विठ्ठल नामाच्या गजराला याही वर्षी कोरोनाचा अडसर...
राम कांबळे,
औसा
महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान म्हणजे पंढरीचा पांडुरंग. महाराष्ट्राचे आराध्यदैवत म्हणून श्री क्षेत्र पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिराची ख्याती आहे. आषाढी एकादशीला वारकरी संप्रदायामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. वर्षभर काबाडकष्ट करणारे वारकरी देहू आणि आळंदी येथून ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरु तुकोबारायांच्या पालखी सोबत पायी चालत जाण्याची शेकडो वर्षाची परंपरा. परंतु कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सर्व धार्मिक कार्यक्रमावर गर्दी टाळण्यासाठी बंदी आल्याने सलग दुसऱ्या वर्षी पायी पालखी दिंडीची परंपरा खंडित झाल्याने वारकऱ्यांचा हिरमोड झाला आहे. संत नामदेवांनी वारकरी सांप्रदायाचा पाया रचला आणि जगद्गुरू तुकोबारायांनी त्यावर कळस चढविला आहे. सर्व जातीधर्माचे वारकरी पायी दिंडी मध्ये एकरूप होऊन पंढरीच्या पांडुरंगाच्या भक्तीत तल्लीन होतात. देहू, आळंदी पासून लाखो वारकरी शेकडो किलोमीटरचे अंतर पायी चालून आषाढी एकादशीला चंद्रभागेच्या तीरावर अवतरतात. पायी, पालखी दिंडी सोबत चालताना घरदार, कुटुंब, संसार, व्यापार, उद्योगासह विविध क्षेत्रातील भाविक तीन आठवड्यांसाठी आपल्या डोळ्यासमोर फक्त पांडुरंगाची 28 युगापासून कटेवर कर ठेवलेली मूर्ती पाहतात. पायी दिंडीचा आनंद अविस्मरणीय असतो. मजल - दरमजल करीत विठ्ठल नामाचा गजर करीत भागवत धर्माच्या भगव्या पताका घेऊन टाळ मृदंगाच्या निनादात लीलया चालू लागतात. आबालवृद्धांसह युवक, महिला यांच्या आनंदाला पारावार उरत नाही. विठ्ठल भक्तीने ओतप्रोत भरलेले वारकरी अभंग, भारुड, भजन, " नाचू कीर्तनाच्या रंगी " चा आनंद घेतात. पावसाळ्याचे दिवस असल्याने रस्त्याच्या दुतर्फा डोलणारी झाडे, नागमोडी वळणाचे रस्ते आणि खळखळ वाहणारे नदी नाले अशा निसर्गाच्या सानिध्यात रममाण होताना वारकऱ्यांना पायी चालण्याचा जणू विसरच पडतो. संत गजानन महाराज शेगाव, संत एकनाथ, संत नामदेव, संत मुक्ताबाई, संत जनाबाई अशा अनेक ठिकाणाहून आषाढी वारीला पालख्या पंढरपूर नगरीत येतात. परंतु कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सलग दुसऱ्या वर्षी पायी पालखी दिंडी रद्द झाल्यामुळे वारकरी सांप्रदायाच्या आनंदावर विरजण पडले आहे. या वर्षी राज्य सरकारने देहू आणि आळंदी येथून पायी दिंडी ला परवानगी नाकारली आहे. संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर माऊलीच्या पादुका घेऊन प्रातिनिधिक स्वरूपात मोजक्या वारकऱ्यांना कोरोना प्रतिबंधात्मक नियम पाळून परवानगी देण्यात आली. यावर्षी आषाढी वारीच्या निमित्ताने वारीतील रिंगणाचा आनंद घेण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या वाखरी गावापासून मोजक्या भक्तांना पंढरीत येण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आणि गर्दी टाळण्यासाठी सरकारला हे पाऊल उचलावे लागले. त्यामुळे वाखरी ते पंढरपूर पायी दिंडीत मोजक्या भाविकांना आज विठ्ठल दर्शनासाठी येता येईल. विठ्ठल रुक्मिणी मंदिर विश्वस्त समितीने नाराजी व्यक्त केली. पायी पालखी सोहळा रद्द झाल्याने सर्वसामान्य भाविकांना मंदिरात दर्शनासाठी प्रवेश नाही. त्यामुळे पंढरपूर नगर परिषदेसह प्रशासन व पोलिस यंत्रणेचा ताण कमी झाला आहे. परंतु आषाढी वारीच्या निमित्ताने लाखो भाविक पंढरपूर नगरीत येत होते. या वर्षी सुद्धा पायी दिंडी नसल्यामुळे येथील व्यवसायिकांना लाखो रुपयांचा आर्थिक फटका बसणार आहे. त्यामुळे अवघे पंढरपूर यावर्षी गरजणार नाही. आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल दर्शनासाठी देवाचिया दारी क्षणभर उभे राहता नाही आले तरी लाखो भाविक घरा- घरातून मनोभावे पूजा अर्चा आणि उपासना करतील. आषाढी एकादशीचा शासकीय महापूजेचा मान महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना असतो. त्यामुळे आज पहाटे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंढरपूर नगरीत श्री विठ्ठलाची महापूजा करतील आणि कोरोना मुक्त सुजलाम सुफलाम महाराष्ट्रासाठी श्री विठ्ठलाकडे मागणे मागतील. आषाढी एकादशी निमित्त सर्व भाविक भक्तांना हार्दिक शुभकामना...!!
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.