*रिक्षा चालकांना कोविड-19 काळातील 1500 रुपये सानुग्रह अनुदानासाठी झिरो बॅलन्स पोष्ट बॅकेत खाते उघडता येणार राज्य शासनाच्या सानुग्रह अनुदानासाठी*
*रिक्षा चालकांनी पोष्ट बॅकेत खाते उघडावे : नेरपगार*
*उस्मानाबाद, प्रतिनिधी अल्ताफ शेख*:-जिल्हयातील रिक्षा चालकांना कोविड-19 काळातील 1500 रुपये सानुग्रह अनुदानासाठी झिरो बॅलन्स पोष्ट बॅकेत खाते उघडता येणार आहे.जवळच्या पोष्ट ऑफीसमध्ये संपर्क साधून असे पोष्ट बॅक खाते उघडावेत,असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन नेरपगार यांनी केले आहे.
राज्य शासनाने कोविड काळात रिक्षाचालकांना आधार देण्यासाठी ऑटोरिक्षा परवानाधारकास प्रत्येकी 1500 रुपये सानुग्रह अनुदान जाहीर केले आहे. त्याकरीता अर्ज दाखल करण्यासाठी ऑनलाईन प्रणाली विकसित करण्यात आली आहे. जिल्हयातील 2293 ऑटोरिक्षा परवानधारकांनी या प्रणालीवर ऑनलाईन अर्ज सादर करणे आवश्यक आहे.तथापि,बऱ्याच परवानाधारकांकडे बँक खाते नसल्याने बँकेत नवीन खाते उघडण्यासाठी काही ठराविक रक्कम जमा करण्याचे बंधन आहे.काही बँका ह्या जमा होणाऱ्या अनुदानातूनच बँकेचे कर्ज हफ्ते वळते करीत असल्याचे निदर्शनास आले आहे.
त्याअनुषंगाने दि.07 जुलै-2021 रोजी झिरो बॅलन्स प्रकारातील पोस्ट बँक खाते उघडण्याविषयी मुख्य पोस्टमास्तर श्री.पाटील यांच्यासोबत बैठक घेऊन चर्चा करण्यात आली. चर्चेअंती जिल्हयातील ऑटोरिक्षा परवाना धारकांना झिरो बॅलन्स प्रकारातील पोस्ट बँक खाते उघडणे शक्य असल्याबाबत त्यांनी सांगितले आहे.
या योजनेचा लाभ सर्व ऑटोरिक्षा परवानाधारकांना देण्यासाठी परवानाधारकाने राहत असलेल्या पत्याच्या जवळील पोस्ट ऑफीसमध्ये झिरो बॅलन्स प्रकाराचे पोस्ट बँक खाते उघडावे.त्याकरीता परवानाधारकाचा मोबाईल क्रमांक व आधारकार्डची माहिती संबंधित पोस्ट ऑफीसला संपर्क साधून द्यावी. त्यानंतर सानुग्रह अनुदानाचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज सादर करावा, असेही आवाहन श्री.नेरपगार यांनी केले आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.