कोविडसाठी अधिकच्या 100 खाटा वाढवीण्या संदर्भात नियोजन करण्यात यावे —वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांचे निर्देश

 

कोविडसाठी अधिकच्या 100 खाटा वाढवीण्या

संदर्भात नियोजन करण्यात यावे

—वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांचे निर्देश





 

मुंबई, दि.11:

   छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जवळ महिलांसाठी असणाऱ्या कामा रुग्णालयाची 330 रुग्णांची क्षमता आहे. कोविड काळात या रुग्णालयात 100 खाटा कोविड रुग्णांसाठी ठेवण्यात आल्या होत्या. कोविड विषाणूच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता या रुग्णालयात कोविडसाठी अधिकच्या 100 खाटा वाढविण्या संदर्भातील नियोजन करण्यात यावे असे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांनी आज दिले.

   वैद्यकीय शिक्षण मंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांनी आज कामा रुग्णालयाला भेट देऊन या रुग्णालयात कोविड रुग्णांना देण्यात येणाऱ्या उपचारा बद्दल माहिती घेतली त्यावेळी ते बोलत होते. वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने, सहसंचालक डॉ. अजय चंदनवाले, ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. रणजीत माणकेश्वर, कामा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.तुषार पालवे आणि संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते.

   वैद्यकीय शिक्षण मंत्री म्हणाले की, कोविड रुग्णावर उपचार करण्यासाठी अधिकाधिक खाटांची संख्या वाढविण्यात आली. कामा रुग्णालयात कोविडसाठी स्वतंत्रपणे 100 खाटांची व्यवस्था करण्यात आली होती. गेल्या सव्वा वर्षात या रुग्णालयात कोविडची लक्षणे आढळलेल्या रुग्णांवर उपचार करण्यात आले. मात्र कोविडची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने अजून 100 खाटा म्हणजेच एकूण 200 खाटा कोविड रुग्णांसाठी ठेवण्याचे नियोजन करण्यात यावे.मात्र हे नियोजन करीत असताना येथे ऑक्सिजन, व्हेंटिलेटर याबाबतचेही नियोजन करण्यात यावे. कामा रुग्णालयात पहिल्यांदाच इन्टेंसिव्ह केअर युनिट बरोबरच हाय डिपेंडन्सी युनिट सुरु केल्याबद्दल वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री. देशमुख यांनी हॉस्पीटल प्रशासनाचे कौतुक केले.

 

 

लसीकरणासाठी स्वतंत्र पथक करावे

 आज महाराष्ट्रातील नागरिकांचे लसीकरण करण्यावर भर देण्यात येत आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये नागरिक लसीकरणासाठी गर्दी करु शकतात हे लक्षात घेऊन लसीकरणासाठी स्वतंत्र पथक तयार करण्यात यावे. यामध्ये स्वतंत्रपणे नागरिकांचे नोंदणीकरण, लस देण्याबाबतचा तपशील यांचा समावेश करण्यात यावा. कामा रुग्णालयामध्ये याबाबत स्वतंत्र पथक करण्यात आल्या असल्याबाबतची माहिती श्री. देशमुख यांना यावेळी देण्यात आली.

कामा रुग्णालयाचे आधुनिकीकरण करण्या

बाबतचे नियोजन करण्यात यावे

 मुंबईतील कामा हॉस्पीटलला 130 वर्षांहून अधिक काळाचा इतिहास आहे. कामा हॉस्पीटलचा वास्तू पुरातन वास्तु समजली जात असल्याने या रुग्णालयाचे आताच्या काळानुसार  आधुनिकीकरण कसे करता येईल,येथे वेगवेगळया कोणत्या सुविधांची वाढ करता येऊ शकेल याबाबतचे नियोजन करण्यात यावे. तसेच येणाऱ्या काळात कामा रुग्णालयात आयव्हीएफ सेंटर सुरु कसे करता येईल याबाबतचे नियोजन करण्यात यावे असे निर्देशही श्री. देशमुख यांनी यावेळी दिले.

-------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या