पालकमंत्री ना. अमित देशमुख यांनी ग्रामीण रूग्णालय अहमदपुर येथील
कोवीड हॉस्पीटल आणि उपचार सुविधाचा घेतला आढावा,
अधिकाऱ्यांना केल्या आवश्यक सूचना
: १६ एप्रिल :
राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांनी आज शुक्रवार दिनांक १६ एप्रिल रोजी दुपारी अहमदपूर येथील कोवीड हॉस्पीटलला भेट देऊन कोवीड उपचार सुविधांची पाहणी करून तेथील सद्य परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी आढावा बैठकीत पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांनी अहमपूर तालुक्यातील रुग्ण संख्या, लॉकडाऊन, तालुक्यात पूर्ण झालेले लसीकरण, लसीकरण केंद्र संख्या, महाराष्ट्राची लसीकरण क्षमता या तुलनेत लातूर जिल्ह्यातील लसीकरण याची किमान सरासरी संख्या निश्चित करून त्या प्रमाणात लसीकरण उद्दिष्ट गाठावे, उपलब्ध आरोग्य सेवा सुविधांसह तालुक्यातील दंडात्मक कारवाया व कायदा सुव्यवस्था बाबतची संबंधित उपस्थित अधिकाऱ्याकडून माहिती घेतली.
अहमदपूर तालुक्यातील गावनिहाय कोविड१९ बाधित रुग्ण संख्या २५ वर असेल अशा ठिकाणी संस्थात्मक विलगिकरण सुरू करावे, तालुक्यात रुग्ण तपासणी वेग दुपटीने वाढवावा, बाधित रुग्ण लवकरात लवकर उपचारासाठी आरोग्य यंत्रणेकडे येतील यासाठी प्रयत्न करावे, तालुक्यात ऑक्सिजन सिलेंडर साथ पुरेसा ठेवावा व त्याचे वितरण व्यवस्थित होईल यावर लक्ष केंद्रित करावे, तालुक्यात लोकसंख्येच्या प्रमाणात सरकारी रुग्णालयात खाटाची संख्या असावी यासाठी प्रस्ताव सादर करावा अहमदपूर तालुक्यासाठी ५० ऑक्सिजन बेड वाढविण्यात यावेत, बाजारपेठेतील फेरीवाले व्यवसायिक असलेल्या चौकात नागरिकांच्या रॅपिड टेस्ट कराव्यात, कोविड १९ बाबत जनजागृती व कोविड मुक्तगाव अभियान राबविण्यात यावे ज्यातील पात्र गावांना विकासासाठी आवश्यक निधी व प्रोत्साहनपर प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल, अशा सूचना जिल्हाधिकारी व प्रशासनाला केल्या. तसेच नागरिकांनी लक्षणे दिसतात तात्काळ आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधून कोविड१९ तपासणी करून उपचार घ्यावेत विलंब करू नये याच बरोबर अहमदपूर तालुक्यातील नागरिकांनी नियमांचे पालन करीत आपली व आपल्या कुटुंबियांची काळजी घ्यावी, असे आवाहन पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांनी यावेळी केले.
यावेळी जिल्हाधिकारी बी.पी.पृथ्वीराज, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, पोलीस अधिक्षक निखिल पिंगळे, तहसीलदार प्रसाद कुलकर्णी, मुख्याधिकारी त्र्यंबक कांबळे, सभापती गंगासागर दाभाडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुनील दासरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, चंद्रकांत मुद्दे, विकास महाजन, हेमंत पाटील, सिराज जहागीरदार, प्रकाश ससाणे, सय्यद मुज्जमिल, आशिष तोगरे, संदीप शिंदे, अजीज बागवान यांच्यासह अधिकारी लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
------------
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.