शहरातील व्यापाऱ्यांच्या शंभर टक्के कोरोना तपासण्या करण्याचे नियोजन करावे
न.प.च्या मुख्याधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
हिंगोली, दि. 09 (शेख इमामोद्दीन ) : राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता कोरोनाच्या अनुषंगाने जिल्ह्यात विविध उपाययोजना तसेच सक्तीने कार्यवाही करण्यासाठी व्यापाऱ्यांच्या कोरोना तपासण्या करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार हिंगोली, कळमनुरी व वसमत या शहरी भागातील व्यापाऱ्यांच्या शंभर टक्के कोरोना तपासण्याचे नियोजन करण्यासाठी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी संबंधित नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी यांना खालीलप्रमाणे आदेश दिले आहेत.
1. हिंगोली, कळमनुरी व वसमत या शहरी भागातील सर्व प्रकारच्या व्यापाऱ्यांची कोरोना अँटीजेन व आरटीपीसीआर या दोन्ही तपासण्या आपल्या मार्फत करण्यात याव्यात.
2. यासाठी शहरात नियोजनाप्रमाणे विविध ठिकाणी कोरोना तपासणी कॅम्प उभारण्यात यावेत. सर्व व्यापाऱ्यांना कोरोना तपासणी करण्यासाठी अवगत करावे.
3. कॅम्पसाठी जागेची व्यवस्था करणे, मंडप उभारणे, व्यापाऱ्यांना बसण्याची व्यवस्था करणे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था इत्यादी सोयीसुविधा करण्यात याव्यात. कॅम्पमध्ये सर्व सुविधासाठी संगणक, इंटरनेट, प्रिंटर व डाटा एन्ट्री ऑपरेटर इत्यादी सुविधा उपल्बध करणे.
4. तपासण्यासाठी लागणारे कीट, इतर वैद्यकीय साहित्य आणि मनुष्यबळ कॅम्पमध्ये उपलब्ध ठेवण्यासाठी हिंगोली शहरासाठी जिल्हा शल्य चिकित्सक, हिंगोली तसेच कळमनुरी व वसमत शहरासाठी वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय, वसमत व कळमनुरी यांच्याशी समन्वय साधावा.
5. प्रत्येक व्यापाऱ्याची कोरोना अँटीजेन व आरटीपीसीआर या दोन्ही तपासण्या करावयाच्या असल्याने एका व्यापाऱ्याचे दोन स्वॅब घेण्याबाबत संबंधितांना कळविण्यात यावे.
6. तपासणीच्या ठिकाणी आवश्यकतेनुसार पोलीस बंदोबस्तासाठी पोलीस विभागशी समन्वय साधावा.
7. त्यानुसार वरीलप्रमाणे शहरी भागातील शंभर टक्के व्यापाऱ्यांच्या कोरोना तपासण्या पूर्णपणे आपल्या नियोजनाखाली आजपासूनच करण्यात याव्यात व त्यानुसार कार्यवाही करुन केलेल्या कार्यवाहीचा दैनंदिन अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास तसेच जिल्हा शल्य चिकित्सक, हिंगोली व जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, हिंगोली यांना सादर करावा. या कामात हलगर्जीपणा होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आदेशात नमूद केले आहे.
******
वृत्त क्र. 107
हिंगोली जिल्ह्यासाठी तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर
हिंगोली, दि. 09 (जिमाका) : जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी त्यांना प्राप्त अधिकारानुसार सन 2021 या वर्षासाठी हिंगोली जिल्ह्यासाठी तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर केल्या आहेत. त्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
मंगळवार, दि. 31 ऑगस्ट, 2021 रोजी हजरत सरकार सय्यद नुरोद्दीन नुरी शहीद रहेमतुल्लाअले (ऊरस) ता. कळमनुरी, सोमवार, दि. 13 सप्टेंबर, 2021 रोजी जेष्ठा गौरी पूजन (महालक्ष्मी) आणि मंगळवार दि. 02 नोव्हेंबर, 2021 रोजी धनत्रयोदशी (दिपावली) निमित्त जाहीर केल्या आहेत.
या तिन्ही स्थानिक सुट्ट्या हिंगोली जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालये, जिल्हा परिषदेअंतर्गत कार्यालये, नगर परिषद कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्थेची कार्यालये, जिल्ह्यातील शासकीय कोषागार, महामंडळाची कार्यालये व इतर सर्व खाजगी शैक्षणिक संस्थांना लागू राहतील.
****
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.