नाना पटोले यांचं वक्तव्य संभ्रमित करणारं - जगदीश माळी

 

नाना पटोले यांचं वक्तव्य संभ्रमित करणारं - जगदीश माळी





लातूर / प्रतिनिधी : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दोन दिवसांपूर्वी वंचित बहुजन आघाडीसोबत युती करण्याबाबत जे विधान केले ते संभ्रमात टाकणारे असून याकडे आघाडीच्या कोणीही पदाधिकारी,कार्यकर्ते यांनी लक्ष देऊ नये असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष जगदीश माळी यांनी पत्रकार परिषदेत केले आहे.
महाविकास आघाडी सरकारचा भाग असला तरी राज्यात काँग्रेस अक्षरशः रसातळाला पोहोचली आहे, पक्षाला कुठेतरी उभारी मिळावी यासाठी बोलण्यात चतुर असलेले नाना पटोले यांच्याकडे प्रदेशाध्यक्ष पद देऊन अजमावण्याचा प्रयत्न केला जात असून पटोले यांच्या मागणीला वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर कधीही भीक घालणार नाहीत असे सांगून वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष जगदीश माळी पुढे म्हणाले की लातूर जिल्ह्यात सर्व तालुका, ग्रामपंचायत स्तरावर आघाडीची संघटन बांधणी सुरू आहे, आम्हाला लोकांतून मोठा प्रतिसाद मिळत आहे. संघटन मजबूत करण्यासाठी निलंगा, अहमदपूर, चाकूर, लातूर, उदगीर, जळकोट, रेणापूरच्या तालुका कार्यकारिणी तयार आहेत. लातूर शहर महानगरपालिका निवडणूक तयारी म्हणून बूथ बांधणी सुरू आहे, कोणत्याही क्षणी निवडणुका झाल्या तरी आमची स्वबळावर लढण्याची तयारी असल्याचे सांगून लवकरच इतर पक्षातील नेते, कार्यकर्ते वंचित बहुजन आघाडीत प्रवेश करतील अशी माहिती दिली.
लातूर शहराला दररोज पाणी पुरवठा करू यासह रस्ते,लाईट, ड्रेनेजसारख्या अन्य नागरी सुविधा उपलब्ध करून देऊ असे खोटे आश्वासन देऊन शहराला पाणी पुरवणाऱ्या प्रकल्पात मुबलक पाणी असतानाही ढिसाळ नियोजन असलेल्या भारतीय जनता पार्टी आणि सध्या सत्तेत असलेली काँग्रेस हे दोन्ही पक्ष लातूरकरांसमोर अपयशी ठरले आहेत. येणाऱ्या महापालिका निवडणुकीत वंचित आघाडी प्रस्थापितांना आपली जागा दाखवून देईल असा विश्वास यावेळी जिल्हाध्यक्ष जगदीश माळी यांनी माध्यमांसमोर व्यक्त केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या