*घराणेशाहीच्या जीवावर स्वतःला भैय्या, ताई, दादा, भाऊ, तात्या, अण्णा म्हणवून घेणाऱ्यांनो आता सावधान.*
*समाधान आवताडे यांच्या निवडणुकीतून काय शिकाल ?*
*{ संतोष व्यंकटराव पनाळे }*
सर्वप्रथम समाधान अवताडे यांना पंढरपूर पोट निवडणुकीतील विजयाबद्दल मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा आणि हार्दिक हार्दिक अभिनंदन...
त्याच बरोबर घराणेशाहींचे उगवते सितारे यांना गर्भित इशारा. भगीरथ भालके यांनी खरं तर ही पोट निवडणूक लढवायलाच नको होती. भगीरथ भालके तुमचं स्वतःचं अस कर्तुत्व काय आहे. की जनतेने तुम्हाला आमदार करायला पाहिजे. एका आमदाराचा मुलगा या व्यतिरिक्त तुमची ओळखच काय होती. फक्त सहानुभूतीच्या लाटेवर तुम्ही निवडून येण्याचा प्रयत्न केलात.
पंढरपूरच्या निवडणुकीतून एक बोध आपणास नक्कीच मिळाला आहे. या पुढे ही घराणेशाही आम्ही चालू देणार नाही. आम्ही म्हणजे कोण ? आम्ही म्हणजे ही मायबाप जनता, आणि आजचा युवा. आजचा युवा जागा झाला आहे. आम्हाला आता जनतेची सेवा करणारा, प्रत्यक्षात फिल्डवर काम करणारा, जनतेच्या सुख दुःखामध्ये सहभागी होणारा असा जनप्रतिनिधी पाहिजे. मग ती निवडणूक ग्रामपंचायतची असेल, पंचायत समिती, जिल्हा परिषद असेल किंवा आमदार, खासदारकीची असेल.
आम्हाला असा जनप्रतिनिधी नकोय. नुसता बिनकामाचा फेसबुकला लाईव्ह येणारा, कुठला तरी फालतू व्हिडिओ बनवून टाकणारा, बिनकामाचे सोशल मीडियावर स्वतःच्या नावाने फेक अकाऊंट काढून स्वतःचीच वाहवा करणारा, दोन- चार माणसे कामाला ठेवून भैयानी असं केलं, दादांनी तसं केलं, तात्यांनी चांगलं केलं. अशा पोस्ट टाकायला लावणारा, स्वतःकडे सर्व असून सुद्धा जनतेसाठी काहीही न करणारा, प्रत्यक्षात काहीही न करता सोशल मीडियावरच कामाचे दिवे लावणारा, मग तो लातूर मधील असो किंवा महाराष्ट्रातील कुठल्याही शहर वा ग्रामीण मधील असेल. साध उदाहरणच घ्यायचं असेल तर हा कोरोनाचा कालावधी पुरेसा आहे. या कोरोनाच्या कालावधीमध्ये किती आमदारांनी काय दिवे लावले आहेत ते आपण पाहिलेच आहे, आणि पहातच आहोत. तसेच घराणेशाहीच्या जीवावर आमदारकीचे स्वप्न पाहणारे सुद्धा काय दिवे लावत आहेत ते ही पाहतोयत. माझी खास करून आजच्या युवा ला अपील आहे. आपला जनप्रतिनिधी निवड करत असताना त्याचं कार्य पहा. तो कोणत्या घराण्याचा आहे ते पाहू नका, त्यांच्याकडे किती शिक्षण संस्था आहेत, किती कारखाने आहेत ते पाहू नका, तो कोणत्या गाडीतून फिरतोय ते पाहू नका, जो सच्चा आहे, जनतेप्रती ज्याची भावना चांगली आहे. मग तो गरीब का असेना, कुठल्या घराण्याचा वारसा बघू नका, त्यांच सामाजिक कार्य पहा, त्याला इंग्लिश बोलताच आली पाहिजे असं काही नाही, मराठीतून बोलून सर्वांशी सौजन्याने वागणारा असला तरी चालेल. अशाच लोकांना आपला जनप्रतिनिधी निवडा. मग तो कोणत्याही पक्षाचा असू द्या.
*विरासत से तय नही होंगे सियासत के फैसले ।*
*ये तो उडान तय करेगी कि आसमान किसका है ।।*
सर्वपक्षीय कार्यकर्त्यांमध्ये आपण जेव्हा नजर टाकून पहाल तेव्हा आपणास दिसेल की, खूप असे कार्यकर्ते आहेत कि, ते आमदार होण्याच्या पात्रतेचे आहेत. खासदार होण्याच्या पात्रतेचे आहेत. परंतु त्यांच्याकडं घराणेशाहीचा वारसा नाही. पैसा नाही, संस्था नाहीत म्हणून त्यांनी आमदार व्हायचं नाही का ? खासदार व्हायचं नाही का ? हे आता कुठे तरी थांबले पाहिजे. आणि हे थांबवायचं असेल तर आजचा युवाच हे सर्व थांबवू शकतो. आजच्या युवा ला एकच सांगेन. निर्भिड आणि निश्चयी व्हा. कुणाचातरी राईट हॅन्ड, लेफ्ट हॅन्ड होऊन जीवन जगण्यात काय अर्थ आहे ? जे काही मिळवायचे ते स्वतःच्या हिमतीवर स्वतःच्या ताकदीवर. राजकारणात येऊ इच्छिणाऱ्या युवांनी व्यक्तिनिष्ठ न होता पक्षनिष्ठ व्हायला शिका. जनतेने आपल्या बद्दल असं बोलले पाहिजे की, हा भाजपचा कार्यकर्ता, हा काँग्रेसचा कार्यकर्ता, हा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता, शिवसेनेचा कार्यकर्ता. मात्र हा कुठल्यातरी नेत्याचा कार्यकर्ता असा शिक्का नको. स्वतःवर पक्षाचा ठप्पा लागला तरी चालेल, परंतु कुठल्याही व्यक्तीचा ठप्पा लावून घेऊ नका. कारण राजकारणामध्ये काहीही होऊ शकत. आपण ज्या व्यक्तीचे कार्यकर्ते म्हणून मिरवत असतो ती व्यक्ती उद्या कोणता निर्णय घेईल, कुठल्या पक्षात जाईल काहीही सांगता येत नाही. त्यामुळे व्यक्तिनिष्ठे पेक्षा तत्त्वनिष्ठेला महत्त्व देण्याची आवश्यकता आहे. ज्याला लोकप्रतिनिधी व्हायच आहे. तो कोणीही असो, एखाद्या राजकीय घराण्यातील सुद्धा जर तो सामाजिक बांधिलकी समजून समाजसेवेचे कार्यात असेल तर जनता त्यालाही स्वीकारते.
*देर लगेगी मगर सही होगा ।*
*हमने जो सोचा है वही होगा ।।*
- संतोष व्यंकटराव पनाळे
मो. - ८४२१३८०८८८
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.