लातूर जिल्ह्यातील सहाही मतदारसंघाना भेटतील का निलेश लंके !*

 *लातूर जिल्ह्यातील सहाही मतदारसंघाना भेटतील का निलेश लंके  !* 




{ संतोष व्यंकटराव पनाळे }

*मला* विनाकारण कुणाची फालतू तारीफ करायला जमत नाही, आणि मी करणार हि नाही. परंतु जो खरंच तळमळीने काम करतो त्याची निश्चितपणे जगजाहीर तारीफ करेन. ही सोबतच्या लेखातील फोटोमधील बनियनवर झोपलेली व्यक्ती कोणी साधीसुधी नाही तर ते आहेत एक आमदार. यांचं नाव आहे निलेश लंके. अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर या विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. पारनेर तालुक्यातील एक छोट्याशा मौजे हंगा या खेडे गावातील सर्वसाधारण घरातून आलेले हे एक सर्वसाधारण कार्यकर्ते. 

यांचा ना साखर कारखाना, ना शिक्षण संस्था, ना कुठली गुत्तेदारी, ना उत्पन्नाचे खूप मोठे सोर्सेस. या माणसाकडे आहे सर्वसामान्या विषयी जिव्हाळा, आत्मीयता, प्रेम हीच यांची श्रीमंती. 

आजच्या या खडतर कोरोनाच्या कालावधीमध्ये या व्यक्तीने अहमदनगर मध्ये कोरोना रुग्णांची व्यवस्था व्हावी म्हणून खूप मोठे कोविड सेंटर तयार केल आहे. हा माणूस स्वतःच्या जीवाची पर्वा न करता २४ तास याच कोवीड सेंटर मध्ये थांबून असतो. इथेच खातो इथेच झोपतो त्यांची ही तळमळ अवघा महाराष्ट्र पाहतोय. खरंच किती फरक आहे एखाद्या सर्वसामान्य व्यक्तीला जर आमदारकी भेटली तर तो किती चांगल्या पद्धतीने काम करू शकतो हेच निलेश लंके यांनी यातून दाखवून दिलं आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याला एक जरी निलेश लंके भेटले तरी महाराष्ट्रात बदल व्हायला वेळ लागणार नाही. परंतु मी लातूर जिल्ह्यातील असल्यामुळे माझी अपेक्षा आहे 

लातूर जिल्ह्यातील सहाही मतदारसंघांना निलेश लंके भेटावेत. निलेश लंके ही एक व्यक्ती राहिली नसून तो एक विचार झाला आहे. त्यामुळे निलेश लंके यांच्या विचाराचे आमदार आमच्या सहाही मतदारसंघांना भेटावेत मग बघू उजनीचे पाणी लातूरला कसे येणार नाही. लातूर जिल्ह्यातील जनतेनेही आता ठरवलं पाहिजे की सर्व सामान्य घरातून आलेल्या व्यक्तीलाही आमदारकीची संधी दिली पाहिजे. कारण सर्वसामान्य व्यक्तीच लोकांप्रती चांगली भावना ठेवून काम करू शकते त्याच्या मध्येच काही तरी करण्याची जिद्द असते तळमळ असते. त्याला नवीन काहीतरी करून दाखवायचं असतं. 

काही आमदार खासदार असलेले लोकप्रतिनिधी आपल्या श्रीमंतीचे प्रदर्शन करत आहेत तर काही मंत्री असलेले आमदार खासदार आपल्या अधिकाराच प्रदर्शन करत आहेत. मात्र माणुसकीचे दर्शन घडवणारा लोकप्रतिनिधी निलेश लंके यांच्या कार्याला तोड नाही. 

आज परिस्थिती अशी आहे की एखाद्या कुटुंबातला व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह निघाला तर त्या कुटुंबातले त्याचेच जिवलग त्या रुग्णापासून अंतर ठेवून वागत आहेत. म्हणजेच कठीण प्रसंगात संकटसमयी रक्ताचे ही नाते दुरावले जात आहे. मात्र निलेश लंके यांनी मतदारांच्या विश्वासाला मोठं करण्याचं काम आपल्या प्रत्यक्ष कृतीतून दाखवलेल आहे. म्हणूनच निलेश लंके महाराष्ट्रातला नंबर एकचा लोकप्रतिनिधी असे म्हणण्यात काहीही वावगे होणार नाही. 


*संतोष व्यंकटराव पनाळे* 

 *- ८४२१३८०८८८

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या