शिक्षण केवळ शाळॆतच मिळू शकते हा गैरसमज
कोरोनाने दूर केला : डॉ. मिलिंद पोतदार
लातूर, दि. १९ : शिक्षण घेण्याचे अनेक मार्ग आहेत. प्रत्येकाकडून आपणाला कांही ना कांही शिकता येते. कोरोना संसर्गाच्या काळात त्याचा वाढता प्रादुर्भाव कमी करण्यासाठी शाळा बंद राहिल्या. शाळा बंद असल्या तरी ऑनलाईन पध्दतीने शिक्षण - अध्ययन प्रक्रिया चालूच आहे. यावरून शिक्षण केवळ शाळॆतच मिळू शकते हा गैरसमज कोरोनाने दूर केला आहे, असे म्हटल्यास ते अतिशयोक्तीचे होणार नाही,असे प्रतिपादन विख्यात मानसोपचार तज्ज्ञ डॉ. मिलिंद पोतदार यांनी केले.
येथील अभिनव मानव विकास संस्थाद्वारा संचालित श्रीकिशन सोमाणी विद्यालयाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी रविवारी विख्यात मानसोपचार तज्ज्ञ डॉ. मिलिंद पोतदार यांचे ' कोरोनाची गस्त, घरात शिक्षण मस्त ' विषयावर ऑनलाईन व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या व्याख्यानाच्या माध्यमातून त्यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले. हजारोंच्या संख्येने विद्यार्थांनी या व्याख्यानाचा लाभ घेतला. कार्यक्रमाच्या प्रारंभी सहशिक्षिका भारती गोवंडे यांनी डॉ. पोतदार यांचा विस्तृत असा परिचय करून दिला. संस्थेचे मार्गदर्शक सदस्य तथा ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ अतुल देऊळगावकर यांनी डॉ. पोतदार यांचे स्वागत करून या उपक्रमाच्या आयोजनामागची पार्श्वभूमी विशद केली. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. मिलिंद पोतदार यांनी विविध माध्यमातून शिक्षण घेणे शक्य असून कोरोनाच्या काळात विद्यार्थ्यांना केवळ आणि केवळ ऑनलाईन शिक्षणावर अवलंबून रहावे लागल्याचे सांगितले. कोरोनाच्या पहिल्या - दुसऱ्या लाटेमुळे उदभवलेल्या परिस्थितीचे विवेचन विद्यार्थ्यांना समजेल अशा सोप्या शैलीत करून शाळा बंद राहिल्यामुळे विद्यार्थी प्रत्यक्ष शाळेत उपस्थित न राहता, आपल्या मित्रवर्गाला न भेटता कशा पध्दतीने शिकले व शिकत आहेत, हे सांगितले. शाळा चालू नसली तरी वेगवेगळ्या माध्यमातून शिक्षण घेता येते असे सांगताना त्यांनी शिक्षण दुसऱ्यांकडून मिळालेली सूचना, अनुभवातून, पाहिलेले अनुभव, सांगितलेले अनुभव अशा माध्यमातून शिकता येते असे ते म्हणाले. कोरोनाने चार भिंतीतील शिक्षण बंद झाले असले तरी शिक्षणाचे असे विविध पर्याय उपलब्ध आहेत. शिक्षणासाठी मिळेल त्या मार्गाने ज्ञान संपादन करण्याची जिज्ञासा असली पाहिजे. कोरोनाने जीवन जगण्याची दिशाच बदलण्याचे काम केले आहे. ऑनलाईन शिक्षण पध्दतीमुळे विद्यार्थ्यांना ज्या मोबाइलपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न पालकांकडून केला जायचा तेच पालक मुलांना मोबाईल देताना दिसले. त्यामुळे मुलांची दिनचर्याच बदलली. त्यामुळे विद्यार्थी आपल्या सवंगड्यांना भेटून खेळू - बाळगू शकले नाहीत. पण या काळात स्वतःला सुरक्षित ठेवणे अत्यंत आवश्यक होते. मात्र कोरोनाने आपल्यासमोर अनेक पर्याय उपलब्ध करून दिले असल्याचे डॉ. पोतदार म्हणाले. कोरोना काळात विद्यार्थी पाठ्यपुस्तकांपासून दूर राहिले असले तरी ऑनलाईन अध्ययन प्रणालीच्या माध्यमातून त्यांच्या ज्ञानात वृध्दी करण्याचा प्रयत्न सातत्याने होत आहे. विपरीत परिस्थितीतही धैर्याने कसे जगले पाहिजे हे कोरोना काळाने शिकवले आहे. परिस्थितीशी समायोजन करण्यात यशस्वी झाले की ही बाब सहज साध्य होऊ शकते, असे डॉ.पोतदार यांनी स्पष्ट केले. वेळेच्या नियोजनाचे महत्व पटवून देतानाच डॉ. पोतदार यांनी जगण्यासाठी दृष्टीची नव्हे तर चांगल्या दृष्टीकोनाची आवश्यकता असल्याचे नमूद केले. शिक्षण म्हणजे काय ? हे सांगतानाच त्यांनी अनुभवाचे अत्यंत सोप्या भाषेत विश्लेषण करून सांगितले.
डॉ. मिलिंद पोतदार यांच्या या व्याख्यानाचा लाभ लातूर शहरातील अनेक शाळामधील विद्यार्थ्यांनीही घेतला. याबद्दल अभिनव मानव विकास संस्थेचे अध्यक्ष डॉ. चेतन सारडा, सचिव कमलकिशोर अग्रवाल, कोषाध्यक्ष जयेश बजाज, या उपक्रमाचे मूळ संकल्पक ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ पत्रकार अतुल देऊळगावकर, मुख्याध्यापक रमाकांत स्वामी, पर्यवेक्षक गिरीश कुलकर्णी यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले आहेत.
------------------------
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.