मिनी लाॅकडाऊनमुळे औसा बाजारपेठेत शुकशुकाट...
लाखो रुपयांचा व्यापार्यांना फटका...
औसा / प्रतिनिधी :- कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव राज्यात तिसऱ्या टप्प्याचा वाटेवर असून दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेवून सरकारच्या सूचनेवरून लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवार ते शुक्रवार दिवसा जमावबंदी आणि रात्री 7 : 00 नंतर संचारबंदीचे आदेश काढल्यामुळे औसा शहरातील व्यापाऱ्यांना दुकाने बंद करावी लागली. जीवनावश्यक सेवा देणारे व्यवसाय वगळता सर्वच व्यावसायिकांची दुकाने मंगळवार दि. 06 एप्रिल 2021 रोजी बंद झाल्याने शहरातील व्यापाऱ्यांना लाखो रुपयांची उलाढाल बंद झाल्याने आर्थिक फटका बसला. कापड, शुमार्ट, बँगल स्टोअर्स, कटलरी, स्टेशनरी, झेरॉक्स सेंटर, प्रिंटिंग प्रेस, सराफ व्यापारी, सौंदर्यप्रसाधने अशा सर्वच प्रकारची दुकाने बंद झाल्याने ग्राहकांची गैरसोय झाली तर त्या सोबतच व्यापारी वर्गाचेही लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सध्या लग्नसराईचे दिवस सुरू असून विवाह सोहळ्यासाठी केवळ 50 नातेवाईकांच्या उपस्थितीत परवानगी असल्याने लग्न समारंभासाठी लागणारे भांडी, फर्निचर, इलेक्ट्रॉनिक व इलेक्ट्रिकल्स वस्तू सोने-चांदीचे खरेदी करणे, विवाह इच्छुकांना कठीण झाले आहे. मागील वर्षभरात कोरोना विषाणूंमुळे सर्वच व्यवसायावर विपरीत परिणाम झाला. अनेक व्यापार्यांनी दुकाने भाड्याने घेतली असून, दुकानासाठी डिपॉझिट, भाडे, लाईट बिल व कामगारांचे वेतन देणे अवघड झाले आहे. गतवर्षी 7 महिन्याचे कडक लाॅकडाऊन नंतर ऑक्टोबर 2020 पासून जनजीवन पूर्वपदावर येत असताना, फेब्रुवारी 2021 मध्ये पुनश्च कोरोनाने डोके वर काढले. आता तिसर्या टप्प्याचा वाटेवर महाराष्ट्र राज्य असून, लातूर जिल्ह्यात दिवसा दिवसाला 700 ते 800 रुग्णांची भर पडत आहे. अशा परिस्थितीत औसा शहरात मात्र व्यापारी वर्गाचे कंबरडे मोडले आहे. अनेक जण दुकाने बंद करून गाव गाठत असल्याची चर्चा आहे. शेती विकून काही व्यापाऱ्यांनी दुकाने थाटली होती, परंतु कोरोना विषाणूंचा फटका मात्र आता व्यापाऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसला असून दररोज लाखो रुपयांची होणारी उलाढाल थांबल्याने व्यापारी वर्गात चिंता पसरली आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.