शांत संयमी युवानेतृत्व हरपले
काँग्रेस पक्षाबरोबरच राज्य आणि देशाचेही नुकसान
ना. अमित विलासराव देशमुख
मुंबई (प्रतिनिधी)
राज्यसभेतील काँग्रेस पक्षाचे खासदार, युवा सहकारी राजीवजी सातव यांच्या निधनाचे वृत्त धक्कादायक आहे. त्यांच्या आकस्मित जाण्यामुळे पक्ष, महाराष्ट्र राज्य आणि देशाचे मोठे नुकसान झाले आहे. अशा शब्दात राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दुःख व्यक्त केले आहे.
आपल्या शोक संदेशात ना. देशमुख यांनी म्हटले आहे की, पक्षपातळीवर अनेक जबाबदाऱ्या यशस्वीरित्या पार पडणाऱ्या या नेतृत्वाची रुग्णालयातील झुंज मात्र दुर्दैवाने अयशस्वी ठरली आहे, त्यांच्या आकस्मित जाण्यामुळे वैयक्तिक माझे आणि संपूर्ण देशमुख कुटुंबीयांचेही नुकसान झाले आहे. शांत संयमी राहिलेल्या राजीवजी सातव यांची दृष्टी मात्र कल्पक होती. त्यांचे महाराष्ट्र राज्य आणि देशाच्या विकास प्रक्रियेत मोठे योगदान राहिले आहे. काँग्रेस पक्षाने दिलेली प्रत्येक जबाबदारी ते निष्ठेने यशस्वीपणे पुर्ण करत असत. त्यामुळे आज काँग्रेस पक्ष आणि देशाच्या विकास प्रक्रियेत न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे, लोकसभा आणि राज्यसभेत अभ्यासपूर्ण विचार मांडून देशातील सामान्य माणसाच्या हक्काचे संरक्षण त्यांनी केले आहे, त्यामुळे देश आणि काँग्रेस पक्षासाठी त्यांनी दिलेले योगदान कायम स्मरणात राहणार आहे, असेही ना. देशमुख यांनी म्हटले आहे.
सातव कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याची शक्ती मिळावी अशी ईश्वरचरणी आपण प्रार्थना करीत असल्याचेही त्यांनी शोकसंदेशाच्या शेवटी नमूद केले आहे.
------------------------------
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.