*लॉकडाऊन टाळू शकतो पण नियम पाळण्याची गरज- मुख्यमंत्री*

 *लॉकडाऊन टाळू शकतो पण नियम पाळण्याची गरज- मुख्यमंत्री*


*कोरोना विरुद्धची लढाई पुन्हा स्वयंशिस्त आणि जिद्दीने जिंकू या*


*मुख्यमंत्र्यांचे राज्यातील जनतेला आवाहन*




मुंबई दिनांक २:  कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी लॉकडाऊन हा उपाय नाही हे मान्य आहे, आपण आरोग्य सुविधांमध्ये भरीव वाढ केली आहे, करत ही आहोत. परंतू आजचे कोरोना नामक राक्षसाचे आक्राळविक्राळ रुप पाहिले तर आपण उभ्या केलेल्या आरोग्य सुविधा कमी पडतील की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे.  आपण लॉकडाऊन टाळू शकतो त्यासाठी जिद्दीने आणि स्वंयशिस्तीने सर्वांनी  एकत्र येत पुन्हा एकदा हातात हात घालून कोरोनाविरुद्ध लढू या असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. त्याचबरोबर येत्या दोन दिवसात दृष्य परिणाम दिसले नाही तर सर्व तज्ज्ञ आणि संबंधातांशी चर्चा करून इतर पर्यायांची  माहिती घेऊन नवीन कडक नियमावली जाहीर केली जाईल असा इशारा ही त्यांनी दिला.


आज त्यांनी समाजमाध्यमाद्वारे राज्यातील जनतेशी थेट संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.

*आरोग्य सुविधा उभ्या करू पण डॉक्टर नर्सेस कुठून आणायचे*

मुख्यमंत्र्यांनी आजच्या संवादात राज्यातील आरोग्य विषयक सुविधा, कोराना रुग्णांची संख्या आणि राज्याची एकूण स्थिती याची माहिती राज्यातील जनतेला दिली. ते म्हणाले की कोरोना सुरु झाला तेंव्हा राज्यात २ चाचणी प्रयोगशाळा होत्या त्यांची संख्या आपण आज ५०० वर नेली आहे. मुंबईत दरदिवशी ५० हजार चाचण्या होत आहेत तर महाराष्ट्रात १ लाख ८२ हजार चाचण्या. ही संख्या येत्या काही दिवसात २.५ लाख इतकी वाढवण्यात येणार आहे. एकूण चाचण्यांमध्ये ७० टक्के चाचण्या या आरटीपीसीआर चाचण्या आहेत. केंद्राच्या सर्व सुचना आणि नियमांचे आपण पालन करत आहोत. एक ही रुग्ण महाराष्ट्रात लपवला जात नाही, लपवला जाणार नाही असे ही मुख्यमंत्री म्हणाले. जानेवारी फेब्रुवारी मध्ये मुंबईत  रोज ३५० च्या आसपास रुग्ण संख्या होती ती आज ८५०० वर गेली आहे  महाराष्ट्रात १७ सप्टेंबर२०२० ला ३ लाख सक्रीय रुग्ण होते आज ही जवळपास तेवढेच आहेत. रोज ही संख्या झपाट्याने वाढत आहे. १७ सप्टेंबर ला  राज्यात ३१ हजार मृत्यू होते दुर्देवाने त्यात वाढ होऊन आज ही संख्या ५४ हजारांवर गेली आहे. राज्यात १७ सप्टेंबरला सर्वाधिक २४ हजार ६१९ रुग्ण एका दिवशी निघाले होते काल ही संख्या ४३ हजार १८२ गेली आज ती ४५ हजारापर्यंत जाण्याची शक्यता आहे. याच वेगाने रुग्णसंख्या वाढत राहिली तर आपण ज्या सुविधा निर्माण केल्या त्या कमी पडतील, आपण आरोग्य सुविधा उभ्या करू, ऑक्सीजन बेडस, विलगीकरणाचे बेडस्, व्हेंटिलेटर्स वाढवू पण डॉक्टर नर्सेस आणि इतर आरोग्य कर्मचारी कुठून आणायचे असा सवाल ही त्यांनी यावेळी केला. 


*आरोग्य सुविधांची आजची स्थिती*

मुख्यमंत्र्यांनी यावेळी राज्यात उपलब्ध आरोग्य सुविधांची माहिती दिली ते म्हणाले की, विलगीकरणासाठी राज्यात २ लाख २० हजार बेडस आहेत त्यातील १ लाख ३७ हजार ५४९ बेड भरल्या आहेत.  आयसीयुचे राज्यात २० हजार ५१० बेडस आहेत त्यातील ४८ टक्के बेड भरले आहेत. ऑक्सीजन सुविधा असलेले ६२ हजार बेडस आहेत त्यातील २५ टक्के बेड वापरात आहेत. राज्यात व्हेंटिलेटर्सची ९३४७ बेडसची संख्या आहे तीही २५ टक्क वापरात आहे. कोरोना रुग्ण दिवसागणिक वाढत असून परिस्थिती चिंताजनक बनत असल्याचे ही ते म्हणाले.


*वाढीव लसींची केंद्राकडे मागणी*

आरोग्य यंत्रणेत काम करणारी आपलीच माणसे असल्याचे सांगतांना गेल्या वर्षभरापासून ही मंडळी कोराना रुग्णांचा उपचार करत आहेत, अथक काम करत आहेत, कोराना ने बाधित होत आहेत, अशा परिस्थितीत त्यांच्यावरचा ताण न वाढवणे ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे. आपण घराघरात जाऊन टेस्टिंग करत आहोत, कालपर्यंत आपण ६५ लाख लोकांना लस दिली आहे. लसीकरणात महाराष्ट्र देशात नंबर १ वर आहे. काल एका दिवसात आपण ३ लाख लोकांना लस दिली. केंद्राने आपल्याला लसीचा पुरवठा वाढवला तर ही संख्या आपण दिवसाला ६ ते ७ लाख करू शकू इतकी क्षमता आपण विकसित केली आहे असेही मुख्यमंत्री  म्हणाले तसेच त्यांनी केंद्राकडे वाढीव लसीची मागणी केली असल्याचेही सांगितले.


*लस घेतल्यावरही  घातकता कमी होते*

लस घेतल्यावर कोरोना होत नाही असे होतांना दिसत नाही.  पण लस घेतल्यावर कोरोना झाला तर त्याची घातकता कमी होते हे स्पष्ट करून मुख्यमंत्री म्हणाले की, कोरोना चे वादळ रोखण्यासाठी आणि रुग्णवाढ थांबवण्यासाठी कुणी उपाय सांगत नाही, परंतू टीका मात्र करतांना दिसतात. रस्त्यावर उतरण्याची भाषा होते. परंतू आरोग्य कर्मचऱ्यांच्या, सर्वसामान्य जनतेच्या मदतीसाठी, कर्ता हरवलेल्या कुटुंबाच्या सेवेसाठी रस्त्यावर उतरा असे आवाहनही त्यांनी केले तसेच विरोधकांनी यात राजकारण न करता लोकांच्या आणि शासनाच्या लढाईत सहभागी होऊन कोरोनाला हरवण्यासाठी मदत करावी असे आवाहन ही त्यांनी यावेळी केले.


*एकजूटीने पुन्हा कोरोनाविरूद्ध लढू या*

मुख्यमंत्र्यांनी अमेरिका, ब्राझील, फ्रान्स, हंगेरी, डेन्मार्क, बेलजियम, आर्यलंड या विविध देशांमधील कोरोना स्थिती, दुसऱ्यांदा करावे लागलेले लॉकडाऊन आणि उपाययोजनांची माहिती राज्यातील जनतेला दिली. लॉकडाऊन घातकच आहे. अनर्थ टाळण्यासाठी आवश्यक असले तरी त्यामुळे अर्थचक्र बिघडते, ही कात्रीतली स्थिती आहे. त्यामुळे मी कोरोनाला हरवणार, हे प्रत्येकाने ठरवायला हवे, स्वंयशिस्तीने वागायला हवे, गर्दी टाळायला हवी, अनावश्यकरित्या फिरणे बंद करायला हवे, असे आवाहन ही त्यांनी केले.  मागच्यावर्षी आपण एकजुटीने लढत कोरोना नियंत्रणात आणला होता,  त्याच पद्धतीने हातात हात घालून सर्व मिळून कोरानाशी लढू या आणि जिंकू या असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या