जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी भाजप सक्षम : आ. संभाजी पाटील निलंगेकर
लातूर : राज्यातील महाविकास आघाडी सरकारने प्रत्येक विभागात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा करत सर्वसामान्य जनतेसह शेतकर्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले आहे. या घोटाळ्यांची चर्चा होउ नये म्हणूनच मराठा व ओबीसी आरक्षणाचा विषय ऐरणीवर आणलेला आहे. सरकारच्या या धोरणामुळे जनतेला न्याय मिळत नसून, भाजपा न्याय मिळवून देण्यासाठी सक्षम असल्याचे प्रतिपादन माजी पालकमंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी केले.
लातूर येथील प्रणवश्री मंगल कार्यालयात अहमदपूर बाजार समितीचे माजी सभापती दिलीप देशमुख, औशाचे माजी नगराध्यक्ष किरण उटगे, अपक्ष जि.प. सदस्या सुमन घुमनवाड, अॅड. शीतल पाटील यांच्यासह औसा व अहमदपूर मतदारसंघातील शेकडो कार्यकर्त्यांच्या भाजपा प्रवेशसोहळ्यात आ. निलंगेकर बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा भाजपा अध्यक्ष आ. रमेश कराड हे होते तर व्यासपीठावर आ. अभिमन्यू पवार, भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आ. विनायक पाटील, माजी आ. गोविंद केंद्रे, अनुसूचित आघाडीचे प्रदेशाध्यक्ष माजी आ. सुधाकर भालेराव, नवनियुक्त प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर, जि.प. अध्यक्ष राहुल केंद्रे, माजी आ. बब्रुवान खंदाडे, माजी आ. शिवाजीराव पाटील कव्हेकर, प्रदेश प्रवक्ते गणेश हाके, उपाध्यक्षा भारतबाई साळुंके, सभापती रोहिदास वाघमारे, गोविंद चिलकुरे, प्रदेश भाजपाच्या प्रेरणा होनराव, जिल्हा संघटन सरचिटणीस संजय दोरवे, ओबीसी आघाडीचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब राठोड, त्र्यंबक कुटे, अशोक केंद्रे, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष अॅड. ज्ञानेश्वर चेवले आदींची उपस्थिती होती.
राज्यात विरोधी पक्षाची भूमिका बजावताना भाजपाचे आजही जिल्ह्यात मोठे प्राबल्य असल्याचे सांगत आगामी काळात हे संघटन वाढविण्यासाठी व्यासपीठावरील नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते एकदिलाने व एकजुटीने काम करतील, असा विश्वास व्यक्त करून आ. निलंगेकर यांनी आगामी निवडणुकांमध्ये भाजपा स्वबळावर झेंडा फडकवेल असा विश्वास दिला. सध्या राज्यात असलेल्या महाविकास आघाडी सरकारने प्रत्येक विभागात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केलेला असून केवळ गृह विभागातच नव्हे, तर प्रत्येक विभागात एक एक वाझे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. महाविकास आघाडी सरकारच्या या घोटाळ्यांमध्ये सर्वात अधिक भ्रष्टाचार कृषि आणि आरोग्यखात्यात झाले असल्याचा आरोप आ. निलंगेकर यांनी यावेळी केला. केवळ आपल्यापुरताच विचार करणार्या या महाविकास आघाडी सरकारच्या धोरणामुळे राज्यातील जनता व शेतकरी अडचणीत आलेला आहे. त्यांच्यावर होणारा अन्याय आणि घोटाळ्यांची चर्चा होवू नये याकरिताच मराठा व ओबीसी आरक्षणासारखे विषय सत्ताधार्यांनी ऐरणीवर आणले असल्याचे आ. निलंगेकर यांनी सांगितले.
कोरोनाच्या संकटामुळे राजकारण नको म्हणून आजतागायत शांत असणार्या भाजपाने मात्र आता या महाविकास आघाडी सरकारची लक्तरे वेशीवर टांगण्याची भूमिका घेतलेली असून आगामी होणार्या निवडणुकांमध्ये व आगामी काळात या सर्व बाबी जनतेसमोर मांडत त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी भाजपा सक्षम असल्याची ग्वाही आ. निलंगेकर यांनी यावेळी दिली. आगामी काळात महाविकास आघाडीच्या कार्यक्रमांवर व बैठकींवर बहिष्कार टाकून जनता व शेतकर्यांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येणार आहे. लातुरात होणारे हे आंदोलन राज्यासाठी दिशादर्शक ठरावे याकरिता लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्रित येवून सरकारमधील प्रतिनिधींना त्यांची जागा दाखवून द्यावी, असे आवाहन आ. निलंगकर यांनी यावेळी केले.
कार्यकर्त्यांना परिवार समजून काम करणार्या भाजपात कार्यकर्त्यांवर अन्याय होवू देणार नाही, अशी ग्वाही देवून जिल्हाध्यक्ष आ. रमेश कराड यांनी सर्वसामान्यांना केंद्रबिंदू ठेवूनच भाजपा आगामी काळात कार्यरत राहील, अशी ग्वाही दिली. मागील काळात माजी पालकमंत्री आ. निलंगेकर यांच्या नेतृत्वात जिल्ह्यात परिवर्तन झालेले असून आगामी काळातील परिवर्तनाची ही गती कायम ठेवत प्रत्येक निवडणुकांमध्ये भाजपाला विजयश्री मिळवून देण्यासाठी सर्वांनीच एकत्रितपणे काम करावे असे आवाहन केले. याकरिता कार्यकर्त्यांना आवश्यक असणारे बळही देण्यात येईल, असा विश्वास देवून आ. कराड यांनी लातूर हा भाजपाचा बालेकिल्ला असल्याचे पुन्हा एकदा दाखवून देण्यासाठी आपण सज्ज राहू, असे आवाहन केले.
आ. अभिमन्यू पवार यांनी भाजपा हा कार्यकर्त्यांचा पक्ष असून कार्यकर्त्यांवर या पक्षात अन्याय होत नसल्याचे सांगत कार्यकर्त्यांना योग्यवेळी योग्य संधी पक्ष देतोच, असा विश्वास व्यक्त केला. जिल्हाध्यक्ष असणार्या आ. कराड यांच्या नेतृत्वात जिल्हा भाजपात नवचैतन्य निर्माण झाले असून आगामी काळात अधिक सकारात्मकरीत्या कार्य होवून आगामी होणार्या कार्यकर्त्यांच्या निवडणुकीसाठी आम्ही सर्वजण एकजुटीने व एकदिलाने लढू, असा विश्वास दिला.
कार्यक्रमाच्या सुरूवातीला भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी, लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रदेश उपाध्यक्षपदी माजी आ. विनायक पाटील व प्रदेश सचिवपदी अरविंद पाटील निलंगेकर यांची नियुक्ती झाल्याबद्दल जिल्हा भाजपाच्या वतीने सत्कार करण्यात आला. पक्षात प्रवेश करणारे दिलीपराव देशमुख, किरण उटगे व अॅड. शीतल पाटील यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघटन सरचिटणीस संजय दोरवे तर सूत्रसंचलन चंद्रकांत कातळे यांनी केले.
--
Photo By- Narayan Pawle (Tamma) Latur
Mobile No. 9422071717
Mobile No. 9422071717
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.