म्युकरमायकोसिसचा प्रसार रोखण्यासाठी तात्काळ उपाययोजना कराव्यात
आ. संभाजी पाटील निलंगेकर यांची जिल्हाधिकार्यांकडे मागणी
आ. संभाजी पाटील निलंगेकर यांची जिल्हाधिकार्यांकडे मागणी
लातूर/प्रतिनिधी ः- कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावानंतर आता म्युकरमायकोसिस या फंगस इंन्फेक्शनचा प्रसार होत आहे. या संसर्गाने प्रादुर्भावित झालेले लातूर जिल्ह्यात शंभरपेक्षा अधिक रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. या संसर्गावर जी उपचार पद्धत आहे किंवा औषधे आहेत ती सर्वसामान्यांना परवडणारी नाहीत. त्यामुळेच या संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने तात्काळ उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी आ. संभाजी पाटील निलंगेकर व भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेश कराड यांनी जिल्हा भाजपच्या वतीने निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांच्याकडे केली आहे.
कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावानंतर म्युकरमायकोसिस या फंगस इंन्फेक्शनचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत असल्याचे चित्र संपुर्ण राज्यात पाहण्यास मिळत आहे. लातूर जिल्हाही याला अपवाद नसून जिल्ह्यात जवळपास शंभरपेक्षा अधिक रुग्ण या संसर्गाने बाधीत झालेले असून त्यांच्यावर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. विशेषतः या संसर्गाचा प्रादुर्भाव कोरोनामुक्त झालेल्या व मधुमेहाने पिडीत असणार्या रुग्णांना लवकर होत असल्याचे समोर आले आहे. तसेच ज्या कोरोना रुग्णांना उपचारादरम्यान रेमडीसिवर, स्टेरॉइड या इंजेक्शनसह ऑक्सिजन व व्हेटिलेटरची आवश्यकता लागलेली आहे त्या रुग्णांनाही म्युकरमायकोसिस होण्याची भिती मोठ्या प्रमाणात आहे. म्युकरमायकोसिस या आजारावर आवश्यक असणारे इंजेक्शन व उपचार पद्धती ही सर्वसामान्यांना परवडणारी नाही. ही बाब लक्षात घेऊनच प्रशासनाच्या वतीने या संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी तात्काळ उपाययोजना करणे आवश्यक असल्याची बाब या निवेदनाच्या माध्यमातून प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिलेले आहे.
या उपाययोजना करताना जिल्हा प्रशासनाने तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली गावपातळीवर प्रशासकीय यंत्रणेच्या माध्यमातून माहिती संकलीत करावी. विशेषतः कोरोना मुक्त झालेल्या ज्या रुग्णांना रेमडीसिवर, स्टेरॉइड या इंजेक्शनसह ऑक्सिजन व व्हेटिलेटरची आवश्यकता लागलेली आहे तसेच ज्यांना मधुमेह आहे अशांना रुग्णांची माहिती तात्काळ संकलीत करण्याचे नियोजन करून त्यांची म्युकरमायकोसिससाठी आवश्यक असणारी प्राथमिक तपासणी करावी अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाने ही मोहीम सुरु केल्यास ज्या रुग्णांना म्युकरमायकोसिसची लागण होण्याची शक्यता आहे त्यांच्यावर प्राथमिक अवस्थेतच उपचार करणे सोयीचे ठरणार असल्याचे निदर्शनास आणून दिले आहे.
याबाबत जिल्हा प्रशासनाने तात्काळ ठोस पाऊले उचलून आवश्यक असणारी कारवाई करावी अशी मागणी आ. संभाजी पाटील निलंगेकर व भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेश कराड यांनी जिल्हा भाजपच्या वतीने जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनाच्या प्रति पालकमंत्री यांनाही देण्यात आली आहे. सदर निवेदन देताना जि.प. अध्यक्ष राहुल केंद्रे, युवानेते अरविंद पाटील निलंगेकर, मनपा गटनेते अॅड. शैलेश गोजमगुंडे, चेअरमन दगडू साळूंके, अनिल भिसे, डॉ. बाबासाहेब घुले, अनंत चव्हाण, सुरज शिंदे, शामसुंदर वाघमारे, रोहित पाटील आदींची उपस्थिती होती.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.