नाशिक दुर्घटनेला नियोजनशुन्य सरकार कारणीभूत
भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा
सौ. स्वाती जाधव पाटील यांची टिका
भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा
सौ. स्वाती जाधव पाटील यांची टिका
लातूर, दि. 22 ः....
नाशिक येथे ऑक्सिजन गळती होवून कालच 24 रुग्ण दगावले या दुर्दैवी घटनेला नियोजनशून्य सरकार कारणीभूत असल्याची टिका भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा सौ. स्वाती जाधव पाटील यांनी केली आहे. नाशिक दुर्घटनेवर फेसबुक लाईव्ह द्वारे संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी मानसिकता बदलावी, सकारात्मक विचार करावा, रस्त्यावर उतरुन कोरोनाच्या संकटात जनतेला दिलासा द्यावा, असे आवाहन स्वाती जाधव पाटील यांनी केले.
प्रसारमाध्यमातून दिवसभर नाशिक दुर्घटनेचे वृत्त, नातेवाईकांचा आक्रोश पाहिला, मन हेलावले, केवळ नियोजनाच्या अभावातून हे घडले, या दुर्घटनेतील दोषींवर कारवाई होणे गरजेचे आहे. अशी मागणी करुन सौ. स्वाती जाधव पाटील म्हणाल्या आज ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, रेमडेसीवीर अभावी रुग्णांचे हाल होत आहेत. अशा परिस्थितीतसुद्धा मुख्यमंत्री साहेब आपण कांही बोलत नाहीत, दुर्घटनास्थळी साधी भेट देत नाहीत. ही वेळ फक्त दुःख व्यक्त करण्याची नसून ठोस पाऊले उचलणे गरजेचे आहे.
मनोविकृत आमदाराचा
जाहिर निषेध
शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी नुकतेच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर खालच्या पातळीवर टिका केली. त्यांच्या जिभेला लगाम घाला, त्यांनी केलेल्या वक्तव्याचा जाहीर निषेध करुन सौ. स्वाती जाधव पाटील म्हणाल्या की, मुख्यमंत्री साहेब विरोधी पक्षनेते फडणवीस संकटाच्या या काळात राज्याला रेमेडेसीवीर मिळावे यासाठी रस्त्यावर उतरुन प्रयत्न करत असताना आपण म्हणता राजकारण करु नका, याउलट आपण स्वतःही कांहीच करत नाहीत.
कोरोना संकटाच्या काळात आज मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस असते तर महाराष्ट्रावर अशी दुर्दैवी वेळ आली नसती. लातूरातसुद्धा अनेकजण ऑक्सिजन, बेड, रेमडेसीवीर साठी तडफडत असताना पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर असते तर निश्चितच रस्त्यावर उतरुन त्यांनी जनतेला न्याय दिला असता. स्वतः कोरोनाबाधित असताना त्यांनी आठ अॅम्ब्युलन्सचे लोकार्पण केले. आज संकटसमयी केंद्रसरकार ऑक्सिजन एक्सप्रेस चालवत आहे, याच सरकारने पाणीटंचाई प्रसंगी लातूरला रेल्वेने पाणी आणले. याउलट सत्ताधारी बगलबच्चे, वाचाळवीर तोंडाची वाफ जिरवण्यात धन्यता मानत आहेत असे टिकास्त्र सौ. स्वाती जाधव पाटील यांनी सोडले.
रुपाली चाकणकरांचा समाचार
राष्ट्रवादी महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी नुकतेच रेमडेसीवीर प्रकरणी देवेंद्र फडणवीसांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना सौ. स्वाती जाधव पाटील म्हणाल्या की, चाकणकर मॅडम फडणवीसांकडे बोट दाखवताना अगोदर सत्यता पडताळून पाहा. तुमचेच मंत्री म्हणत आहेत ते रेमडेसीवीर राज्यालाच मिळणार होते. याउलट तुम्हाला महाराष्ट्रात ठिकठिकाणी महिलांवर होणारे अत्त्याचार, अन्याय दिसत नाहीत. त्याविषयी महिला म्हणून आपण एकही शब्द बोलत नाहीत. देवेंद्र फडणवीसांवर खुशाल गुन्हा दाखल करा, महाराष्ट्रातील जनता त्यांचेसोबत आहे. नाशिकच्या दुर्घटनेप्रकरणी आता कोणावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी आपण करणार आहात ? असा सवाल सौ. स्वाती जाधव यांनी रुपाली चाकणकर यांना केला.
पालकमंत्री लातूरला आले
फोटो काढून निघून गेले
पालकमंत्री अमित देशमुख नुकतेच लातूर दौर्यावर आले. विविध ठिकाणी भेटी दिल्या अन् फोटो काढून लातूरच्या जनतेला वार्यावर सोडून परत निघून गेले असा संताप व्यक्त करुन सौ. स्वाती जाधव पाटील म्हणाल्या की, अशा संकटाच्या काळात पालकमंत्र्यांनी पालकाची भूमिका साकारणे गरजेचे आहे. जनता तुमच्याकडे आशेने पाहते, भयभित नागरिकांना आधार द्यायचे कर्तव्य असून अशा संकटकाळात तरी लातूरात राहा असा सल्ला सौ. स्वाती जाधव पाटील यांनी पालकमंत्र्यांना दिला.
उठसूठ केंद्राकडे बोट दाखविणे बंद करा, असे बोलून सौ. स्वाती जाधव पाटील म्हणाल्या की, मुख्यमंत्री साहेब, आता तरी घराबाहेर पडा, रस्त्यावर या, लोकाना आधार द्या, भाजप कोरोना काळात राजकारण करत नाही, करणारही नाही. गेली वर्षभर भाजपा कार्यकर्ता रस्त्यावर आहे, गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे कीट, मास्क, सॅनेटायझरचे वाटप आम्ही करत आहोत. मुख्यमंत्र्यांनीही मानसिकता बदलावी, सकारात्मक विचार करावे, तुम्ही आवाज द्या, जनता निश्चित साथ देईल असे आवाहन करतांना सौ. स्वाती जाधव यांनी नाशिक दुर्घटनेप्रकरणी ही चौकशी समिती नेमण्याची वेळ नसून प्रत्यक्ष कारवाई करा अशी मागणी केली आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.