ग्रामीण रुग्णालयात पाणी - वीज नसल्याने रूग्णांचे हाल...

 ग्रामीण रुग्णालयात पाणी - वीज नसल्याने रूग्णांचे हाल... 




औसा /प्रतिनिधी : - औसा येथील ग्रामीण रुग्णालयातील वीज पुरवठा खंडित झाला असून वीज आणि पाणी नसल्यामुळे उपचार घेणाऱ्या रुग्णांचे हाल होत असल्याचा प्रकार शनिवार दि. 5 जून 2021 शनिवार रोजी उघडकीस आला आहे. येथील ग्रामीण रुग्णालयात 20 ऑक्सिजन बेडची सुविधा कोरोना ग्रस्तासाठी करण्यात आली आहे. परंतु रुग्णालय परिसरात शाॅर्ट सर्किट होऊन विद्युत पुरवठा खंडित झाल्याने ऐन उन्हाळ्यात रुग्णांना त्रास सहन करावा लागत आहे. तसेच रुग्णालयाच्या आवारातले बोरवेल बंद पडल्याने पाण्याची सुविधा नाही. विद्युत पुरवठा खंडित झाल्याने पंखे आणि विद्युत दिवे बंद पडले आहेत. तसेच दोन दिवसापासून स्नानगृह व शौचालयात पाणी नसल्याने येथील उपचार घेणाऱ्या रुग्णांची हेळसांड होत आहे. कोरोना  विषाणूमुळे संसर्ग झालेल्या रुग्णासह रुग्णालयातील इतर रुग्णांना आॅक्सिजन बेडची सुविधा असूनही योग्य उपचार घेता येत नाही. अडचणी असल्या तरी त्या तातडीने सोडविण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. बोरवेल बंद पडल्यामुळे पाण्याचे टँकरही विद्युत पुरवठा अभावी जागेवर उभे असल्याने रुग्णालयात पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. याबाबत वैद्यकीय अधीक्षक डॉ. अंगद जाधव यांना विचारणा केली असता विद्युत पुरवठ्यामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने पाणी आणि विजेची समस्या निर्माण झाली आहे. विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न सुरू आहेत, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.औशाच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार घेणाऱ्या कोरोनाग्रस्त रुग्णांना चांगले उपचार देण्यासाठी चार डॉक्टरांची ऑर्डर काढली असून अद्याप एकही डॉक्टर  रुजू झाले नसल्याची खंत वैद्यकीय अधीक्षकांनी व्यक्त केली. शनिवार दि. 5 जून रोजी औसा ग्रामीण रुग्णालयात विद्युत पुरवठा खंडित झाल्याने पाणी व  लाईटची सुविधा नसल्यामुळे उपचार घेणाऱ्या सर्व कोरोनाग्रस्त रुग्णांना याकतपूर रोडवरील कोव्हिड केअर सेंटरमध्ये हलविण्यात आल्याचे कळते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या