मनपाने भाडे व कर वसुलीबाबत धोरण स्पष्ट करावे

 

मनपाने भाडे व कर वसुलीबाबत धोरण स्पष्ट करावे
भाजपा शहर जिल्हाध्यक्ष गुरुनाथ मगे यांची मागणी



लातूर/प्रतिनिधी ः- कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे बे्रक द चेन अंतर्गत  राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले असून बहुतांश व्यापार बंद आहे. या पार्श्वभूमीवरच मनपाने शहरातील व्यापार्‍यांना भाडे व करवसुलीच्या नोटीसी देऊन त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे. आधीच अडचणीत सापडलेला व्यापारी या नोटीसीमुळे हतबल होऊ लागलेला असून याबाबत मनपाने धोरण स्पष्ट करावे अशी मागणी भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष गुरुनाथ मगे यांनी केली आहे.
कोरोनाची दुसरी लाट थोपविण्यासाठी राज्य सरकारने कडक निर्बंधासह राज्यात अंशतः लॉकडाऊन केले आहे. या लॉकडाऊनमुळे आधीच अडचणीत सापडलेला व्यापारी कोंडीत सापडला गेला आहे. सध्या सकाळी 7 ते 11 बाजारपेठ खुली असली तरी ती केवळ जीवनावश्यक वस्तूसाठीच उघडण्यात येत आहे. कडक निर्बंधामुळे बहुतांश बाजारपेठ बंदच असताना लातूर मनपाने मात्र शहरातील व्यापार्‍यांना भाडे व मालमत्ता कर वसुलीच्या नोटीसी देण्यास सुरुवात केली आहे. गेल्या वर्षीपासून कोरोनाच्या संसर्ग व त्यासाठी लावण्यात आलेले लॉकडाऊन यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेला व्यापारी याही वर्षीच्या राज्य सरकारने केलेल्या अंशतः लॉकडाऊनमुळे कोंडीत पकडला गेला आहे. त्यातच लातूर मनपाने व्यापार्‍यांना भाडे व मालमत्ता कर वसुलीच्या नोटीस देऊन या अडचणीत वाढ केली आहे. विशेष म्हणजे दुकाने उघडण्यास मनपा प्रशासनाने सक्त मनाई केली असून जे कोणी दुकान उघडत आहे त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. ही बाब प्रशासनाला सुद्धा ज्ञात असताना व्यापार्‍यांना भाडे व मालमत्ता कर वसुलीच्या नोटीस देणे म्हणजे त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे असे सांगून भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष गुरुनाथ मगे यांनी या नोटीसा देणे म्हणजे व्यापार्‍यांनी लॉकडाऊनचे नियम धाब्यावर बसवून आपली दुकाने सुरु करावीत का? अशी भुमिका आहे? असा प्रश्न उपस्थित केला आहे.
मनपाने भाडे व मालमत्ता कराच्या वसुलीबाबत आपली धोरण स्पष्ट करणे अपेक्षीत असताना वसुलीची जी मोहीम सुरु केली आहे ती मोहीम म्हणजे व्यापार्‍यांना कोंडीत पकडण्याचे काम आहे. ही वसुली मोहीम पालकमंत्री किंवा मनपा पदाधिकार्‍यांच्या सुचनेवरून होती आहे का? असाही प्रश्न गुरुनाथ मगे यांनी उपस्थित केला आहे. याबाबत मनपाने आपले धोरण लवकरच स्पष्ट करून व्यापार्‍यांना दिलासा देण्याचे काम करावे अन्यथा भाजपा आंदोलन छेडेल असा इशारा भाजपा शहर जिल्हाध्यक्ष गुरुनाथ मगे यांनी दिला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या