ऊदगीर येथे आरटीपीसीआर प्रयोशाळा मंजूर लातूर जिल्हयासाठी लोकसंख्येच्या प्रमाणात टप्याटप्‍याने लस उपलब्ध होईल जिल्हयातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राचे सक्षमीकरण करावे पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख

 

ऊदगीर येथे आरटीपीसीआर प्रयोशाळा मंजूर

लातूर जिल्हयासाठी लोकसंख्येच्या प्रमाणात

टप्याटप्‍याने लस उपलब्ध होईल

 

जिल्हयातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राचे सक्षमीकरण करावे

पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख





 

1.    कोवीड१९ बांधीताची दैनदिन संख्या ३ अंकावरून २ अंकात आणण्याचे नियोजन करावे

2.    ग्रामीण भागात कोरोना बाधीतांचे संस्थात्‍मक विलगीकरण अनिवार्य करावे

3.    गावनिहाय लसीकरण मोहिम राबवावी

4.   ग्रामीण व प्राथमिक आरोग्य केंद्रावर कार्यक्षेत्रातीलच नागरीकांच्या लसीकरणाला प्राधान्या दयावे

5.    कोरोनाची तिसरी लाट आली तर प्रादूर्भाव वाढणार नाही यांचे नियोजन हवे

6.    ठिकठीकाणच्या आरोग्य केंद्रावर पोस्ट कोवीड आजारावरील उपचार व्यवस्था करावी

7.   ग्रामीण रूणालयाच्या ठिकाणी किमान ५ व्हेन्टिलेटरची व्यवस्था असावी

8.    कोवीड प्रादूर्भावात सर्व आरोग्य केंद्रात लहान मुलांची काळजी घेणारी व्यवस्था उभारावी

9.    ग्रामीण भागातही लॉकडाऊनची अंमलबजावनी व्हावी

10.  कोरोना बाधीताच्या संपर्कातील लोकांच्या चाचण्या वाढवाव्यात

लातूर प्रतिनिधी : ११ मे :

  ऊदगीर येथे स्वतंत्र आरटीपीसीआर लॅब मंजूर करण्यात येत असल्याचे जाहीर करून लातूर जिल्हयाला लोकसंख्येच्या प्रमाणात टप्याटप्याने लस उपलब्ध होईल. प्राथमिक आरोग्य केद्राच्या सक्षमीकरणसाठी शासनाकडून सर्वोतोपरी सहकार्य करण्यात येईल जिल्हयासाठी आणखी १० रूग्णवाहीका उपलब्ध करून देण्यात येतील अशी ग्वाही राज्याचे वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांनी दिली आहे.

  शहराच्या तुलनेत ग्रामीण भागातही वाढत असलेला कोवीड१९ चा प्रादूर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी आखण्यात आलेल्या उपायायोजनांची काटेकोर अंमलबजावनी करण्याच्या दृष्टीने आज मंत्रालयात दुरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून मंगळवार दि. ११ मे रोजी दुपारी लोकप्रतिनिधी, लातूर जिल्हा परीषदचे पदाधिकारी व अधिकारी यांच्या समवेत आढावा बैठक घेतली या प्रसंगी ते बोलत होते.  

  या बैठकीत लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख, जिल्हा परिषद अध्यक्ष राहूल केंद्रे, उपाध्यक्ष भारतबाई सोळुके, मुख्यकार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, विरोधी पक्षनेते तथा काँग्रेसचे गटनेते संतोष तिडके, भाजपा गटनेते महेश पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते मंचकराव पाटील आदी पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.

  ऊदगीर येथे कोरोना तपासणी प्रयोगशाळा उभारणीसाठी उदगीरचे लोकप्रतिनीधी राज्यमंत्री संजय बनसोडे पाठपूराव करीत आहेत, जिल्हा परीषद अध्यक्षानीही आज हा विषय बैठकी दरम्यान उपस्थित केला असल्याचे सांगून आपण या क्षणी ही प्रयोगशाळा मंजूर करीत असल्याचे पालकमंत्री देशमुख यांनी या बैठकी दरम्यान जाहीर केले. लातूर जिल्हयातील कोरोना बाधीताचा पॉझीटीव्हीटी रेट १० टक्के पेक्षा कमी आणण्याचे आणि दैनदिन संख्या ३ अंकावरून २ अंकात आणण्याचे नियोजन करावे, ग्रामीण भागात कोरोना बाधीतांचे संस्थात्‍मक विलगीकरण अनिवार्य करावे, गावनिहाय लसीकरण मोहिम राबवावी, ग्रामीण व प्राथमिक आरोग्य केंद्रावर कार्यक्षेत्रातीलच नागरीकांच्या लसीकरणाला प्राधान्या दयावे, कोरोनाची तिसरी लाट आली तरी प्रादूर्भाव वाढणार नाही यांचे नियोजन हवे, ठिकठीकाणच्या आरोग्य केंद्रावर पोस्ट कोवीड आजारावरील उपचार व्यवस्था करावी, ग्रामीण रूणालयाच्या ठिकाणी किमान ५ व्हेन्टिलेटरची व्यवस्था असावी, कोवीड प्रादूर्भावात सर्व आरोग्य केंद्रात लहान मुलांची काळजी घेणारी व्यवस्था उभारावी, ग्रामीण भागातही लॉकडाऊनची अंमलबजावनी व्हावी, कोरोना बाधीताच्या संपर्कातील लोकांच्या चाचण्या वाढवाव्यात असे निर्देश बैठकी दरम्यान पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांनी दिले आहेत.

अमरावतीतील परीस्थितीचा अभ्यास करावा

  कोवीड१९ प्रादूर्भावाच्या दुसऱ्या लाटेला अमरावती जिल्हयातुन सुरूवात झाली होती मध्यतरी तेथील रूग्णसंख्या नियंत्रणात आली होती मात्र आता पून्हा तेथे रूग्णसंख्येत वाढ होत आहे. त्यामुळे तेथे तिसरी लाट आल्याची चर्चा आहे. लातूर जिल्हा प्रशासनाने अमरावतीच्या या एकूण परिस्थितीचा अभ्यास करून आपल्याकडे कमी झालेली रूग्णसंख्या पून्हा वाढणार नाही किंवा तिसरी लाट आली तरी ती प्रभावी राहणार नाही याची काळजी घ्यावी असे निर्देशही पालकमंत्री ना. देशमुख यांनी यावेळी दिले आहेत.

 ग्रामीण भागातील केंद्रावर शहरातील नागरीक लस घेत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरीकांची अडचण निर्माण होत आहे. या परिस्थितीत ग्रामीण आरोग्य केंद्रावर तेथील नागरीकांना प्राधान्याने लस दिली जावी, खेडे गावातुन गंभीर आजारी असलेल्या नागरीकांना ऑक्सीजन, व्हेन्टिलेटर बेड मिळण्यात अडचणी येत आहेत त्या बाबतही नियोजन व्हावे अशी सुचना आमदार धिरज देशमुख यांनी बैठकी दरम्यान केली. 

 ग्रामीण भागात पुरेश्या प्रमाणात लस उपलब्ध करून दयावी, रूग्णवाहीका संख्या वाढवावी, ऊदगीर येथे टेस्टींग लॅब उभारावी आदी मागण्या जिल्हा परीषद अध्यक्ष राहूल केंद्रे यांनी बैठकी दरम्यान केल्या. या बैठकीत जिल्हा परीषद उपाध्यक्ष भारतबाई सोळंके,  काँग्रेस पक्षाचे गट नेते संतोष तिडके, भाजपाचे गटनेते महेश पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते मचंकराव पाटील यांनी काही सुचना मांडल्या.

  बैठकीच्या प्रारंभी जिल्हा परीषदचे मुख्यकार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी जिल्हयाचा कोरोना पॉझीटीव्हीटी रेट ३२ टक्के वरून १९ टक्केवर खाली आला असल्याचे सांगून ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा यासाठी तत्परतेने कार्य करीत असल्याचे सांगीतले होते. लॉकडाऊनची अंमलबजावनी, संस्थात्मक वीलगीकरणाची स्थिती या संदर्भानेही त्यांनी माहिती दिली.

------------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या