भारताच्या प्रगतीमध्ये देशातील ऊर्जा क्षेत्राची खूप मोठी भूमिका आहे - केदार खमितकर
लातूर : मंगळवार दि २९ जून रोजी 'ऊर्जा संवर्धन संधींची ओळख व विकास' या विषयावरती पीसीआरए यांच्यावतीने व्हर्च्युअल औद्योगिक कार्यशाळा आयोजित केले होते त्यास चांगला प्रतिसाद मिळाला. भारताच्या प्रगतीमध्ये देशातील ऊर्जा क्षेत्राची खूप मोठी भूमिका आहे. हे एक असे क्षेत्र आहे जे सुसह्य जीवन आणि व्यवसाय सुलभता या दोन्हीशी निगडित आहे. आत्मनिर्भर भारताच्या उद्दिष्टासह आज जेव्हा देश वाटचाल करत आहे तेव्हा त्यात ऊर्जा क्षेत्र, अक्षय ऊर्जा क्षेत्राची महत्वपूर्ण भूमिका आहे असल्याचे खमितकर यांनी कार्यशाळेत उद्योजकांना सांगितले. औरंगाबाद येथील शुभनिल इंडस्ट्रीज चे संचालक जयंत मेश्राम यांची मुख्य उपस्थिती होती. मुख्य मार्गदर्शक पीसीआरए चे व्याख्याता केदार खमितकर होते. ऊर्जा पडताळा (Energy Audit) या प्रक्रियेमध्ये ऊर्जा वापराचा अभ्यास केला जातो आणि ऊर्जेचा खर्च कमी करण्यासाठी कोणत्या पर्यायांचा वापर केला जाऊ शकतो याचे विश्लेषणही केले जाते.ऊर्जा संवर्धन अधिनियम २००१ नुसार ऊर्जा पडताळा या संकल्पनेमध्ये ऊर्जेच्या वापराची पडताळणी आणि देखरेख यांचा अंतर्भाव होतो. तसेच यामध्ये खर्च-फायद्याच्या विश्लेषणासह ऊर्जा कार्यक्षमता सुधारित करण्यासाठी ऊर्जेचा वापर कमी करण्याच्या कृती योजनेसह तांत्रिक अहवाल सादर केला जातो.ज्या ठिकाणी ऊर्जेचा अपव्यय होत आहे, परंतु जेथे सुधारणेला वाव आहे अशा क्षेत्रांची ओळख करून ऊर्जेचा खर्च कमी करणे ह्या कारणामुळे ऊर्जा पडताळ्याची आवश्यकता असल्याचे ऊर्जा लेखापरीक्षक खमितकर यांनी नमूद केले. समन्वयक मंगेश सोनवणे, नागेश अरसोडे, धनंजय दिगर व विनोद बहिर आदींनी कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. मराठवाडा विभागातील अनेक अभियंता, तांत्रिक ऑपरेटर इतर कर्मचारी प्रशिक्षणात सहभागी झाले.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.