मुंबई, पुण्याहून येणाऱ्या प्रवाशांची होणार तपासणी
महानगरपालिकेकडून पीव्हीआर चौकात व्यवस्था
लातूर/प्रतिनिधी:मुंबई, पुणे जिल्ह्यातील सध्याची कोरोना परिस्थिती लक्षात घेता त्यातून लातूरकरांना धोका होऊ नये यासाठी आता मुंबई, पुण्यातून लातुरात येणाऱ्या प्रवाशांची चौकशी करण्यात येणार आहे. कोरोनाची लक्षणे आढळणाऱ्या रुग्णांना तपासणी करण्याचा सल्ला दिला जाणार असून महानगरपालिकेने यासाठी पीव्हीआर चौकात स्वतंत्र व्यवस्था निर्माण केली आहे.
मुंबई व पुणे जिल्ह्यात सध्या कोविड १९ चे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. लातूरचा मुंबई आणि पुण्याशी दैनंदिन संबंध असतो.जवळपास ६० खासगी ट्रॅव्हल्स दररोज लातूर-पुणे ये-जा करत असतात. यातून मोठ्या प्रमाणात प्रवाशांची वाहतूक केली जाते.
या प्रवाशांपैकी कोणाला कोरोनाची लागण झालेली असेल तर त्यातून धोका होऊ नये यासाठी महापालिका सतर्क झाली आहे. त्यामुळे दररोज पुण्याहून लातुरात येणाऱ्या प्रत्येक गाडीतील प्रवाशांची चौकशी केली जाणार आहे. यासाठी पथक प्रमुख म्हणून आरोग्य सहाय्यक व्ही.पी. कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.मनपा कर्मचारी त्यांना सहाय्य करतील.
पीव्हीआर चौक येथे सकाळी ५ ते ८.३० या कालावधीत हा उपक्रम राबवला जाणार आहे. पोलिसांच्या सहकार्याने राबवल्या जाणाऱ्या या उपक्रमात पोलीस गाडी थांबवतील.त्यानंतर महानगरपालिकेचे कर्मचारी गाडीमध्ये जाऊन प्रवाशांपैकी कोणाला सर्दी,
खोकला,अंगदुखी,ताप यासारखी लक्षणे आहेत का ?याची विचारणा करतील.लक्षणे आढळली तर संबंधित प्रवाशाला कोरोना चाचणी करून घेण्यास सांगितले जाईल.यासाठी महानगरपालिकेच्या वतीने पीव्हीआर चौक येथे स्वतंत्र चाचणी कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. पुण्याहून येणाऱ्या प्रवाशांना पुढील तीन दिवस विलगीकरणात राहण्यास सांगण्यात येईल.अशा प्रवाशाने घराबाहेर पडू नये. घरातही वृद्ध आणि लहान मुलांच्या संपर्कात येऊ नये. या कालावधीत कोरोनाची लक्षणे आढळली तर अशा व्यक्तीने नजीकच्या तपासणी केंद्रावर जाऊन स्वतःची कोरोना तपासणी करून घ्यावी,असे त्यांना सांगण्यात येणार आहे.
शहरामध्ये चार ठिकाणी कोरोना चाचणी केली जात आहे.पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतन वसतिगृह,औसा रोड,लातूर,
मनपा दवाखाना,इंडिया नगर ,समाज कल्याण वसतिगृह मार्केट यार्ड व पटेल चौकातील मनपा रुग्णालयात कोरोना चाचणीची सुविधा उपलब्ध आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.