लातूर जिल्ह्याच्या ठिकाणी पाचशे तर प्रत्येक तालुक्यासाठी दोनशे खाटांची कोवीड सेंटर उभा करावे आ. संभाजी पाटील निलंगेकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

 


लातूर जिल्ह्याच्या ठिकाणी पाचशे तर प्रत्येक तालुक्यासाठी दोनशे खाटांची कोवीड सेंटर उभा करावे
आ. संभाजी पाटील निलंगेकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी




निलंगा/प्रतिनिधी ः- कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून लातूर जिल्ह्यात संसर्गाने बाधीतांच्या संख्येतही झपाट्याने वाढ होत आहे. ही परिस्थिती लक्षात घेता लातूर जिल्ह्याच्या ठिकाणी पाचशे खाटांचे तर जिल्ह्यातील दहा तालुक्याच्या ठिकाणी दोनशे खाटांचे जंम्बो कोवीड सेंटर,  अत्याधुनिक व्हेटिलेंटर, बायपाईप व ऑक्सिजन बेडसह उभा करण्याचे निर्देश देऊन त्यासाठी आवश्यक असणार्‍या निधीस मंजूरी द्यावी त्याचबरोबर जिल्ह्यात रेमडिसीवर इंजेक्शनची टंचाई भासत असून त्याचीही तात्काळ उपलब्धता करून द्यावी अशी मागणी आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
राज्यात कोरोनाची दुसरी लाट मोठ्या प्रमाणात आली असून लातूर जिल्ह्यातही या संसर्गाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. जिल्ह्यात कोरोना बाधीत रुग्णाच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून यामध्ये गत दोन दिवसापासून मृत्यूचे प्रमाणही वाढलेले आहे. अनेक रुग्णांना उपचारासाठी खाट मिळत नसून आवश्यक असणारा औषधोपचारही मिळण्यास अडचण येत आहे. ही बाब लक्षात घेऊनच लातूर जिल्ह्यातील दहा तालुक्याच्या ठिकाणी प्रत्येकी दोनशे खाटांचे तर जिल्ह्याच्या ठिकाणी पाचशे खाटांचे जंम्बो कोवीड सेंटर, अत्याधुनिक व्हेटिलेंटर, बायपाईप व ऑक्सिजन बेडसह  उभारण्याची गरज आहे. सदर जंम्बो कोवीड सेंटर उभारण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मंजूरी देऊन संबंधीतांना याबाबत तात्काळ आदेशीत करावे आणि यासाठी आवश्यक असणार्‍या निधीचीही तरतुद करावी अशी मागणी आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
जिल्ह्यातील रुग्णाची संख्या लक्षात घेता रेमडिसीवर इंजेक्शनची टंचाई जाणवत असून अनेक रुग्णांच्या नातेवाईकांना याकरीता भटकंती करावी लागत आहे. त्यामुळेच लातूर जिल्ह्यासाठी तात्काळ या इंजेक्शनची उपलब्धता करून द्यावी अशी मागणीही आ. निलंगेकरांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. रेमडिसीवर इंजेक्शनच्या वाटपाबाबत जिल्हा प्रशासनाने कोणती आचारसहिंता जाहीर केली आहे हे अवगत करावे अशी मागणी आ. निलंगेकरांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. जिल्ह्यातील रुग्णांची संख्या लक्षात घेता रेमडिसीवर इंजेक्शनची मागणी मोठ्या प्रमाणात असून सदर इंजेक्शनची उपलब्धता मागणीच्या समप्रमाणात होताना दिसत नाही. तसेच या इंजेक्शनच्या वापराबाबत खाजगी रुग्णालयाच्या डॉक्टरांवर कांही बंधने घालत असून किचकट नियमही लावले जात आहेत. त्यामुळेच या बाबतची पद्धत सोपी करून इंजेक्शन वापराबाबत डॉक्टरांवरच निर्णय सोपवावा अशी मागणी आ. निलंगेकरांनी  जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे.
शासकीय दवाखान्यामध्ये रेमडिसीवर इंजेक्शन वापराबाबत काय निकष आहेत आणि या रुग्णालयामधून त्याची उपलब्धता किती आहे याची माहिती जिल्हाधिकार्‍यांनी द्यावी तसेच शासकीय रुग्णालयामध्ये रुग्णांना जागा उपलब्ध होत नाहीत अशा तक्रारी येत आहेत. याप्रकरणी जिल्हा प्रशासन म्हणून जिल्हाधिकारी या नात्याने आपण काय कार्यवाही करत आहात याची माहितीही देण्यात यावी अशी मागणी आ. निलंगेकरांनी पत्राद्वारे जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या