धनंजय भोसले यांना राज्यस्तरीय
आदर्श ग्रामसेवक पुरस्कार जाहीर
आदर्श ग्रामसेवक पुरस्कार जाहीर
लातूर : निलंगा तालुक्यातील नणंद येथील ग्रामसेवक धनंजय रामराव भोसले यांच्या कार्याची दखल घेवून राज्य शासनाच्यावतीने त्यांना राज्यस्तरीय आदर्श ग्रामसेवक पुरस्कार जाहीर करण्यात आला असून या पुरस्काराचे वितरण लवकरच मुंबई येथे एका कार्यक्रमात ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
सातारा जिल्ह्याच्या खटाव तालुक्यातील तांबेवाडी येथे ग्रामसेवक म्हणून सन २००४ साली भोसले हे रूजू झाले. येथे कार्यरत असताना त्यांच्याकडे डांबेवाडी, यलमरवाडी व कनसेवाडी या तीन गावांचा अतिरिक्त कार्यभार होता. सन २००७ ला भोसले यांना राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते निर्मलग्राम पुरस्कार प्रदान करण्यात आला. कनसेवाडी ग्रामपंचायत येथे भोसले यांच्याकडे कार्यभार असताना या ग्रामपंचायतला संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता पुरस्कार तत्कालीन पालकमंत्री रामराजे निंबाळकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. सन २००८-०९ ला पण राज्यपाल के. शंकर नारायण यांच्या हस्ते निर्मलग्राम पुरस्काराने भोसले यांना सन्मानीत करण्यात आले.
सन २०१२ ला भोसले यांची नणंद येथे याच पदावर बदली झाली. येथील ग्रामस्थांना नागरी सुविधा पुरविण्यासह हागणदारीमुक्त गाव, ग्रामपंचायतच्या विविध करांची शंभर टक्के वसुली, गावात स्वच्छता, आरोग्य, शिक्षण आदीबाबत जनजागृती व अभियान राबविण्यात आले. झाडे लावा - झाडे जगवा अभियानांतर्गत गावात ३ हजार २०० झाडे लावून त्यांचे संगोपन करून गावात हरितक्रांती करण्यात आली. पानी फाऊंडेशन अंतर्गत गावात राबविण्यात आलेल्या अभियानामुळे पानी फाऊंडेशनकडून गावाला ४ लाख रुपयांचे पारितोषिक मिळाले. ग्रामसेवक भोसले यांच्या या कार्याची दखल घेवून राज्य शासनाने त्यांना आदर्श ग्रामसेवक पुरस्कार जाहीर केला असून याबद्दल भोसले यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे.

0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.