विहिर व बोअर पुनर्भरण ही लोकचळवळ व्हावी

                                                                         

 

विहिर व बोअर पुनर्भरण ही लोकचळवळ व्हावी

                                                  -संचालक- डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी

दिनांक:-24 मे 2021






लातूर,दि.24(जिमाका):- विहिर / बोअर पुनर्भरण ही कमी खर्चाची व अत्यंत प्रभावी उपाययोजना असून भूजल पातळीत अल्पकालावधीत वाढ होते. कोणत्याही  शासकिय मदतीशिवाय ही उपाययोजना लोकसहभागातून राबविल्यास या चळवळीला लोकचळवळीचे रुप येण्यास वेळ लागत नाही. प्रत्यक्षात चार महिन्याचा पावसाळा असला तरी देखील सलग  स्वरुपात फक्त 40 तासच पाऊस पडतो. म्हणजेच  दोन दिवसाच्या सलग पडणाऱ्या पावसावर संपूर्ण वर्षाचे पाण्याचे गणित अवलंबून आहे.ग्रामस्थांचा आर्थिक कणा हा सिंचनावर आधारुन असून सिंचनासाठी भूजल प्रामुख्याने वापरले जाते. ही बाब लक्षात घेऊन विहिर बोअर पुनर्भरण ही लोकचळवळ व्हावी असे  आवाहन संचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा  पुणे यांनी केले आहे.

पाण्याची  टंचाई ही लातूरकरांसाठी नविन बाब नाही. भूजलाचा उपसा आणि पुनर्भरण यामध्ये जोपर्यंत  समतोल राखला जाणार नाही. तोपर्यंत पाण्याची टंचाई जाणवतच राहणार. लातूर जिल्हयाच्या 2017 च्या भूजल मुल्यांकनानुसार 150 गावे अतिशोषित व 52 गावे अंशत: शोषित या वर्गवारीत मोडतात. या गावांमध्ये व्यापक प्रमाणात भूजल पुनर्भरण व भूजल पातळीत वाढ करण्याच्या दृष्टिकोनातून अटल भूजल योजना ही केंद्रपूरस्कृत योजनेची जिल्हयात सुरुवात झालेली आहे.

पाणी टंचाईने जे रोद्र रुप धारण केले आहे. ते बघता यापुढे अशी पाणी टंचाई निर्माण होऊ नये यासाठी सर्वांनी सामूहिकरित्या जलजागृतीत सहभागी होऊन येत्या पावसाळयात पावसाचा प्रत्येक थेंब भूजलात रुपांतरीत करण्यासाठी अथक प्रयत्न करणे गरजेचे आहे. भूजल पूनर्भरण करित असतांना शास्त्रीय  पध्दतीने पुनर्भरण होणे गरजेचे आहे. याचाच एक भाग म्हणून 23 मे 2021 पासून अविरतपणे  वेळापत्रकानुसार सकाळी 11.00 ते सायं. 6.00 वाजेपर्यंत विहिर पुनर्भरण आणि बोअर  पुनर्भरण या विषयावर 136 गांवाच्या प्रतिनिधीसोबत जलजागर संवाद साधण्यात येत आहे.

या जलजागृतीचे पहिले पुष्प  दि. 23 मे 2021  रोजी संचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, पूणे यांच्या मार्गदर्शनाने  झाले. भूजल पुनर्भरण ही बाब फक्त चर्चा करुन न थांबता सर्वांनी ग्रामस्तरापर्यंत जाऊन गट विकास अधिकारी, ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक यांच्या सहकार्याने व सरपंच जलयोध्दा, जलकर्मी,जलनायक यांच्या सक्रिय सहभागाने राबविण्यात यावा असे संचालकांनी नमुद करुन विस्तृत मार्गदर्शन केले.

या चर्चासत्रात संचालक, भूजल सर्वक्षण आणि विकास यंत्रणा यांनी आगामी कालावधीत भूजल पुनर्भरण ही एकमेव उपाययोजना पाणी टंचाईच्या दुष्ट चक्रातून बाहेर येण्यासाठी उपयोगी ठरेल असे सांगुन सर्वांनी या कामी आपले योगदान दयावे असे आवाहन केले. येणाऱ्या 9 दिवसात भूजल पुनर्भरण, ग्रामस्तरीय पाणलोटातील पाण्याचा ताळेबंद,भूस्थर रचना, पुनर्भरणाच्या शास्त्रोक्त पध्दती, पाणी गुणवता, लोकसहभाग इत्यादी विषयावर तांत्रिक मार्गदर्शन दृकश्राव्य माध्यमातून चालू राहणार आहे.

भूजल पुनर्भरण  ही लोकचळवळ करण्याच्या दृष्टिकोनातुन औरंगाबाद विभागाच्या प्रादेशिक उपसंचालक डॉ. मेघा देशमुख,  जिल्हा वरिष्ठ भूवैज्ञानिक, डॉ. भा.ना.संगनवार, अभिंयता  एम.बी. सोमवंशी,  संवादतज्ञ विषयक कू. स्नेहा गोसावी व कार्यालयातील अधिकारी / कर्मचारी प्रयत्न करीत आहेत. विहिर / विंधन विहिर पुनर्भरण हे कार्य ग्रामस्थांनी ही लोकचळवळ समजून करावे असे आवाहन करण्यात येत आहे.

 

                                                       *****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या