वृत्त क्र.458
राष्ट्रीय महामार्ग आष्टामोड ते तिवटग्याळ
रस्त्याचे काम गुणवत्तापूर्ण व अधिक गतीने करावे
-राज्यमंत्री संजय बनसोडे
लातूर/उदगीर, दि.13(जिमाका):-राष्ट्रीय महामार्ग आष्टामोड ते तिवटग्याळ रस्त्याचे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे. या रस्त्यालगतचे शेतकऱ्यांच्या अनेक तक्रारी येत आहेत. तरी महाराष्ट राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी व संबंधित गुत्तेदार यांनी हे काम गुणवत्तापूर्ण व अधिक गतीने होण्यासाठी मशिनरीची संख्या वाढवावी व शासनाने ठरवून दिलेल्या विहित मुदतीत हे काम पूर्ण करावे, असे निर्देश पर्यावरण, भूकंप पुनर्वसन, पाणीपुरवठा व स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम, रोजगार हमी योजना व संसदीय कार्य राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिले.
राष्ट्रीय महामार्ग आष्टामोड ते तिवटग्याळ या रस्त्याच्या कामाची पाहणी राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी करून उदगीर येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित बैठकीत ते अधिकाऱ्यांना निर्देश देत होते. यावेळी महाराष्ट राज्य रस्ते विकास महामंडळ चे
कार्यकारी अभियंता रामदास खलसे, उपअभियंता अशोक इंगळे, कंत्राटदार गजानन पोकलवार, तांत्रिक सल्लागार श्री. निर्मल व स्वामीसह इतर मान्यवर उपस्थित होते.
राज्यमंत्री संजय बनसोडे पुढे म्हणाले की, या रस्त्याच्या कामाची गती अत्यंत संथ असल्याने गुत्तेदाराने प्रथम मशनरी ची संख्या वाढवून कामाची गती वाढवावी व काम ही गुणवत्ता पूर्ण झाले पाहिजे याबाबत दक्ष राहावे. तसेच पावसाळा सुरू झाला असून रस्त्यांच्या कामामुळे लगतच्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये पाणी जाणार नाही व साचणार नाही याची दक्षता गुत्तेदार यांनी घ्यावी. या सर्व कामावर राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी योग्य ते नियंत्रण ठेवून संबंधित गुत्तेदार यांच्याकडून विहित मुदतीत काम पूर्ण करून घ्यावे, असे निर्देश त्यांनी दिले.
आजपासून पुढील एका महिन्याच्या काळात जर संबंधित गुत्तेदार यांनी रस्त्याच्या कामाची गती वाढवली नसल्याचे दिसून आल्यास त्यांच्या विरोधात निवेदनातील तरतुदीप्रमाणे राज्य रस्ते विकास मंडळाने कारवाई प्रस्तावित करावी असे निर्देश राज्यमंत्री बनसोडे यांनी दिले.
वृत्त क्र.459
बाजार समितीने शेतकऱ्यांच्या मुलांसाठी
वसतिगृह स्थापन करण्यासाठी पुढाकार घ्यावा
-राज्यमंत्री संजय बनसोडे
राज्य शासनाकडून वसतिगृहाच्या कामासाठी भरीव मदत मिळवून देणार
राज्यमंत्री बनसोडे यांच्या हस्ते वीज पडून पशुधन गमावलेल्या शेतकऱ्यांना धनादेशाचे वितरण
लातूर/उदगीर, दि.13(जिमाका):- उदगीर कृषी उत्पन्न बाजार समिती ही शेतकरी, हमाल, मापडी व व्यापारी या सर्व घटकांचे हित जपत आहे. बाजार समितीने पुढील काळात शेतकऱ्यांच्या मुलांसाठी वसतिगृह उभारण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. समितीला या कामासाठी शासनाकडून भरीव मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही राज्याचे पर्यावरण व सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिली.
उदगीर तालुक्यातील वीज पडून पशुधन गमावलेल्या शेतकऱ्यांना बाजार समितीच्या वतीने प्रत्येकी 21 हजार रुपयांची मदतीचा धनादेश राज्यमंत्री ना. बनसोडे यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाजार समितीचे सभापती सिद्धेश्वर पाटील होते. यावेळी उपसभापती रामराव बिरादार, कल्याण पाटील, विजय निटूरे, तहसीलदार रामेश्वर गोरे, पंचायत समितीचे उपसभापती बाळासाहेब मरलापल्ले, बालिका मुळे यांच्यासह बाजार समितीचे संचालक यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना ना. बनसोडे म्हणाले की, उदगीरच्या बाजार समितीने विकास कामाचा आराखडा तयार करून पाठवावा. आपण शासनाकडून या बाजार समितीच्या विकासासाठी लागेल तेवढा निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करू असे सांगत, शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबविणारी ही बाजार समिती चांगले काम करत असल्याबद्दल श्री. बनसोडे यांनी कौतुक केले.
यावेळी बोलताना सभापती सिद्धेश्वर पाटील यांनी बाजार समितीने रस्ते, लाईट व अन्य दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देत असताना सर्वांचे हित जोपासले असून कोविडच्या कामासाठी उदगीरच्या उपजिल्हा रुग्णालयाला दहा लाख रुपयांचा निधी देणार असल्याचे ही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन बाजार समितीचे सचिव भगवान पाटील यांनी केले.
वृत्त क्र.460 दिनांक:-13 जून 2021
*लातूरची सकारात्मक पत्रकारिता सर्वाना आदर्श*
लातूर, दि.13(जिमाका):- जिल्ह्यातील पत्रकारिता ही संकट समयी टीका करणारी नसून जनतेच्या समस्या सोडविणारी आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जिल्ह्यात अनेक संकटाचे प्रसंग आले. यावेळी जिल्ह्यातील पत्रकारांनी त्यावर नकारात्मक टीका न करता या संकटावर मात करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य केले. शिवाय जनतेच्या मदतीला पत्रकार धावून आले हे कार्य सर्वांसाठी आदर्श असल्याचे सांगुन कोरोनाचे संकट आणखी टळले नसून पत्रकारांनी जनतेत जागृतीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी केले.
येथील शासकीय विश्रामगृहाच्या सभागृहात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ,मुंबई जिल्हा शाखा लातूरच्या वतीने जिल्ह्यतील नूतन पदाधिकाऱ्यांना ओळखपत्र, डायरी,दिनदर्शिका व कोरोना संकटामुळे मास्कचे वाटप कार्यक्रमाचे आयोजन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले; याप्रसंगी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बोलत होते. यावेळी महापौर विक्रांत गोजमगुंडे, दुर्ग अभियंता प्रशांत स्वामी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. लक्ष्मण देशमुख, जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे मराठवाडा अध्यक्ष वैभव स्वामी यांच्यासह पत्रकार संघाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
जिल्हाधिकारी पृथ्वीराज पुढे म्हणाले की कोरोना महामारीच्या काळामध्ये पत्रकारानी प्रशासनाला मोठे सहकार्य केले आहे. त्यामुळेच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवर आपण नियंत्रण आणू शकलो. पत्रकारांनी कोरोनाच्या बाबतीत पॉझिटिव्ह लिखाण केलं त्यामुळे नागरिकांच्या मनातील भीती मोठ्या प्रमाणात दूर झाली असेच समाज जागृतीचे काम पुढील काळात ती करावे असे आवाहन त्यांनी केले.
मराठवाडा अध्यक्ष वैभव स्वामी यांनी पत्रकारांच्या समस्या मांडत मराठवाडा विभागाचे अधिवेशन विविध मान्यवरांच्या उपस्थितीत लवकरच लातूर जिल्ह्यात आयोजित केले जाईल, अशी माहिती देत संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना पत्रकारांच्या विविध मागण्यांचे निवेदन देण्यात येत असून यामधील प्रमुख मागणी पत्रकारांचा स्वतंत्र मतदार संघ हवा यासाठी संघटनेने पुढाकार घेतल्याचे त्यांनी सांगितले.
महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी कोरोना काळातील लातूरच्या पत्रकारांच्या सकारात्मक कामाचे कौतुक करीत पत्रकारांसाठी योग्य ती मदत आपण करू, पत्रकारांनी समाजासाठी योग्य त्या सूचना आपणापर्यत पोहचविण्याचे आवाहन यावेळी केले.
यावेळी जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.लक्ष्मण देशमुख, जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के यांची यथोचित भाषणे झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुशील सूर्यवंशी यांनी तर प्रास्ताविक पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष अशोक देडे व आभार शहराध्यक्ष महादेव डोंबे यांनी मानले. यावेळी पत्रकार संघाचे मराठवाडा सचिव दिपरत्न निलंगेकर, मराठवाडा उपाध्यक्ष दयानंद जडे, जिल्हाध्यक्ष अशोक देडे, जिल्हा सचिव अशोक हनवते, शहराध्यक्ष महादेव डोंबे, श्रीधर स्वामी, सुधाकर फुले, हारुण मोमीन, नितीन भाले, लातूर तालुका अध्यक्ष कलीम पठाण, रेनापुर तालुका अध्यक्ष बालाजी कटके, औसा तालुका अध्यक्ष आसिफ पटेल, जळकोट तालुका अध्यक्ष सतीश बिराजदार, शिरूर आनंतपाळ तालुका अध्यक्ष कुंभार,प्रदीप कवाळे,आदीसह जिल्ह्यातील पत्रकार सदस्य मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
वृत्त क्र.461 दिनांक:-13 जून 2021
जिल्ह्यात 45 वर्ष व त्यावरील वयोगटासाठीचे लसीकरण
सकाळी 10 ते सायं.5 वाजेपर्यंत सुरु राहणार
लातूर,दि.13(जिमाका):-लातूर जिल्हयातील कोवीड-19 लसीकरणाचे दिनांक 14 जून 2021 रोजीचे वेळापत्रक पुढील प्रमाणे आहे. 45 वर्ष व त्यावरील वयोगटासाठीचे लसीकरण केंद्र- उपजिल्हा रुग्णालय उदगीर, पहिला व दुसरा कोविशिल्ड, व फक्त दुसरा कोव्हॅक्सीन ऑनस्पॉट, उपजिल्हा रुग्णालय निलंगा येथे पहिला व दुसरा डोस कोविशिल्ड व फक्त दुसरा कोव्हॅक्सीन ऑनस्पॉट, ग्रामीण रुग्णालय अहमदपूर पहिला व दुसरा कोविशिल्ड व फक्त दुसरा कोव्हॅक्सीन ऑनस्पॉट, ग्रामीण रुग्णालय औसा,पहिला व दुसरा कोविशिल्ड व फक्त दुसरा कोव्हॅक्सीन ऑनस्पॉट, ग्रामीण रुग्णालय चाकूर, पहिला व दुसरा कोविशिल्ड ऑनस्पॉट ग्रामीण रुग्णालय देवणी पहिला व दुसरा कोविशिल्ड व फक्त दुसरा कोव्हॅक्सीन ऑनस्पॉट, ग्रामीण रुग्णालय जळकोट येथे पहिला व दुसरा डोस कोविशिल्ड व फक्त दुसरा कोव्हॅक्सीन ऑनस्पॉट, ग्रामीण रुग्णालय बाभळगाव येथे पहिला व दुसरा कोविशिल्ड ऑनस्पॉट, ग्रामीण रुग्णालय मुरुड येथे पहिला व दुसरा कोविशिल्ड व फक्त दुसरा कोव्हॅक्सीन ऑनस्पॉट, ग्रामीण रुग्णालय कासारशिरशी पहिला व दुसरा कोविशिल्ड व फक्त दुसरा कोव्हॅक्सीन ऑनस्पॉट,ग्रामीण रुग्णालय रेणापूर येथे पहिला व दुसरा कोविशिल्ड ऑनस्पॉट, ग्रामीण रुग्णालय किल्लारी येथे पहिला व दुसरा कोविशिल्ड व फक्त दुसरा कोव्हॅक्सीन ऑनस्पॉट व जिल्हयातील सर्व प्रा. आ.केंद्र व कार्यक्षेत्र लसिच्या उपलब्धतेनुसार व सुक्ष्मकृती आराखडयानुसार पहिला व दुसरा कोविशिल्ड व फक्त दुसरा कोव्हॅक्सीन ऑनस्पॉट डोस सकाळी 10.00 ते सायं. 5.00 वाजेपर्यंत सुरु राहणार. 18 ते 44 वयोगटातील लाभार्थ्यांना कोव्हॅक्सीनचा केवळ दुसरा डोस लसीच्या उपलब्धतेनुसार देण्यात येणार आहे.
45 वर्ष व त्यावरील वयोगटातील लाभार्थीसाठी लातूर जिल्हयात सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र व त्यांचे कार्यक्षेत्रात उपलब्ध् साठयानुसार व प्रा.आ.केंद्राच्या सुक्ष्मकृती आराखडयानुसार दिनांक 14 जून 2021 रोजी कोवीशिल्ड/कोव्हॅक्सीन लसीचे लसीकरण करण्यात येत आहे.
लातूर जिल्हयातील नागरीकांनी कोवीड-19 लसीकरणाबाबत काही अडचण असल्यास 02382-223002 कोवीड हेल्पलाईन नंबरवर संपर्क करावा असे अवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.
वृत्त क्र.462 दिनांक:-13 जून 2021
*महानगरपालिके मार्फत 45 वर्ष पुढील
वयोगटासाठीचे लसीकरण पाच केंद्रावर होणार*
लातूर,दि.13(जिमाका):-लातूर शहर महानगरपालिके मार्फत कोविड-19 लसीकरणाचे दिनांक 14 जून 2021 रोजीचे वेळापत्रक नागरिकांच्या माहितीसाठी पुढील प्रमाणे आहे. 18 ते 44 वर्ष वयोगटांसाठी लसीकरण केंद्र आयोजित करण्यात आलेले नाही. 45 वर्षे पुढील वयोगटासाठीचे लसीकरण केंद्र पुढील प्रमाणे आहे, नागरीकांची गर्दी जास्त झाल्यास गरजेनुसार सत्र चालू होण्यापुर्वी टोकन क्रमांक देण्यात येतील. अशी माहिती लातूर शहर महानगरपालिकेचे उपायुक्त यांनी दिली आहे.
विलासराव देशमुख शासकीय विज्ञान संस्था, लातूर,दयांनद कॉलेज बार्शी रोड, लातूर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, लातूर (I.T.I. कॉलेज, छत्रपती शिवाजी चौक लातूर) विवेकानंद प्रा.विदयामंदिर (शिवाजी शाळा प्रांगण),लेबर कॉलनी लातूर व यशवंत शाळा प्रा.ना.केंद्र, साळे गल्ली, लातूर येथे कोव्हीशिल्ड लस दिली जाणार आहे.
45 वर्षेावरील नागरीकांचा कोविशिल्ड लसीचा पहिला व दुसरा डोस (पहिला डोस घेवून 84 दिवस पुर्ण झालेल्यांना दुसरा डोस देय राहील ) HCW व FLW यांचा पहिला व दुसरा डोस ऑनस्पॉट सकाळी 10 ते सायं.5 वाजपर्यंत राहील.
शहरातील इतर लसीकरण केंद्र दि. 14 जून 2021 रोजी बंद राहतील याची नागरीकांनी नोंद घ्यावी असे आवाहन उपायुक्त लातूर शहर महानगरपालिका लातूर यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.
***
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.