राज्याच्या गृहमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा - माजीमंत्री आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांची मागणी

 

राज्याच्या गृहमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा
- माजीमंत्री आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांची मागणी





लातूर/प्रतिनिधी: महाराष्ट्र राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच एका आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याने गृहमंत्र्यावर हप्तेखोरीचा आरोप केला आहे.या घटनेने महाराष्ट्राची प्रतिमा धुळीला मिळवण्याचा प्रयत्न झाला असून याला जबाबदार असणारे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी माजीमंत्री आ. संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी केली आहे.
   आ.निलंगेकर म्हणाले की, राज्यात सत्तेवर असणाऱ्या महाविकास आघाडी सरकारचे विविध कारनामे दररोज समोर येत आहेत. भ्रष्टाचार हा त्यातील प्रमुख मुद्दा आहे.इतर लोकांचे ठीक आहे परंतु कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी असणाऱ्या गृहमंत्र्यांनी अशा प्रकारात अडकणे दुर्दैवी आहे.
  बदली झालेले मुंबईचे पोलीस आयुक्त परमवीरसिंह यांनी गृहमंत्र्यावर गंभीर आरोप केले आहेत.हप्तेखोरी सारखे आरोप करताना त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलेले आहे.एक जबाबदार अधिकारी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून आरोप करतो म्हणजे त्यात निश्चितपणे तथ्य असले पाहिजे.महाराष्ट्राला मोठी राजकीय व सामाजिक परंपरा आहे.त्या पत्रातील उल्लेख सत्य असेल तर या घटनेने राज्याची प्रतिमा धुळीला मिळणार आहे.असे व्यक्ती राज्याच्या मंत्रिमंडळात असणे हे जनतेचे दुर्दैव आहे. त्यामुळे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे. त्यांनी तो दिला नाही तर मुख्यमंत्र्यांनी आपल्या अधिकारात अनिल देशमुख यांना पदमुक्त केले पाहिजे, अशी मागणीही आ.निलंगेकर यांनी केली आहे.
  राज्याला विकासाच्या मार्गावर नेण्याऐवजी भ्रष्टाचारात पहिल्या क्रमांकावर आणण्याचे काम महाविकास आघाडी सरकारकडून आजपर्यंत करण्यात आले आहे. भ्रष्टाचाराचे महामेरू असणारे नेते मंत्रिमंडळात असताना यापेक्षा दुसरी अपेक्षा करणेही चुकीचे आहे.आरोप झाल्यानंतर आता ते सिद्ध होण्याची वाट न पाहता शिल्लक असेल तर नैतिकता स्वीकारून अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा,असेही आ.निलंगेकर यांनी म्हटले आहे.


--
Photo By- Narayan Pawle (Tamma) Latur
Mobile No. 9422071717

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या