ओबीसी अवहेलना खपवून घेतली जाणार नाही
- महापौर विक्रांत गोजमगुंडे यांचा इशारा
शाहु महाराजांच्या जयंती दिनी आंदोलन करावे लागणे ही शोकांतिका.
लातूर/ प्रतिनिधी: ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द करण्याचा निर्णय दुर्दैवी असून समाजाची अशा पद्धतीने होणारी अवहेलना खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी दिला.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने शनिवारी ( दि.२६ जुलै )सकाळी गांधी चौक येथे ओबीसी आरक्षण बचाव आंदोलन करण्यात आले.याप्रसंगी आपले मत व्यक्त करताना महापौर गोजमगुंडे बोलत होते.
लातूर जिल्हा ओबीसी काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रा. एकनाथ पाटील,शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲड.किरण जाधव यांच्यासह पक्षाचे नगरसेवक, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य तसेच लोकप्रतिनिधींची याप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
यावेळी बोलताना महापौर म्हणाले की,घटनेने ओबीसी समाजाला दिलेल्या राजकीय आरक्षणाचा लाखो नागरिकांना लाभ झालेला आहे.या राजकीय आरक्षणामुळे समाज आत्ता कुठे मुख्य प्रवाहात येत होता. परंतु आता आरक्षण रद्द करण्याचा निर्णय झालेला असून त्यामुळे भविष्यात शिक्षण व नोकरीतील आरक्षणासहही समाजाला मुकावे लागेल असे ते म्हणाले.
ओबीसींचे लोकप्रतिनिधी निवडूनच गेले नाहीत तर समाजाच्या समस्यांविषयी आवाज कोण उठवेल ?असा प्रश्न उपस्थित करून ओबीसींच्या मनातील आक्रोश विविध आंदोलनांच्या माध्यमातून व्यक्त होत असल्याचे महापौर गोजमगुंडे म्हणाले.त्यांनी सांगितले की, मराठा समाजाचे आरक्षण रद्द झाल्यानंतर ज्या पद्धतीने पुनर्विचार याचिका दाखल झाली तशाच पद्धतीची याचिका दाखल होणे गरजेचे आहे.ओबीसी समाजाचे आरक्षण कायमस्वरूपी रद्द झालेले नाही.एम्पिरिकल डाटा मांडल्यानंतर ते पुन्हा कायम होऊ शकते.केंद्र सरकारकडे २०११ साली झालेल्या जनगणनेचा डाटा उपलब्ध आहे.सत्तेतील मंडळींनी तो डाटा लवकर उपलब्ध करून दिला पाहिजे. त्याची तुलनात्मक मांडणी केली पाहिजे,असेही ते म्हणाले.
ओबीसींना न्याय मिळावा, त्यांचा हक्क मिळावा, समाजाचे कल्याण व्हावे यासाठी आंदोलने सुरू आहेत.हे आरक्षण लवकरात लवकर कायम केले नाही तर समस्त ओबीसी समाज रस्त्यावर उतरेल.पुढील काळात तीव्र आंदोलने केली जातील,असा इशाराही त्यांनी दिला.राजर्षी शाहू महाराजांनी आरक्षण देण्याचे काम केले.त्यांच्या जयंतीदिनीच ओबीसी समाजाला हक्कासाठी भांडावे लागत असून ही दुर्दैवी बाब असल्याचेही महापौर गोजमगुंडे यांनी याप्रसंगी बोलताना सांगितले.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.