विद्युत वितरण कंपनीच्या अभियंत्याला शेतकरी संघटनेने केले स्थानबद्ध
सक्तीने वीजबिल वसुली आणि वीज तोडली जात असल्याच्या निषेधार्थ शेतकरी संघटनेचे आंदोलन
दुसऱ्या टप्प्यात आंदोलन तीव्र करण्याचा इशारा
लातूर (प्रतिनिधी) : महावितरण कडून सक्तीने वीजबिल वसुली आणि वीज तोडली जात असल्याच्या निषेधार्थ शेतकरी संघटनेकडून हिप्परसोगा (ता. औसा) येथे वीज वितरण कंपनीच्या कनिष्ठ अभियंत्याला स्थानबद्ध करण्यात आले. शेतकऱ्यांवर होणारा अन्याय थांबवला नाही तर दुसऱ्या टप्प्यात प्रत्येक तालुक्यात अशाच प्रकारचे आंदोलन करण्याचा इशाराही शेतकरी संघटनेचे जिल्हा प्रमुख मदन सोमवंशी यांनी दिला आला आहे.
सध्या कोरोनाचे संकट तीव्र झालेले आहे. मागील वर्षभरापासून कोरोनामुळे सामान्य नागरिक व शेतकरी त्रस्त आहेत. मुळात कृषि मुल्य आयोगाने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च काढताना वीजबिलाचा त्यात समावेश केलेला नाही. अशा स्थितीत वीज वितरण कंपनीकडून सक्तीने वीज बिल वसुली केली जात आहे. घरगुती आणि शेतीपंपांचे वीज कनेक्शन तोडले जात आहे. यामुळे पाणी असूनही ते शेतीला देता येत नाही. महावितरण कंपनीच्या या मनमानी विरोधात शेतकरी संघटनेकडून वीजबिल वसुलीसाठी गावात येणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना स्थानबद्ध करण्याचा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार हिप्परसोगा (ता. औसा) या गावात आलेले लोदगा शाखेचे कनिष्ठ अभियंता मुंडे यांना संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्थानबद्ध केले. कोरोनाची परिस्थीती लक्षात हे आंदोलन करित असताना शेतकरी संघटनेच्यावतीने प्रशासनाच्यावतीने देण्यात आलेल्या निर्देशांचे पालन करण्यात आले होते.
संघटनेचे प्रदेश कार्यकारणी सदस्य माधवराव मल्लेशे, जिल्हाध्यक्ष मदन सोमवंशी, संघटनेचे युवा कार्याध्यक्ष बालाजी जाधव, औसा तालुका प्रमुख बालाजी सोमवंशी, सौ.मंगलबाई सोमवंशी यांनी या आंदोलनात सहभाग घेतला. दरम्यान पोलिसांनी पदाधिकाऱ्यांना अटक करून गुन्हा नोंद करुन नंतर सोडून दिले.
महावितरण कंपनीने वीजबिल वसुली मोहीम तात्काळ थांबवावी अन्यथा दुसऱ्या टप्प्यात आंदोलन अधिक तीव्र केले जाणार आहे. या टप्प्यात प्रत्येक तालुक्यात तालुकाध्यक्षांच्या नेतृत्वात आंदोलन करणार असल्याचा इशारा संघटनेचे जिल्हाध्यक्ष मदन सोमवंशी, युवा जिल्हाध्यक्ष रुपेश शंके यांनी यावेळी बोलताना दिला.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.