सर्व विभागांनी आपत्कालीन प्रतिसाद
कार्यपद्धती अद्यावत करून सादर करावी
*ज्या विभागांना निधीची आवश्यकता आहे त्यांनी एस. डी. आर.एफ. अंतर्गत निधी मागणी प्रस्ताव सादर करावेत*
*एसडीओ व तहसीलदार यांनी उपविभाग व तालुका स्तरावर मान्सून पूर्व आढावा बैठका घ्याव्यात*
लातूर, दि.17(जिमाका):-सर्व विभागांनी आपत्तीकालीन प्रतिसाद कार्यपद्धती अद्यावत करावी. यामध्ये आपत्तीकालीन नियंत्रण कक्ष 24 तास कार्यान्वित करण्यात यावा. आपत्ती व्यवस्थापन समिती आपल्या विभागातील तसेच अधिनस्त असलेल्या अधिकारी व कर्मचारी यांचे दूरध्वनी क्रमांक मोबाईल क्रमांक तसेच आपल्याकडील उपलब्ध साहित्य सामग्री वाहन क्रमांक इत्यादी ची माहिती समाविष्ट करून दिनांक 25 मे 2021 रोजी या कार्यालयास सादर करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष पृथ्वीराज बी.पी. यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित मान्सून 2021 पूर्वतयारीबाबत च्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी पृथ्वीराज मार्गदर्शन करत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, महापालिकेचे आयुक्त अमन मित्तल, निवासी उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. लक्ष्मण देशमुख, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सोळंके व अन्य विभाग प्रमुख उपस्थित होते.
जिल्हाधिकारी पृथ्वीराज पुढे म्हणाले की, मान्सून पूर्वतयारीसाठी ज्या विभागांना देखभाल दुरुस्तीसाठी व साहित्य खरेदीसाठी निधीची आवश्यकता असेल तर त्या विभागांनी एस.डी. आर. एफ. अंतर्गत निधी मागणीचे प्रस्ताव 25 मे 2021 पर्यंत सादर करावेत. यावर्षी हवामान विभागाच्या अंदाजानुसार सरासरीइतका पाऊस पडणार आहे. तरी सर्व विभागाने मागील मागील अतिवृष्टी व पुरात केलेल्या कामकाजात अधिक सुधारणा करून प्रत्येक विभागाने अत्यंत दक्ष पणे सोपवलेली जबाबदारी पार पाडावी, असे निर्देश त्यांनी दिले.
सर्व उपविभागीय अधिकारी यांनी उपविभाग तर तहसीलदार यांनी तहसील स्तरावर आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत मान्सून पूर्व तयारी आढावा बैठक घेऊन सर्व संबंधित यंत्रणांना सूचना द्याव्यात. तसेच प्रत्येक विभागाने आपल्या विभागाचे नियंत्रण कक्ष 24 तास चालू राहतील याबाबत दक्षता घ्यावी. तसेच आपत्तीच्या अनुषंगाने सर्व माहिती अद्यावत ठेवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी पृथ्वीराज यांनी केले.
प्राथमिक आरोग्य केंद्रात मान्सूनपूर्व तयारी च्या अनुषंगाने आपत्तीकालीन किट तयार ठेवावे व यासाठी एक पथक तयार करून ठेवावे. तसेच सर्व गटविकास अधिकारी यांनी आपल्या अधिनस्त सर्व शाळा दुरुस्त करून ठेवाव्यात व नदीकाठच्या गावांना अतिवृष्टी व पुराची माहिती देण्यासाठी सायरन ची व्यवस्था करता येईल का याबाबतची माहिती द्यावी, अशा सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गोयल यांनी केल्या.
प्रारंभी निवासी उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे यांनी मान्सून 2021 पूर्वतयारी च्या अनुषंगाने विविध विभागाने करावयाच्या कार्यवाहीची माहिती विभागांनी करावयाच्या कार्यवाहीची माहिती विभागनिहाय दिली. व प्रत्येक विभागाने त्यांच्यावर सोपवलेली जबाबदारी अत्यंत तत्परतेने पार पाडावी असे आवाहन केले. यामध्ये महसूल विभाग, मृद व जलसंधारण /पाटबंधारे विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, आरोग्य विभाग, महानगरपालिका, नगर परिषद ,पोलीस वाहतूक व नियंत्रण, वीज वितरण कंपनी, एसटी महामंडळ, औद्योगिक सुरक्षा, पुरवठा विभाग, शिक्षणाधिकारी, पशुसंवर्धन विभाग, कृषी विभाग, अग्निशमन विभाग आदी विभागांच्या कामकाजाची माहिती यावेळी त्यांनी दिली.
या बैठकीसाठी सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गट विकास अधिकारी, नगर परिषदेचे मुख्याधिकारी हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.