनेक निर्णय घेण्यात आले आहेत. कलाकार तसेच वृद्ध कलाकारांचे प्रश्न समजून घेऊन ते सोडविण्यासाठी ना. देशमुख यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत. चित्रीकरणासाठी सुरक्षित वातावरण तयार करणे तसेच त्यासाठी परवानगी देण्याचे काम त्यांनी केले आहे. त्याचबरोबर चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे सुरू व्हावीत म्हणून सकारात्मक दृष्टिकोन ठेवून त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. सांस्कृतिक कार्य विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या विविध पुरस्कारांची घोषणा करतानाही योग्य त्या कलाकारांची पुरस्कारांसाठी निवड व्हावी याची दक्षता त्यांनी घेतली आहे. त्यांच्या या भूमिकेबद्दल कलावंत मंडळीकडून त्यांचे सध्या कौतुक होताना दिसत आहे.
नवे सांस्कृतिक धोरण येणार
राज्याचे सांस्कृतिक धोरण ठरवून तब्बल अकरा वर्षे उलटून गेली आहेत. दरम्यानच्या काळात या क्षेत्रात अनेक बदल घडले आहेत. बदलत्या काळाची गरज लक्षात घेऊन या विभागामार्फत सुधारित सांस्कृतिक धोरण आखण्याचा निर्धार आता ना. अमित विलासराव देशमुख यांनी केला असून त्यासाठी समिती नेमण्याची घोषणाही त्यांनी नुकतीच केली आहे.
पालकत्व निभावले
कोविड-१९ च्या प्रादुर्भाव काळात लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून ना. अमित विलासराव देशमुख यांनी निभावलेली भूमिका तर संस्मरणीयच ठरली आहे. वर्षभराच्या या कोरोना प्रादुर्भावाच्या स्थितीत जास्तीत जास्त काळ लातूर येथे थांबून त्यांनी रुग्णसंख्या वाढू नये, लागण झालेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांवर त्यांनी बारकाईने लक्ष ठेवले आहे.
आदरणीय विलासराव देशमुख यांच्या संकल्पनेतून लातूर येथे अगोदरच बांधून तयार असलेले सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल कोविड-१९ रुग्णांच्या उपचारासाठी ताब्यात घेऊन तेथे कोविड-१९ डेडिकेटेड हॉस्पिटल सुरू करण्याचा निर्णय त्यांनी घेतला, या ठिकाणी ऑक्सिजन प्लांट्स इतर सोयी-सुविधा तातडीने उभारण्याचा निर्णयही त्यांनी घेतला. लातूर येथे समाजकल्याण विभागाच्या वतीने उभारण्यात आलेली सुसज्ज वसतिगृहे अधिग्रहित करून त्या ठिकाणी कोविड केअर सेंटर उभारण्यासाठीही त्यानी सूचना दिल्या, या संबंधाने त्यांनी अनेक निर्णय तातडीने घेतल्यामुळे कोविड-१९ रुग्णांवरील उपचार सुलभतेने होऊन मृत्यूचे प्रमाण नगण्य राहिले आहे. लातूर येथील कोविड-१९ डेडिकेटेड रुग्णालय आणि कोविड-१९ केअर सेंटर येथे मिळालेल्या सोयी-सुविधांचे तर राज्यभर कौतुक झाले आहे. लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या लोकांना त्यांच्या गावी पोहोचविणे, जिल्ह्यातील २२ लाख लोकांपर्यंत अन्नधान्य पुरविणे, शेतीमालाची वाहतूक आणि विक्री निर्धोकपणे होईल याची काळजी घेणे या सर्व बाबींवर पालकमंत्री म्हणून त्यांनी बारकाईने लक्ष दिले, सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोविड-१९ ची लागण झालेल्या प्रत्येक रुग्णाला आपल्या कार्यातून फोन करून त्याची विचारपूस करण्याचे काम पालकमंत्री म्हणून ना. अमित विलासराव देशमुख यांच्यामार्फत आजही दररोज होत आहे. यात अडचण सांगणाऱ्या रुग्णाला आवश्यक ती मदत तातडीने पोहोचविण्याची दक्षता त्यांच्याकडून घेतली जात आहे. कठीण काळात मदतीला धावून जाणे हे सर्वात महत्त्वाचे आणि मोठे कार्य असते हे काम अविरतपणे करणारे ना. अमित विलासराव देशमुख यांना पुनश्च एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा…! त्यांच्या माध्यमातून जनहिताचे कार्य असेच अविरत घडत राहो ही सदिच्छा!
लेखक
पांडुरंग कोळगे
जनसंपर्क अधिकारी
मोबाईल : ९४०४४ २७५०३
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.