राजर्षी शाहू महाराजांचे क्रांतिकारी विचार समाजाच्या सर्व घटकांपर्यंत पोहोचावेत


राजर्षी शाहू महाराजांचे क्रांतिकारी विचार 

समाजाच्या सर्व घटकांपर्यंत पोहोचावेत

                                                                                                                                    -विवेक सौताडेकर

जिल्हा माहिती कार्यालयात सामाजिक न्याय दिन साजरा







 

लातूर, दि.28(जिमाका):- केवळ ४८ वर्षाचे आयुष्य लाभलेल्या राजर्षी शाहू महाराजांनी २८ वर्ष  राज्यकारभार केला.त्यांनी आपल्या राज्यात विधवा पुनर्विवाह कायदा, आंतरजातीय विवाह कायदा  असे अनेक कायदे केले.बहुजन समाजाला सरकारी नोकऱ्यांमध्ये ५० टक्के जागा राखीव ठेवण्या संबंधित कायदा करणारे शाहू महाराज हे एकमेव संस्थानिक होते. मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा कायदा करून पाल्याला शाळेत न पाठवणार्‍या पालकांना एक रुपयाचा दंड आकारण्याचा धाडसी निर्णय घेतला. राजर्षी शाहू महाराज हे दृष्टे व लोककल्याणकारी राजे असून त्यांचे क्रांतीकारी विचार समाजाच्या सर्व घटकांपर्यंत पोहोचले पाहिजेत, असे प्रतिपादन साहित्यिक विवेक सौताडेकर यांनी केले.

 जिल्हा माहिती कार्यालय, लातूरच्या वतीने सामाजिक न्याय दिनाचे औचित्य साधून छत्रपती शाहू महाराज यांच्या  जयंतीच्या निमित्ताने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख व्याख्याते म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के हे असून प्रमुख पाहुणे म्हणून  शाहू महाविद्यालयाचे जनसंवाद विभाग प्रमुख प्रा.शिवशंकर पटवारी हे उपस्थित होते.

     श्री. सौताडेकर पुढे म्हणाले की, शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणासाठी विविध जातींच्या मुलांची सुमारे तेवीस वसतिगृहे स्थापन केली. महाराजांना क्षुद्र ठरवणाऱ्या वेदोक्त प्रकरणानंतर ब्राह्मणशाहीला धुडकावून स्वतंत्र क्षत्रीय आणि बहुजन समाजासाठी देशातील पहिल्या 'क्षात्रजगद्गुरु पीठाची'  स्थापना केली. सामाजिक क्रांतीबरोबर आर्थिक प्रगती ही देखील राजर्षींच्या राज्यकारभाराचे वैशिष्ट्ये होते.श्रीशाहू मिलची स्थापना, गुळासाठी शाहूपुरी तसेच जयसिंगपूर अशा बाजारपेठांची स्थापना केली.

       शेतकऱ्यांसाठी सहकारी संस्थांची निर्मिती, राधानगरी धरणाची उभारणी, पाटबंधारे विभाग,तलाठी पदाची निर्मिती यातून त्यांनी आर्थिक प्रगतीचा मोठा पाया रचला.  कामकाजामध्ये जलद गती येण्यासाठी टेलिफोन, रेल्वेची व्यवस्था केली. मजुरांना काम देण्यासाठी रोजगार हमी योजना ,त्यांच्या मुलांसाठी 'पाळणाघर' सुविधा अशा अनेक सुविधा त्यांनी आपल्या संस्थानांमध्ये सुरु करुन सबंध देशाला दिशा देण्याचे अलौकिक कार्य केले आहे.

    याप्रसंगी प्रमुख पाहुणे प्रा. शिवकुमार पटवारी म्हणाले की, राजर्षी शाहूंचा विचार  हा सार्वत्रिक असून तो समाजाने स्वीकारायला हवा. सामाजिक न्याय हा प्रत्येकाने आपल्या कृतीतून दाखवून दिला पाहिजे. जोपर्यंत कृतिशील सामाजिक न्यायाचा अंगीकार होणार नाही तोपर्यंत शाहू महाराजांच्या सामाजिक न्यायाचा उद्देश साध्य होणार नाही, असे मत त्यांनी मांडले.

      अध्यक्षीय समारोपात जिल्‍हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के यांनी राजर्षी शाहू महाराजांचे विचार व त्यांची कार्यपद्धती ही समाजातील सर्व नागरिकांना  मार्गदर्शक असून त्याचे प्रत्येकाने अनुकरण मोठ्या प्रमाणात करायला  हवे असे मत व्यक्त केले.

     प्रारंभी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक  दिलीप वाठोरे यांनी केले. तर सूत्रसंचालन अशोक माळगे यांनी करून शेवटी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.

     या कार्यक्रमास ऑनलाइन द्वारे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अहमद बेग, अशोक बोर्ड, प्रवीण बिदरकर, श्री.बनसोडे, श्री.केंद्रे, कलिम शेख यांनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या